साधनेच्‍या प्रयत्नांत खंड न पडण्‍यासाठी हे करा !

पू. संदीप आळशी

‘बरेच साधक साधनेचे प्रयत्न उत्‍साहाने आरंभ करतात; पण वेगवेगळ्‍या कारणांमुळे ते प्रयत्न खंडित झाल्‍यास त्‍यांचा उत्‍साह मावळून ते प्रयत्न करणेच सोडून देतात. असे त्‍यांच्‍या संदर्भात परत परत घडत रहाते. याचे मुख्‍य कारण म्‍हणजे, त्‍यांच्‍यात ‘साधनेचे प्रयत्न चिकाटीने करणे’, ही वृत्तीच निर्माण झालेली नसते. ही वृत्ती निर्माण होण्‍यासाठी प्रयत्नांत थोडेतरी सातत्‍य असावे लागते. यासाठी पुढील कृती उपयुक्‍त ठरू शकतात.

१. साधनेचे अनेक प्रयत्न करायचे असतात. यांपैकी आरंभी जे प्रयत्न आपण सहजपणे पूर्ण करू शकतो, तेवढेच प्रयत्न करायला आरंभ करावा. हे प्रयत्न काही काळ जमायला लागले की, त्‍यानंतरच पुढचे प्रयत्न करण्‍यास आरंभ करावा.

. जे प्रयत्न करायला आपल्‍याला आवडते, ते प्रयत्न करण्‍याचा मनाचा उत्‍साह असतो. यासाठी आरंभी असेच प्रयत्न निवडावेत.

३. ‘प्रयत्नांत सातत्‍य टिकावे’, यासाठी उपयुक्‍त ठरणारी स्‍वयंसूचना काही दिवस घ्‍यावी.

आपले दायित्‍व असलेल्‍या साधकांना स्‍वतःची स्‍थिती मोकळेपणाने सांगावी आणि त्‍यांना वरील प्रयत्नांविषयीही अवगत करावे. आरंभीच्‍या टप्‍प्‍यातील प्रयत्न जमू लागले आणि ‘प्रयत्नांत काही प्रमाणात तरी सातत्‍य निर्माण होत आहे’, असे जाणवू लागले की, त्‍यानंतरच हळूहळू पुढचे प्रयत्न करत रहावे.’

– (पू.) संदीप आळशी (२६.१२.२०२२)