स्वामी प्रसाद मौर्य यांचा शिरच्छेद करणार्‍याला २१ लाख रुपये देऊ !

अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांची घोषणा !

 

अयोध्या (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाच्या ओबीसी महासंघाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर येथील हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी टीका करतांना मौर्य यांचा शिरच्छेद केल्यास २१ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी ‘श्रीरामचरितमानसच्या प्रती जाळणार्‍यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी’, अशीही मागणी केली आहे. ‘जर सरकारने कारवाई केली नाही, तर हिंदु जनमानस त्याच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी स्वतः कारवाई करील’, असेही महंत राजू दास यांनी म्हटले आहे.

महंत राजू दास म्हणाले की, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणतात की, ते कधी कुणाच्याही धर्माचा अवमान करत नाहीत; मात्र त्यांच्या बोलण्यात आणि कृती करण्यात भेद आहे. त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांना बढती देत सरचिटणीस केले. त्यांनी मौर्य यांच्यावर कारवाई करावी; कारण साधूसंतांमध्ये संताप आहे.