कारगिल युद्धास उत्तरदायी असलेले पाकचे माजी राष्‍ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ

दुबई – पाकिस्‍तानचे माजी राष्‍ट्रपती आणि सैन्‍यदलप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचे  निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुशर्रफ ८ मासांपासून आजारी होते. त्‍यांच्‍यावर दुबई येथे रुग्‍णालयात उपचार चालू होते. वर्ष १९९८ मध्‍ये परवेझ मुशर्रफ सैन्‍यदलप्रमुख झाले. वर्ष १९९९ मध्‍ये जनरल मुशर्रफ यांनी तत्‍कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पदच्‍यूत केले आणि ते पाकिस्‍तानचे हुकूमशहा बनले. सत्ता हाती घेताच नवाझ शरीफ यांना कुटुंबासह पाकिस्‍तान सोडावे लागले. मुशर्रफ यांनीच भारताच्‍या कारगिलवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी वर्ष १९९९ मध्‍ये आक्रमण केले होते.

सत्तेतून पायउतार झाल्‍यावर मुशर्रफ यांना देशांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला. ३ नोव्‍हेंबर २००७ या दिवशी देशात राज्‍यघटनेला स्‍थगिती देऊन देशात आणीबाणी लागू केल्‍याच्‍या प्रकरणात त्‍यांना विशेष न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्‍यांना देशद्रोही घोषित करण्‍यात आले होते. पाकमध्‍ये माजी सैन्‍याधिकार्‍याला देशद्रोही घोषित करून त्‍याला शिक्षा होण्‍याची ही पहिलीच वेळ होती. नंतर ही शिक्षा रहित करण्‍यात आली. मार्च २०१६ पासून दुबईत वास्‍तव्‍य करणारे मुशर्रफ यांना माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्‍याकांड आणि लाल मशिदीतील मौलवीच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणातही फरारी घोषित करण्‍यात आले होते.

(म्‍हणे) ‘मुशर्रफ शांततेची खरी शक्‍ती होते !’

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची वैचारिक दिवाळखोरी !

नवी देहली – कधी भारताचे कट्टर शत्रू राहिलेले परवेझ मुशर्रफ वर्ष २००२ ते २००७ या काळात शांततेची खरी शक्‍ती बनले होते, असे ट्‍वीट काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केले आहे. (मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठी भारतद्वेष्‍ट्यांचे उदात्तीकरण करणार्‍या काँग्रेसवाल्‍यांचे राजकीय अस्‍तित्‍व राष्‍ट्रप्रेमी संपवतील, हे निश्‍चित ! – संपादक) ‘मी संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये त्‍या काळात नेहमीच त्‍यांची भेट घेत असे. ते चतुर आणि मुत्‍सद्दी असून त्‍यांच्‍यात वैचारिक सुस्‍पष्‍टता आहे, हे माझ्‍या लक्षात आले होते’, असेही थरूर यांनी पुढे म्‍हटले आहे. थरूर यांच्‍या या ट्‍वीटवर भाजपने टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

भारताचा सतत द्वेष करणार्‍या आणि वर्ष १९९९ मध्‍ये कारगिल युद्ध घडवून आणणार्‍या मुशर्रफ यांच्‍याविषयी राष्‍ट्रघातकी काँग्रेसवालेच असे बोलू शकतात, यात आश्‍चर्य ते काय ?