हळदी-कुंकू कार्यक्रमाला राजकीय रंग !

सध्‍या सातारा शहरामध्‍ये नगरपालिकेच्‍या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्‍या २-३  मासांत ही निवडणूक होण्‍याची चिन्‍हे आहेत. त्‍यामुळे अनेक इच्‍छुक उमेदवारांनी आपल्‍या मतदारांना खूश करण्‍यासाठी विविध उपक्रम राबवण्‍यास प्रारंभ केला आहे. याचाच एक भाग म्‍हणून इच्‍छुक उमेदवारांनी आपल्‍या प्रभागात हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करून वाण लुटण्‍यासाठी मोठी गर्दी जमवली. हळदी-कुंकू हा धार्मिक कार्यक्रम असल्‍यामुळे याला कुणीही हरकत घेणार नाही. या कार्यक्रमात वाण देणे, हे ओघाने आलेच ! त्‍यामुळे शहरात विविध ठिकाणी झालेले हळदी-कुंकू सोहळे हे राजकीय कारणांसाठीच आहेत, असे जनतेला वाटत आहे.

यापूर्वी सातारा शहरातील २० प्रभागांत ४० नगरसेवक कार्यरत होते; मात्र आता सातारा शहराची सीमावाढ झाल्‍यामुळे आजूबाजूच्‍या ८ किलोमीटर परिघातील उपनगरे नगरपालिकेच्‍या सीमेमध्‍ये प्रविष्‍ट करण्‍यात आली आहेत. परिणामत: प्रभागांची संख्‍या वाढून नगरसेवकांचीही संख्‍या वाढली आहे. आता प्रभाग संख्‍या २५ झाली असून नगरसेवकांची संख्‍याही ५० च्‍या वर गेली आहे. यामुळे इच्‍छुक उमेदवारांनी आपले नेते आणि मतदार यांना खूश करण्‍यासाठी नवनवीन क्‍लृप्‍त्‍या करण्‍यास प्रारंभ केला आहे. काही माजी नगरसेवकांनी ‘होम मिनिस्‍टर’सारखे कार्यक्रम घेऊन मतदारांना पैठण्‍या वाटल्‍या, तर काहींनी गाण्‍यांचे कार्यक्रम घेऊन मनोरंजन आणि जेवणाची व्‍यवस्‍था केली. ३१ मार्चच्‍या शेवटपर्यंत रखडलेली कामे जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून पूर्ण करून घेण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासन धडपड करत आहे. आलेला निधी मागे जाऊ नये, हे त्‍यामागचे मुख्‍य कारण आहे. त्‍यामुळे सध्‍या मोठ्या प्रमाणात शहरात विकासकामे चालू आहेत. यामुळे ‘निधी शासकीय, काम मात्र खासगी’ अशी स्‍थिती काही ठिकाणी पहायला मिळत आहे. पालिका कार्यक्षेत्राच्‍या अंतर्गत चालू असणार्‍या कोणत्‍याही कामात सध्‍या माजी नगरसेवक ढवळाढवळ करतांना दिसत नाहीत. जे चालू आहे, ते पालिका प्रशासनाकडून चालू असल्‍याचे सांगून त्‍यांनी हात वर केले आहेत; मात्र यामध्‍ये काही स्‍वार्थी मंडळी आपली पोळी भाजून घेत आहेत.

नव्‍याने झालेल्‍या प्रभाग रचनेमुळे नगरसेवकांची संख्‍या वाढली असली, तरी इच्‍छुक उमेदवारांकडून केल्‍या जाणार्‍या या हळदी-कुंकू कार्यक्रमाचा लाभ त्‍यांना कितपत होईल, हे येणारा काळच ठरवेल !

– श्री. राहुल देवीदास कोल्‍हापुरे, सातारा