एम्.पी.एस्.सी. परीक्षा पद्धतीतील पालट वर्ष २०२५ पासून लागू होतील ! – राज्‍यशासनाचा निर्णय

पुणे, ३१ जानेवारी (वार्ता.) – एम्.पी.एस्.सी. परीक्षा पद्धतीमध्‍ये आयोगाकडून केलेले पालट हे वर्ष २०२३ ऐवजी वर्ष २०२५ पासून लागू करणार असल्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला. येथील अलका चौकातील विद्यार्थ्‍यांच्‍या अराजकीय ‘साष्‍टांग दंडवत्’ या आंदोलनाला यश मिळाले आहे. ‘तलाठी’ या पदाचीही भरती एम्.पी.एस्.सी. परीक्षेद्वारेच करावी, अशीही मागणी या वेळी करण्‍यात आली आहे.

एम्.पी.एस्.सी.चा नवीन अभ्‍यासक्रम वर्ष २०२५ मध्‍ये लागू करण्‍यात यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्‍यांनी यापूर्वीही आंदोलन केले होते. या मागणीसाठी विद्यार्थी अलका चौकामध्‍ये उपोषणाला बसले होते. विद्यार्थी रस्‍त्‍यावर आल्‍यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाशिव खोत हे त्‍यांना पाठिंबा देण्‍याकरता आंदोलनकर्त्‍यांसमवेत बसले होते. आंदोलनस्‍थळी भाजपचे गोपीनाथ पडळकर यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी भ्रमणभाषद्वारे विद्यार्थ्‍यांचा संवाद घडवून दिला. फडणवीस म्‍हणाले, ‘‘दळवी समिती ही मागच्‍या सरकारने नेमली होती. त्‍यांनीच हा निर्णय घेतलेला आहे. मी स्‍वत: कॅबिनेट बैठकीमध्‍ये मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ’, असे आश्‍वासन दिले.’’ राष्‍ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्‍हणाले की, खरेतर या निर्णयाकरता विद्यार्थ्‍यांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत. १५ दिवसांपूर्वीही विद्यार्थ्‍यांनी आंदोलन केले होते, तेव्‍हा हा निर्णय घ्‍यायला हवा होता. सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे; पण हे यश त्‍या आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्‍यांचे आहे.