गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील वैकुंठभूमीची (स्मशानभूमी) तात्काळ दुरुस्ती करा ! – नागरिकांचे निवेदन


गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – हिरण्यकेशी नदीकाठावरील वैकुंठभूमीची दुरवस्था झाली आहे. येथील काही दाहिन्या खराब झाल्याने काढून टाकल्या आहेत; परंतु तेथे अद्याप नवीन दाहिन्या बसवलेल्या नाहीत. यामुळे मृतदेहाच्या दहनाला अडचण होत आहे. स्मशानभूमीवरील पात्रही कोसळण्याच्या अवस्थेत आहे. स्मशानभूमीत विजेची व्यवस्था नाही. प्रवेशद्वार नादुरुस्त झाले आहे. तरी वैकुंठभूमीची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना देण्यात आले. प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. (रस्ते, वीज, पाणी यांप्रमाणेच स्मशानभूमीत चांगली व्यवस्था मिळणे, हाही नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. यासाठी निवेदन द्यावे लागणे आणि आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)
या प्रसंगी आप्पा शिवणे, संजय पाटील, राहुल नागवकर, राजू रोटे, सागर कुराडे, मनोज पवार, ज्ञानेश्वर खटावकर, संतोष पाटील, विश्वजित खोत आदींच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.