‘ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ म्हणजेच ‘बीबीसी’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बनवलेल्या माहितीपटाचा वाद गेले काही दिवस चालू आहे. वर्ष १९२२ मध्ये जनतेच्या पैशांतून ब्रिटिशांचे मुखपत्र म्हणून चालू झालेली ही वृत्तवाहिनी सार्वजनिक क्षेत्रात मोडते. इंग्लंडची सध्याची परिस्थिती काय आहे ? तेथे मंदीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मंदी रोखता न आल्यामुळे महागाई प्रचंड वाढली. परिणामी त्यांना त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते. दुसरा मोठा प्रश्न म्हणजे ऊर्जेचे मोठे संकट सध्या इंग्लंडवर निर्माण झाले आहे. पर्यावरणरक्षणाच्या हेतूने इंग्लंडने दगडी कोळशावर आधारित वीज उत्पादन करणारे कारखाने काही दिवस बंद केले खरे; मात्र तेथे ऊर्जा संकटाने गंभीर रूप धारण केल्यावर ते पुन्हा चालू करण्याची वेळ आली. ब्रिटनच्या राजघराण्यात दोन राजपुत्रांमध्ये मारहाण केल्याचा वाद चालू आहे आणि राजघराण्यातील वेगवेगळे वाद चव्हाट्यावर येत आहेत. एवढ्या गहन प्रश्नांनी इंग्लंडची दु:स्थिती पुरती अधोरेखित होत असतांना तिकडे लक्ष देण्याऐवजी ब्रिटनच्या सरकारी वृत्तवाहिनीला भारताची चिंता असणे अनाकलनीय आहे.
बीबीसीचा पूर्वग्रहदूषित माहितीपट
बीबीसीने पंतप्रधान मोदी यांच्यावर ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ हा २ भागांमधील माहितीपट (डॉक्युमेंट्री) बनवला आहे. १७ जानेवारी या दिवशी या माहितीपटाचा पहिला भाग बीबीसीने प्रसारित केला आणि त्यातील मांडणीवरून वाद चालू झाला. या माहितीपटाचा आशय ‘वर्ष २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेली जातीय दंगल आणि त्यामध्ये असलेला तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग’, हा आहे. गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये धर्मांधांनी कारसेवकांना घेऊन जाणार्या रेल्वेच्या २ डब्यांना आग लावली आणि त्यामध्ये ५९ कारसेवक जळून मृत्यूमुखी पडले. यानंतर उसळलेल्या दंगलीत अनेकांचे मृत्यू झाले. ‘या दंगलीमध्ये हिंदूंनी मुसलमानांवर आक्रमणे केली. मुसलमानांविरुद्ध भडकावण्यात आलेल्या हिंसेमध्ये नरेंद्र मोदी यांचा सहभाग होता’, असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न बीबीसीने केला आहे. वस्तूस्थितीचा विचार केला, तर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना केंद्रात काँग्रेस सत्तेवर होती. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ‘विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.)’ स्थापन करण्यात आले होते. या पथकाने ‘दंगलीत नरेंद्र मोदी यांच्या सहभागाविषयी कोणताही पुरावा आढळला नाही’, असे सांगितले होते. परिणामस्वरूप सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी यांना दंगलीतील सहभागाच्या आरोपातून ‘क्लिनचीट’ दिली होती. केंद्रात काँग्रेसचे सरकार, सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लिनचीट’ एवढे होऊनही बीबीसीला सध्याच्या घडीला जगातील शक्तीशाली व्यक्तीमत्त्वांपैकी एक असलेले, सर्वाधिक लोकप्रियता मिळालेले नरेंद्र मोदी यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी केलेली धडपड निषेधार्हच आहे.
उघडा डोळे बीबीसीचे !
बीबीसीचा माहितीपट ‘हिंदूंकडून मुसलमानांवर अन्याय होतो’, या खोट्या कल्पनेवर आधारित आहे आणि नरेंद्र मोदी हिंदूंचे नेते अथवा पंतप्रधान आहेत; म्हणून त्यांना आरोपी ठरवण्यासाठी या माहितीपटाचा वापर करण्यात अधिक रस आहे, असे दिसते. काँग्रेस सत्तेवर असतांनाच वर्ष १९९० मध्ये सहस्रो काश्मिरी हिंदूंचे भयावह हत्याकांड झाले, साडेचार लाख काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडून पलायन करावे लागले. तेव्हा बीबीसीला ‘मुसलमानांनी हिंदूंवर अत्याचार केले आणि काँग्रेस पहात राहिली’, याविषयी माहितीपट बनवावा वाटले नाही. ‘शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवर प्रतिदिन होणारे अनन्वित अत्याचार आणि त्यांचे नरकमय जीवन यांसाठी तेथील मुसलमान शासनकर्त्यांना उत्तरदायी धरावे’, असे वाटले नाही. ‘केरळमध्ये साम्यवादी सरकारच्या काळात तेथील शेकडो हिंदुत्वनिष्ठांची हत्या झाली, याविषयी साम्यवाद्यांना उत्तरदायी धरावे’, असे वाटले नाही. याचाचा अर्थ ‘बीबीसीला केवळ नरेंद्र मोदी यांनाच गुन्हेगार ठरवायचे नसून बहुसंख्य हिंदु समाजाला गुन्हेगार ठरवायचे आहे’, असे दिसते. काँग्रेसच्या सत्ताकाळात हिंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी बीबीसीला काही अडचण नाही. गोध्रा येथे कारसेवकांना जिवंत जाळल्याविषयी बीबीसीचे काहीच म्हणणे नाही, म्हणजेच बीबीसीला हिंदूंवरील अत्याचार, त्यांच्या हत्या यांविषयीच काहीच देणे-घेणे नसून केवळ मुसलमानांचीच काळजी घ्यायची आहे. ज्या जिहादी घटकांची तळी त्यांना उचलून धरायची आहे, त्यांनीच सध्याच्या इंग्लंडला हातचे बाहुले बनवण्याचा, इंग्लंडची जी काही सभ्य (?) संस्कृती म्हटली जाते, तिलाच खिंडार पाडण्यास प्रारंभ केला आहे. ‘रेप जिहाद’द्वारे शेकडो अल्पवयीन ब्रिटीश मुलींचे आयुष्य तेथील जिहाद्यांनी उद़्ध्वस्त केले आहे. इंग्लंडमधील काही भागांत त्यांची दादागिरी एवढी वाढली आहे की, ब्रिटीश पोलीस त्यांच्यासमोर हतबल आहेत. तेथील भारतियांना असुरक्षित वाटत आहे. तेथे जिहादी उघडपणे ‘इस्लाम न मानणार्यांना ठार करा’, असे फलक मोर्च्यामध्ये घेऊन फिरू शकतात. इंग्लंडचे इस्लामीकरण वेगाने चालू झाले असून ब्रिटीश शासनकर्त्यांना याविषयी काही न वाटणे हीच आश्चर्याची गोष्ट आहे. तेव्हा बीबीसीने जग सुधारण्याचा ठेका घेण्याऐवजी स्वत:च्या घरात काय चालले आहे ? ते प्रथम पहावे. एकेकाळी जगात बीबीसीचा डंका होता. तिची प्रतिष्ठा होती. ती परिस्थिती आता नाही. बीबीसी भलेही जगात माध्यमांमध्ये अग्रस्थानी असेल; मात्र तिची विश्वासार्हता राहिलेली नाही. ब्रिटनमध्येच बीबीसीवर बहिष्कार घालण्याच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. रशियानेही रशिया-युक्रेन युद्धाचे चुकीचे वार्तांकन केल्यामुळे बीबीसीला गाशा गुंडाळण्यास सांगितले. तेव्हा भारत सरकारने आता अधिक विलंब न करता देश आणि हिंदु यांविरोधी वाहिनीला भारताची द्वारे कायमची बंद करावीत, हीच अपेक्षा !
भारत आणि हिंदू यांविरोधी बीबीसी वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने त्वरित बंदी घालणे भारतियांना अपेक्षित ! |