दोष परकीय धनाचा ? (शाम) मानव आहेत पराधीन !

‘विज्ञानाला जे समजले, तेच शेवटचे ज्ञान आहे, असे समजणे’, हीच खरी अंधश्रद्धा आहे, हे नास्‍तिकतावादी समजतील का ?

नुकतेच अंनिसचे शाम मानव यांनी बागेश्‍वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री  महाराज यांना ‘चमत्‍कार दाखवा आणि ३० लाख रुपये बक्षीस मिळवा !’, असे आवाहन केले होते. यावर शाम मानव यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य किती थोतांड आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या चळवळी राबवण्‍यामागे नेमके काय षड्‍यंत्र आहे, याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत. ४ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘विदेशी पैशाच्‍या साहाय्‍याने केवळ हिंदु धर्माच्‍या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या चळवळी राबवण्‍यामागे षड्‍यंत्र आणि अन्‍य सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भाग १. मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/651180.html

ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर

३. हिंदूंच्‍या सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आक्रमण करणार्‍यांच्‍या विरुद्ध हिंदूंनी ठामपणे उभे रहाणे आवश्‍यक !

एखादा बुवा जादुटोणा किंवा दैवी चमत्‍कार करत असेल, तर तो जितका खोटा असतो, तेवढेच लोकांच्‍या मनात विज्ञान आणि वैद्यकशास्‍त्र यांच्‍या दृष्‍टीने अंधश्रद्धा निर्माण करणारेही असतात. ‘अमूक एक क्रिम लावली की, गोरेपणा येतो’, अशा विज्ञापनांविरुद्ध शाम मानव का उभे रहात नाही? गोरेपणाची विज्ञापने देणार्‍या रासायनिक, कॉस्‍मेटिक आणि औषधी आस्‍थापनांच्‍या  विरुद्ध आवाज कुणी उठवायचा ? लोकांच्‍या मनात त्‍यांच्‍या त्‍वचेच्‍या रंगाविषयी असलेल्‍या न्‍यूनगंडातून हा कोट्यवधीचा व्‍यापार उभा केला जातो. ‘आपला कृष्‍णवर्ण जाऊ शकतो’, हीसुद्धा अंधश्रद्धाच आहे. एखादे रसायन किंवा क्रिम यांनी त्‍वचेचा रंग पालटणे अशक्‍य आहे; कारण हेही शास्‍त्र आहे. त्‍यासाठी मात्र शाम मानव किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले कधी उभे रहाणार नाहीत. मग ते यांच्‍याच (साधूसंत) विरुद्ध उभे रहातात; कारण त्‍यांचे आर्थिक हितसंबंध हे हिंदु धर्माच्‍या कुठल्‍याही श्रद्धांना अंधश्रद्धा ठरवण्‍यामागे गुंतलेले आहेत.

मध्‍यंतरी भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष बावनकुळे म्‍हणाले, ‘‘शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्‍यावर जादुटोणा केला आहे किंवा लिंबू फिरवले आहे.’’ तेव्‍हा हे लोक लगेच बावनकुळे यांच्‍यावर जादुटोणा कायद्यानुसार गुन्‍हा नोंदवण्‍यास धावले. भाषण करतांना ‘जादुटोणा’ हा शब्‍द बोलला, तरीही कायद्याचा भंग होतो. मग या वैज्ञानिक आणि शास्‍त्रीय अंधश्रद्धांच्‍या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम का करत नाही ? कारण केवळ गल्लीबोळातील बुवा-महाराजांना छळण्‍यात धंदा असतो.

‘कुठले तरी येशूचे रक्‍त प्‍यायल्‍याने रोगराई बरी होते; म्‍हणून ख्रिस्‍ती व्‍हा’, असा धर्मांतराचा प्रकार नुकताच पुणे जिल्‍ह्यात कुठेतरी ऐकायला मिळाला. तेव्‍हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठे होती ? त्‍यांच्‍या विरुद्ध आवाज का उठवला जात नाही ? कुठल्‍याही स्‍वरूपाचे धर्मांतर करून कोणतीही रोगराई किंवा माणसाची परिस्‍थिती पालटत नाही, हीसुद्धा एक शास्‍त्रीय वस्‍तुस्‍थिती आहे. मग ‘धर्मांतर करा, सगळे बरे होईल’, या ज्‍या कल्‍पना डोक्‍यात घातल्‍या जातात किंवा गोरेपणा येण्‍यासाठी औषधी आस्‍थापने विज्ञापने करतात, त्‍याच्‍या विरुद्ध कुणी आवाज उठवायचा ? येथे समजते की, कुठलाही धर्म आणि कोणतीही बुवाबाजी असो, गोरे करणार्‍या क्रिमचा किंवा वेदनाशामक वगैरे सांगणारा धंदा असो, ही सर्व बुवाबाजी अन् अंधश्रद्धा असते आणि या अंधश्रद्धेला प्रोत्‍साहन देणारेही अंधश्रद्धा निर्मूलनामध्‍ये असतात. काय विनोद आहे !

४. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही धर्म, समाज आणि सामाजिक एकसंघता यांच्‍यावरील आक्रमण !

हे धर्म, समाज आणि सामाजिक एकसंघता यांच्‍यावरील आक्रमण आहे. प्रतिदिन वर्तमानपत्रात बंगालीबाबांची विज्ञापने येतात. हा बंगालीबाबा तथाकथित मुल्ला मौलाना असतो आणि तो राजरोसपणे विज्ञापने देऊन अंधश्रद्धेचा प्रसार करतो, त्‍याच्‍या विरोधात आवाज का उठवत नाही ? त्‍यांच्‍या विरुद्ध किती प्रयत्न केले ? त्‍यामुळे हे हिंदूंवरील आक्रमण असेल, तर त्‍याच्‍या विरुद्ध उभे राहिले पाहिजे. याचा अर्थ कुठला बाबा किंवा बागेश्‍वरचे पंडित धीरेंद्र महाराजांचे समर्थन अजिबात होत नाही. कुणी हिंदूंच्‍या एकूण सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आक्रमण करत असेल, तर त्‍याच्‍या विरुद्ध हिंदु समाजाच्‍या लोकांनी ठामपणे उभे रहाणे आवश्‍यक आहे; कारण हे हिंदु समाजावर आघात करतात.

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते स्‍वामी प्रसाद मौर्य यांनी ‘रामचरितमानस’ वर आक्षेप घेऊन त्‍यावर बंदी घालण्‍याची मागणी केली. मग हाच प्रकार इतर धर्मांच्‍या धर्मग्रंथातही सापडेल. तेव्‍हा त्‍याच्‍या विरुद्ध कुणीही उभे रहाणार नाहीत; म्‍हणून हा देश ‘हिंदु’ म्‍हणून टिकला पाहिजे. हिंदूंना पळायची वेळ आली, तर जाणार कुठे ? जसे सिंहगडावरच्‍या कथेमध्‍ये शेलारमामाने मागचे दोर कापून टाकले आणि मावळ्‍यांना ‘हा किल्ला जिंका नाही, तर लढून मरा. मागे पळायचे दोर कापले आहेत’, असे सांगितले होते. त्‍याप्रमाणे भारतात पाकिस्‍तान, अफगाणिस्‍तान,  बांगलादेश अशा विविध देशांमधून पीडित हिंदू भारतात पळून येतात; कारण त्‍यांना आश्रय मिळण्‍यासारखी ही एकमेव जागा आहे. हाही देश हिंदु राहिला नाही, तर हिंदूंनी जायचे कुठे ? हिंदूंना इतर कुठलाही देश ‘मातृभूमी’ म्‍हणून उपलब्‍ध नाही. त्‍यामुळेच हिंदुस्‍थान हा हिंदु राहिला पाहिजे. त्‍यासाठी हिंदु धर्मश्रद्धा आणि त्‍याच्‍या खुणा जपल्‍या पाहिजेत, तसेच त्‍यांच्‍यावर आक्रमण करणार्‍यांच्‍या विरुद्ध ठामपणे उभे राहिले पाहिजे. मग त्‍यात अंधश्रद्धा निर्मूलन नावाचे नाटकही येते; कारण ते दाखवायला अंधश्रद्धा निर्मूलन आहे. व्‍यावहारिक पातळीवर पाहिले, तर ते हिंदु धर्म आणि हिंदु समाज यांच्‍या श्रद्धांवरील आक्रमण आहे. त्‍यामुळे ते हाणून पाडले पाहिजे.

५. हिंदु हा जगात एकमेव शास्‍त्रीय आणि वैज्ञानिक धर्म !

या तथाकथित बुद्धीवाद्यांनी एक गोष्‍ट लक्षात घ्‍यावी. गदिमांनी (ग.दि. माडगूळकर यांनी) ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा’, ही रामायणावर आधारित ओळ लिहून ठेवलेली आहे. प्रभु राम हा विष्‍णुचा अवतार होता. तो मानवाच्‍याच पोटी जन्‍माला आल्‍यानंतर पुत्र मानवाचा होतो. आणि त्‍याला त्‍या सर्व भोगातून जावे लागते. त्‍यात चमत्‍कार नसतो. प्रभु रामचंद्र हा ईश्‍वराचा अवतार असला, तरी त्‍याला त्‍या सर्व घटनाचक्रातून जावेच लागले. हे हिंदु देवतांचे सर्वांत मोठे वास्‍तववाद, शास्‍त्र आणि विज्ञान आहे. श्रीराम, श्रीकृष्‍ण हे सर्व देव आहेत; पण त्‍यांनाही मानवी जीवनात येणार्‍या अडीअडचणींना वैज्ञानिकदृष्‍ट्या आणि वस्‍तूनिष्‍ठपणेच सामोरे जावे लागले. असे कुठल्‍याही धर्मात नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदु धर्मात ईश्‍वर म्‍हणून जो जन्‍म घेतो, त्‍यालाही पुत्र मानवाचा म्‍हणून जगावे लागते. हे शाम मानव यांनी लक्षात घेतले पाहिजे; कारण मनुुष्‍य पराधीन असतो आणि रामही मानवाच्‍या पोटी जन्‍माला आला, तर तोही पराधीन असतो; म्‍हणून तोही संकटातून कुठल्‍या तरी चमत्‍काराने बाहेर काढावे, असा प्रयत्न करतो.

६. इंदिराजींची ‘गरिबी हटाव’ घोषणा आणि तथाकथित विकासाचे प्रकल्‍प ही अंधश्रद्धाच !

तुम्‍ही कुठले राजकारण आणि वैचारिकता घेऊन बसले आहात. ‘गरिबी हटाव’ या इंदिरा गांधी यांनी दिलेल्‍या घोषणेला आता ५० वर्षे उलटून गेली, तरीही महागाई आणि गरिबी वाढली; म्‍हणून तोच काँग्रेस पक्ष बोलत असतो. मग इंदिराजींनी पसरवलेली ती अंधश्रद्धा नव्‍हती ? राजकारणात विविध आश्‍वासने दिली जातात. ती पाळली जात नाहीत. अनेक विकासाचे प्रकल्‍प पूर्ण केले जातात. तेथे रस्‍ता, तलाव, धरण काहीच नसले, तरी ती पूर्ण झाल्‍याची कागदपत्रे सिद्ध केली जातात. ती अंधश्रद्धा नाही का ? तुम्‍ही कशा कशाला अंधश्रद्धा आणि श्रद्धा म्‍हणणार आहात ? जेव्‍हा त्‍याचा धर्माशी संबंध जोडला जातो, तेव्‍हा ते हिंदु धर्मावर आक्रमण असते;  म्‍हणून त्‍याच्‍या विरुद्ध कंबर कसून उभे राहिले पाहिजे.

७. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य; पण त्‍यासारखी दुसरी अंधश्रद्धा नाही !

जेव्‍हा तुम्‍ही अंधश्रद्धा निर्मूलन म्‍हणता, तेव्‍हा मानवी जीवनातील सर्व अंधश्रद्धांच्‍या विरुद्ध उभे राहिले पाहिजे. आजची श्रद्धा ही उद्याची अंधश्रद्धा असू शकते. आम्‍ही शाळकरी वयात होतो, तेव्‍हा मच्‍छर वाढू नये; म्‍हणून सगळीकडे ‘डीडीटी’ नावाची भुकटी (पावडर) टाकली जायची. आज त्‍या ‘डीडीटी’ला प्राणघातक म्‍हणून प्रतिबंध घालण्‍यात आला आहे. मग ५० वर्षांपूर्वीची वैज्ञानिक श्रद्धा ही आजची अंधश्रद्धा झाली  नाही का ? तेव्‍हा अंधश्रद्धेची व्‍याख्‍या करावी लागेल, उगाच उपटसुंभपणा करून चालणार नाही. शाम मानव यांनी लक्षात घ्‍यावे की, तोही मानवाचा पुत्र आहे अन् त्‍यांच्‍याही बुद्धीला मर्यादा आहे. ‘हा चमत्‍कार सिद्ध करा’, ‘तो तुमच्‍या पद्धतीने सिद्ध करा’, असे तुम्‍ही आव्‍हान देता, तेव्‍हा तुमचे विज्ञानही परिपूर्ण नाही, हे पहिले लक्षात घ्‍या. ‘डीडीटी’ हे त्‍या काळापर्यंत उत्तम उपायकारक किवा रोगप्रतिकारक होते; पण आज ते आपयकारक मानले जाते, म्‍हणजे तेव्‍हाचे वैज्ञानिक भामटे किंवा अंधश्रद्धा मानणारे होते का ? आज त्‍याच्‍या पुढे आपण आलो आहे. त्‍यामुळे सत्‍य आणि विज्ञान ही सापेक्ष असते. या निसर्गाची किंवा जगाची शेकडो अशी रहस्‍ये आहेत, जी आजही आपल्‍याला उलगडलेली नाहीत. त्‍यामुळे विज्ञान परिपूर्ण कदापि नाही. ते परिपूर्ण नसते, किंबहुना जे अनाकलनीय आणि चमत्‍कारीक आहे, त्‍याचा शोध घेण्‍यातून विज्ञान सिद्ध होत असते. त्‍याचा शोध ज्‍यांना लागलेला नाही, त्‍याची जाणीव ज्‍यांना झालेली नाही, ते अंधश्रद्धा निर्मूलन करायला निघाले आहेत. यासारखी दुसरी अंधश्रद्धा नाही. जे विज्ञानाला परिपूर्ण समजतात, ‘विज्ञानाला जे समजले तेच शेवटचे ज्ञान आहे’, असे समजतात, त्‍यासारखे अंधश्रद्ध दुसरे कुणी नाहीत; म्‍हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निर्मूलन हे सर्वांत मोठे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य असेल, असे मला वाटते.’

(समाप्त)

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्‍येष्‍ठ पत्रकार, मुंबई

(साभार : ‘प्रतिपक्ष’ यू ट्यूब वाहिनी)