नुकतेच अंनिसचे शाम मानव यांनी बागेश्वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांना ‘चमत्कार दाखवा आणि ३० लाख रुपये बक्षीस मिळवा !’, असे आवाहन केले होते. यावर शाम मानव यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य किती थोतांड आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळी राबवण्यामागे नेमके काय षड्यंत्र आहे, याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.
१. विदेशी पैशाच्या साहाय्याने केवळ हिंदु धर्माच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळी राबवण्यामागे षड्यंत्र !
‘मी अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही आणि धार्मिक कर्मकांडावरही माझा विश्वास नाही; पण जेव्हा एखादा धर्म किंवा समाजघटक यांच्या श्रद्धांमध्ये अंधश्रद्धा शोधून त्यावर आक्रमणे चढवली जातात किंवा त्याविरुद्ध चळवळी चालवल्या जातात, तेव्हा त्याविरुद्ध आवाज उठवणे मला भाग पडते. मी हिंदु आहे. त्यामुळे जेव्हा केवळ हिंदु श्रद्धा आणि धर्मश्रद्धा यांवरच पद्धतशीरपणे आघात करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्याची नोंद घेऊन अशा लोकांना रोखणे मला अगत्याचे वाटते. हे मी एवढ्यासाठी अगत्याने सांगतो की, दाभोलकरांच्या हत्येला आता १० वर्षे होऊन गेली आहेत. त्यांच्याविषयी किती काहूर माजवले, हे नव्याने सांगायला नको. त्या हत्येचे मी अजिबात समर्थन करणार नाही; पण या सर्व चळवळी नेमक्या हिंदु धर्माविरुद्धच का असतात ? आणि त्यालाच माध्यमांतून एवढी ठळक प्रसिद्धी का मिळते ?
ज्या ज्या वाहिन्यांवर अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठमोठे पाठ शिकवले जातात किंवा पांडित्य सांगितले जाते, त्यांवर अनेक अंगारे-धुपारे सांगणार्या अन्य धर्माच्या बुवाबाज लोकांविषयी बोलले जात नाही. सर्वांत ठळकपणे सांगायचे झाले, तर जागतिक पातळीवरील अनेक वैद्यक तज्ञांनी ‘भारतरत्न’ दिलेल्या मदर तेरेसा यांचेही चमत्कार खोटे असल्याचे म्हटले होते. किंबहुना त्यांनी चमत्कार केले; म्हणूनच त्यांना रोमन कॅथॉलिक चर्चच्या पोपकडून ‘संत’ ही उपाधी देण्यात आली. त्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलनवाले, पुरोगामी आणि ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्षतावादी) चकार शब्द बोलणार नाहीत. फार कशाला दैनिक ‘लोकसत्ता’चे प्रकाडपंडित पुरोगामी संपादक गिरीश कुबेर यांनी मदर तेरेसा यांच्यावर ‘असंतांचे संत’ असा अग्रलेख लिहिला; पण त्यांनी तो शेपूट घालून मागे घेतला होता. ही भारतीय पुरोगामित्वाची साक्ष आहे. त्याचे कारण सरळ आहे. ‘मिशनरी बॅकिंग रोमन कॅथॉलिक चर्च’ हे अतिशय साळसूदपणे इतर धर्मियांच्या विरोधातील चळवळी चालवणार्यांना आर्थिक रसद पुरवतात, हे लपून राहिलेले नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अशा प्रकारे चळवळी चालवणार्यांना (एन्.जी.ओ. म्हणजेच स्वयंसेवी संस्थांना) ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे येतात, ते पैसे योग्य ठिकाणी व्यय केले कि नाही ? त्याचा हिशोब देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. हे हिशोब कित्येक वर्षे दिले गेले नव्हते. त्यांना विदेशातून पुढील विधी येण्यावर प्रतिबंध घालण्यात आला. त्या सूचीत डॉ. दाभोलकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीही होती, ज्यांनी वर्षानुवर्षे ‘फोर्ड फाऊंडेशन’, ‘रॉकफेलर फाऊंडेशन’, अशा विदेशी संघटनांकडून येथील कार्यासाठी डॉलर्सच्या रूपात पैसे आणले होते; पण भारत सरकारला हिशोब दिले नाहीत. त्यामुळे त्यांना ‘पुढील निधी आणता येणार नाही’, असा निर्बंध घालण्यात आला.
२. वैज्ञानिक अंधश्रद्धा पसरवणार्यांना जाब विचारण्याचे धाडस अंधश्रद्धा निर्मूलन समित्यांमध्ये का नाही ?
हे मी आज एवढ्यासाठी सांगत आहे; कारण अशा प्रकारे हिंदु समाजाची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तोही हाणून पाडला पाहिजे. आज बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांच्या चमत्काराविषयी मोठी चर्चा चालू आहे. माझ्या अशा चमत्कारांवर विश्वास नाही आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे; पण तो आवाज कुणी उठवायचा ? आणि पक्षपातीपणे आवाज उठवला, तर त्याच्या विरुद्धही आवाज उठवला पाहिजे. ‘डोक्याला हात लावल्याने रोगराई संपुष्टात येते’, असे चमत्कार अगदी विज्ञापनाचे कार्यक्रम म्हणून विविध वाहिन्यांवर दाखवले जातात. त्याविरुद्ध या अंधश्रद्धा निर्मूलन समित्या किती काम करतात ?
धर्माची अंधश्रद्धा असेल आणि वैज्ञानिक जाणिवा जागृती वाढवायची असेल, तर वैज्ञानिक अंधश्रद्धेचे काय करायचे ? या शाम मानव यांनी वैज्ञानिक किंवा शास्त्रीय अंधश्रद्धा यांविषयी कधी आवाज उठवला आहे ? डॉ. श्रीराम लागू यांनी वेदनाशामक गोळीचे विज्ञापन केले होते. त्यावर वैद्यकीय परिषदेने (मेडिकल कौन्सिलने) आक्षेप घेतला होता. तेव्हा डॉ. लागू म्हणाले होते, ‘‘मॉडेलिंग करणे, हा माझा धंदा आहे आणि त्यासाठी वैद्यकीय परिषदेने माझी पदवी काढून घेतली, तरी चालेल.’ याला बुवाबाजी म्हणता येत नाही ? शासकीय पातळीवर वेदनाशामकचे विज्ञापन करायचे, जे वैज्ञानिक आणि वैद्यकीय शास्त्र नाही, तरीही ‘माझा व्यवसाय आहे’, असे म्हणून करायचे आणि परत अंधश्रद्धा निर्मूलन समितीतही जायचे. हीही बुवाबाबांसारखीच ढोंगबाजी असते. आज बागेश्वर धामच्या पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांकडे शाम मानव पुरावे मागतात, तेव्हा त्यांनी डॉ. लागू यांच्याकडे पुरावा मागितला होता का ? ‘नाही’ मागितला. त्यांना ना दाभोलकरांनी विचारले, ना शाम मानव विचारणार.
हे सगळे या मठाधिशांच्या मागे लागतात, ज्यांच्यावर आघात करणे पुरोगामी व्यवस्थेत सोपे असते; पण ज्या मोठमोठ्या औषधनिर्मिती आणि रसायन आस्थापने यांना टक्कर देऊ शकतील, त्यांच्याशी टक्कर घेण्याचे यांचे धाडस नाही; कारण त्यांनी ज्या कॅथॉलिक चर्च वगैरेंना विविध फाऊंडेशन अन् ट्रस्ट यांच्या माध्यमातून देणग्या दिलेल्या असतात, त्यातूनच यांना आर्थिक साहाय्य मिळत असते. हे मला मुद्दाम मांडावे लागते; कारण ते आवश्यक आहे. मी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यासारख्यांचा समर्थक नाही; पण त्यातल्या त्यात ते दुबळे आहे; म्हणून त्यांच्यावर आक्रमण करायचे आणि यातील समर्थ असलेल्यांकडे डोळेझाक करायची, हे योग्य नाही. गिरीश कुबेर यांनी नाही का, ‘असंतांचे संत’ हा अग्रलेख कुठलाही खुलासा न देता मागे घेतला. आपला अग्रलेख कुठे चुकला ? आणि का चुकला ? याचा खुलासा त्यांनी कुठेही केला नाही. भारताच्याच नाही, तर जगाच्या इतिहासात हे पहिले संपादक असतील की, ज्यांनी अग्रलेख मागे घेतला; पण त्याचा खुलासाही केला नाही. हे पुरोगामित्व आहे.
३. हिंदूंच्या सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आक्रमण करणार्यांच्या विरुद्ध हिंदूंनी ठामपणे उभे रहाणे आवश्यक !
एखादा बुवा जादुटोणा किंवा दैवी चमत्कार करत असेल, तर तो जितका खोटा असतो, तेवढेच लोकांच्या मनात विज्ञान आणि वैद्यकशास्त्र यांच्या दृष्टीने अंधश्रद्धा निर्माण करणारेही असतात. ‘अमूक तमूक क्रिम लावली की, गोरेपणा येतो’ अशा विज्ञापनांविरुद्ध श्याम मानव का नाही उभे रहात ? गोरेपणाची विज्ञापने देणार्या रसायनिक, कॉस्मेटिक आणि औषधी आस्थापनांच्या विरुद्ध आवाज कोणी उठवायचा ? लोकांच्या मनात त्यांच्या त्वचेच्या रंगाविषयी असलेल्या न्युनगंडातून हा कोट्यवधीचा व्यापार उभा केला जातो. ‘आपला कृष्णवर्ण जाऊ शकतो’, हीही अंधश्रद्धाच आहे. एखादे रसायन किंवा क्रिम यांनी त्वचेचा रंग पालटणे अशक्य आहे; कारण हेही शास्त्र आहे. त्यासाठी मात्र श्याम मानव किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले कधी उभे रहाणार नाहीत. मग ते यांच्याच (साधुसंत) विरुद्ध उभे रहातात; कारण त्यांचे आर्थिक हितसंबंध हे हिंदु धर्माच्या कुठल्याही श्रद्धांना अंधश्रद्धा ठरवण्यामागे गुंतलेले आहे.
मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलले की, ‘पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादुटोणा केला आहे किंवा लिंबू फिरवले आहे.’ तेव्हा हे लोक लगेच बावणकुळे यांच्यावर जादुटोणा कायद्यानुसार गुन्हा प्रविष्ट करण्यास धावले. भाषण करतांना ‘जादुटोणा’ हा शब्द बोलला, तरीही कायद्याचा भंग होतो. मग या वैज्ञानिक आणि शास्त्रीय अंधश्रद्धांच्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती का काम करत नाही; कारण केवळ गल्लीबोळ्यातील बुआ-महाराजांना छळण्यात धंदा असतो.
‘कुठले तरी येशूचे रक्त प्यायल्याने रोगराई बरी होते; म्हणून ख्रिश्चन व्हा’, असा धर्मांतराचा प्रकार नुकताच पुणे जिल्ह्यात कुठेतरी ऐकायला मिळाला. तेव्हा ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठे होती ? का नाही त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला जात ? कुठल्याही स्वरुपाचे धर्मांतर करून कोणतीही रोगराई किंवा माणसाची परिस्थिती पालटत नाही. हीही एक शास्त्रीय वस्तुस्थिती आहे. मग ‘धर्मांतर करा, सगळे बरं होईल’, या ज्या कल्पना डोक्यात घातल्या जातात किंवा गोरेपणा येण्यासाठी औषधी आस्थापना विज्ञापने करतात, त्याच्या विरुद्ध कोणी आवाज उठवायचा ? येथे समजते की, कुठलाही धर्म आणि कोणतीही बुआबाजी असो, गोरे करणार्या क्रिमचा धंदा किंवा वेदनाशामक वगैरे सांगणारा धंदा असो, ही सर्व बुआबाजी आणि अंधश्रद्धा असते आणि या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारेही अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये असतात, काय विनोद आहे ! (क्रमशः)
– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/651728.html