कर्नाटक राज्‍यातील साधकांच्‍या साधनेचे सुकाणू हाती धरून त्‍यांना मार्गदर्शन करणारे सनातनचे ७५ वे समष्‍टी संत पू. रमानंद गौडा !

‘संत आणि गुरु यांची साधना, त्‍यांच्‍या तपस्‍येचे बळ, त्‍यांचा संकल्‍प’, आदींविषयी मी केवळ ग्रंथ अन् पुराणे यांमध्‍ये वाचले होते. मी लहान असतांना मला ‘अशा व्‍यक्‍तींसह रहावे आणि त्‍यांच्‍यासारखे व्‍हावे’, असे वाटायचे. ‘हे सर्व पूर्वी घडले असल्‍याने आता तसे अनुभवता येणे शक्‍य नाही’, असा विचार माझ्‍या मनात यायचा; परंतु आताही तशा काही घटना मला अनुभवता आल्‍या.

‘पूर्वी केवळ ऐकलेल्‍या अनुभूती संतांच्‍या सहवासात आजही येतात’, हे सनातन संस्‍थेत आल्‍यावर मला लहान लहान प्रसंगांतून लक्षात आले. अशा संतांपैकी एक म्‍हणजे, कर्नाटक राज्‍यातील साधकांच्‍या साधनेचे सुकाणू हाती धरलेले पू. रमानंदअण्‍णा गौडा ! मी त्‍यांच्‍या समवेत अनेक वर्षांपासून असूनही ‘त्‍यांच्‍याकडून काही शिकलो नाही’, याचा मला पश्‍चात्ताप होतो. अलीकडे ३ – ४ मासांत मला त्‍यांचे दिव्‍यत्‍व आणि व्‍यापकत्‍व जवळून अनुभवता आले. संतांचे किंवा गुरूंचे वर्णन करणे अशक्‍य आहे, तरीही माझ्‍या अल्‍प बुद्धीला जाणवलेले काही प्रसंग पुढे दिले आहेत.

पू. रमानंद गौडा

१. साधकांनी त्‍यांची कौटुंबिक कर्तव्‍ये योग्‍य प्रकारे पार पाडावीत, यासाठी त्‍यांना दृष्‍टीकोन देऊन कर्तव्‍याची जाणीव करून देणारे पू. रमानंदअण्‍णा !

एकदा सत्‍संगात एका साधकाच्‍या साधनेचा विषय चालू होता. तो साधक घरातील कोणतेच दायित्‍व घेत नाही आणि ते झटकून टाकतो’, हे पू. रमानंदअण्‍णांच्‍या लक्षात आले. त्‍या वेळी साधकाला दृष्‍टीकोन देतांना ते म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही घरातील कर्ते आहात. तुम्‍ही घर सांभाळले पाहिजे. तुम्‍हाला पुढाकार घेता आला पाहिजे. तुम्‍ही तुमची आई आणि पत्नी या दोघींमध्‍ये जवळीक निर्माण केली पाहिजे.’’ पू. अण्‍णांचे हे बोलणे ऐकून त्‍यांच्‍यातील प्रेमभाव, त्‍यांच्‍या बोलण्‍यातील ठामपणा आणि घरातील वडीलधारे असल्‍याप्रमाणे त्‍यांनी केलेले मार्गदर्शन, हे पाहून मला आश्‍चर्य वाटले. त्‍या वेळी ‘हाच आमचा सनातन परिवार !’ ‘हेच आमचे माता-पिता आणि हाच आमचा आधारस्‍तंभ !’, असे मला वाटले.

२. सहसाधकाकडून सेवेत पुनःपुन्‍हा चुका होत असल्‍याने ‘ती सेवा स्‍वतःच करावी’, असे साधकाला वाटणे आणि पू. रमानंदअण्‍णांच्‍या दृष्‍टीकोनातून साधकांच्‍या साधनेविषयी त्‍यांची तळमळ लक्षात येणे

श्री. प्रशांत हरिहर

एका साधकाकडून सेवेत तीच चूक पुनःपुन्‍हा होत असे. त्‍यामुळे ‘त्‍या साधकाकडून सेवा करून घेण्‍यापेक्षा ती सेवा मीच करावी’, असा विचार माझ्‍या मनात येत असे. याविषयी मी पू. अण्‍णांना सांगितले. तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही ती सेवा करणे योग्‍य असले, तरी त्‍या साधकाला त्‍याचे स्‍वभावदोष आणि चुका यांची जाणीव करून दिल्‍यास अन् त्‍याने सेवेत सुधारणा केल्‍यास त्‍याच्‍यात गुणवृद्धी होईल ! त्‍याने ती सेवा करायला शिकले पाहिजे, तर त्‍याला साधनेचा लाभ होईल !’’ त्‍या वेळी मला माझा चुकीचा दृष्‍टीकोन आणि माझ्‍यातील संकुचित विचार यांची लाज वाटली.

३. पू. अण्‍णांनी झोपण्‍यापूर्वी साधकांच्‍या रक्षणासाठी संपूर्ण मंगळुरू येथील साधकांच्‍या निवासस्‍थानाभोवती सूक्ष्मातून मंडल घालणे आणि हे पाहून साधकाला त्‍यांच्‍याविषयी कृतज्ञता वाटणे

एकदा आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांविषयी सांगत असतांना पू. अण्‍णांनी अकस्‍मात् सांगितले की, झोपण्‍यापूर्वी ते साधकांच्‍या निवासस्‍थानाभोवती सूक्ष्मातून एक मंडल घालतात. त्‍यानंतर ‘त्‍यांच्‍या खोलीभोवती आणि नंतर त्‍यांच्‍या झोपण्‍याच्‍या जागी ते देवतेच्‍या नामजपाचे मंडल घालतात. ते ऐकून मला पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले आणि ‘पू. अण्‍णांचा विचार किती व्‍यापक आहे. त्‍यांच्‍यामुळेच आम्‍ही सर्व जण सुरक्षित आहोत’, असे मनात येऊन त्‍यांच्‍याविषयी कृतज्ञता वाटली.

४. पू. रमानंदअण्‍णांना सर्व साधकांच्‍या स्‍थितीविषयी आतूनच समजणे

पू. रमानंदअण्‍णा सतत सेवेत व्‍यस्‍त असतात. मंगळुरूतील साधकांविषयी त्‍यांना कुणी काही सांगितलेले नसले, तरी त्‍यांना साधकांच्‍या स्‍थितीविषयी सर्वकाही ठाऊक असते. हा अनुभव मला अनेकदा आला आहे.

५. पू. अण्‍णांच्‍या खोलीत झोपल्‍यावर मनातील अनावश्‍यक विचार ५० टक्‍के न्‍यून होणे

मला पू. अण्‍णांच्‍या खोलीत झोपण्‍याची संधी मिळाली. काही दिवसांपासून आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करतांना माझ्‍या मनात अनावश्‍यक विचारांची मालिका चालू होत होती आणि माझे मन त्‍या विचारांमध्‍ये गुरफटून जात होते. पू. अण्‍णांच्‍या खोलीत झोपल्‍यावर पहिल्‍याच दिवशी माझा त्रास ५० टक्‍के न्‍यून झाला. तेथे मला शांतीची अनुभूती आली.

६. साधनेचे गांभीर्य निर्माण करणारे पू. अण्‍णांचे स्‍फूर्तीदायी विचार !

काही वेळा पू. अण्‍णा कथेच्‍या माध्‍यमातून किंवा अन्‍य उदाहरणे देऊन साधकांमध्‍ये साधनेचे गांभीर्य ठसवतात आणि साधनेसाठी स्‍फूर्ती देतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

६ अ. मायारूपी समुद्रात अडकलेल्‍या साधक-जिवाला गुरुरूपी जहाजाचाच आधार ! : साधक गोंधळलेल्‍या स्‍थितीत असतांना, म्‍हणजे मायेत अडकलेला असतांना मायारूपी समुद्रात अडकलेल्‍या साधकाला गुरुरूपी जहाजाचाच आधार असतो !

६ आ. साधकांना शिस्‍त लावून आणि प्रायश्‍चित्त घ्‍यायला लावून त्‍यांच्‍याकडून साधना करून घेणे आवश्‍यक ! : काही वेळा स्नान करण्‍याची इच्‍छा नसणार्‍याला तलावाच्‍या काठावर नेऊन पाण्‍यात ढकलावे लागते. पाण्‍यात पडल्‍यावर तो आपोआप स्नान करूनच वर येतो. त्‍याचप्रमाणे साधकांना ‘साधना व्‍यवस्‍थित करा’, असे कितीही सांगितले आणि ते व्‍यवस्‍थित साधना करत नसले, तर त्‍यांना शिस्‍त लावून आणि प्रायश्‍चित्त घ्‍यायला लावून त्‍यांच्‍याकडून साधना करून घ्‍यावी लागते.’

पू. रमानंदअण्‍णा यांच्‍यासारख्‍या संतांचा सहवास देणार्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू, कर्नाटक. (१२.११.२०२०)


साधकांना साधना चांगली करण्‍यासाठी प्रेरणा देणारे पू. रमानंद गौडा !

‘२७.१.२०२२ या दिवशी सनातनचे कर्नाटक येथील संत पू. रमानंद गौडा यांचे साधकांसाठी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन होते. त्‍या वेळी त्‍यांनी आम्‍हा साधकांना स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्‍याविषयी मार्गदर्शन केले. साधकांच्‍या प्रश्‍नांना त्‍यांनी अतिशय सुंदर उदाहरणे देऊन त्‍यांना अंतर्मुख केले आणि साधकांना साधना वाढवण्‍यासाठी प्रेरणा दिली.

१. पू. रमानंदअण्‍णा यांनी केलेल्‍या मार्गदर्शनातील काही महत्त्वपूर्ण सूत्रे 

सौ. सुजाता रेणके

१ अ. योग्‍य साधना करण्‍याचे महत्त्व : पू. रमानंदअण्‍णांनी सांगितले, ‘साधना चांगल्‍या प्रकारे केल्‍यास साधक कर्मफळांतून मुक्‍त होऊ शकतात; म्‍हणून साधना योग्‍य प्रकारे करायला हवी. एकदा अंतर्मनात साधना करण्‍याचा निश्‍चय झाला की, साधनेची चिकाटी वाढते. ‘साधनेसाठी मी कसे प्रयत्न करू ?’, याचा ध्‍यास लागणे, म्‍हणजे अंतर्मुखता येणे. भूतकाळात जाणे, म्‍हणजे विकल्‍पात जाणे होय. सतत नकारात्‍मक विचार केल्‍यामुळे साधना व्‍यय होते.

१ आ. साधना ही शरिरासाठी नाही, तर आत्‍म्‍यासाठी केली जाते ! : साधना शरिरासाठी नाही, तर आत्‍म्‍यासाठी केली जाते. याचे एक सुंदर उदाहरण आहे. फ्रान्‍समधील एक साधिका पुष्‍कळ तळमळीने साधना करते. तिची परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंवर पुष्‍कळ श्रद्धा आहे. तिला कर्करोग झाला. तेव्‍हा तिचे जवळचे नातलग आणि मैत्रिणी तिला म्‍हणाल्‍या, ‘‘तू इतकी साधना करतेस. तुझी देवावर एवढी भक्‍ती आहे, तर मग तुला असाध्‍य रोग का झाला ?’’ तेव्‍हा ती म्‍हणाली, ‘‘मी शरिरासाठी साधना करत नाही, तर माझ्‍या आत्‍म्‍यासाठी करते.’’

१ इ. साधना, म्‍हणजे अंतर्मनात पालट होण्‍यासाठी सारणी लिखाण करणे आवश्‍यक ! : साधना करणे, म्‍हणजे अंतर्मनात पालट करणे होय. त्‍यासाठी सारणी लिखाण (स्‍वतःकडून झालेल्‍या चुका सारणीत लिहून त्‍या पुनःपुन्‍हा होऊ नयेत; म्‍हणून मनाला योग्‍य सूचना देणे) केले पाहिजे. सारणी लिखाण मनापासून केल्‍याने मन सतत जागृत रहाते आणि चुका होतांनाच चुकांंची जाणीव होऊन त्‍या टाळल्‍या जातात. ‘ज्‍या दिवशी साधकांकडून सारणी लिखाण झालेले नसते, त्‍या दिवशी स्‍वतःला झोप लागू नये’, असे त्‍यांना वाटायला पाहिजे.’

१ ई. ‘गुर्वाज्ञा म्‍हणून सारणी लिखाण करणे’, हीच आताच्‍या घडीची साधना ! : आपण अखंड साधनेत राहून गुर्वाज्ञेचे पालन केले पाहिजे. ‘परिस्‍थिती कशी आहे ?’, यापेक्षा ‘गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) मला काय सांगत आहेत ?’, हे महत्त्वाचे आहे. कितीही कठीण प्रसंग आले, तरी ‘गुर्वाज्ञा म्‍हणून सारणी लिखाण करणे’, हीच आताच्‍या घडीची साधना आहे.

 २. पू. रमानंदअण्‍णांना तेच प्रश्‍न पुनःपुन्‍हा विचारूनही त्‍यांनी अत्‍यंत शांतपणे आणि समाधानकारक उत्तरे देणे

मी पू. रमानंदअण्‍ण यांना शारीरिक अडचणींच्‍या संदर्भात प्रश्‍न विचारले. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक ग्रंथ आणि प्रवचने यांमधून या प्रश्‍नांची उत्तरे सांगितली आहेत. असे असूनही आम्‍ही काही साधक पू. रमानंदअण्‍णांना तेच प्रश्‍न पुनःपुन्‍हा विचारत होतो, तरीही त्‍यांनी आम्‍हाला समाधानकारक आणि अतिशय सुंदर उदाहरणे देऊन सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली. यातून ‘संत हे ईश्‍वराचे सगुण रूप आहेत; म्‍हणूनच ते प्रत्‍येक प्रश्‍नाचे उत्तर सहजतेने आणि शांतपणाने देतात’, असे माझ्‍या लक्षात आले.

३. अनुभूती – पू. रमानंद अण्‍णांमधील ‘नम्रता’ आणि ‘प्रीती’ यांमुळे ते बोलत असतांना ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरच बोलत आहेत’, असे मला जाणवत होते.

कृतज्ञता : ‘हे गुरुदेवा, तुम्‍ही माझ्‍यासारख्‍या एका सामान्‍य जिवाला अडचणींच्‍या वेळी संतांचा सहवास देऊन माझी प्रत्‍येक अडचण आणि नकारात्‍मक विचार यांतून मला बाहेर काढता. पू. रमानंदअण्‍णा यांच्‍या मार्गदर्शनामुळे आम्‍हा सर्व साधकांना साधनेची प्रेरणा मिळाली. यासाठी परात्‍पर गुरुदेव आणि पू. रमानंदअण्‍णा यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सुजाता अशोक रेणके, फोंडा, गोवा. (३१.१.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.