३१ डिसेंबरच्या मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मांद्रे येथे डोंगराळ भागाला लागली मोठी आग

३ सहस्र झाडे जळून राख झाल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा

प्रतिकात्मक छायाचित्र

पेडणे, १ जानेवारी (वार्ता.) – कायद्यानुसार रात्री १० वाजल्यानंतर आतषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, तरीही ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मांद्रे मतदारसंघातील समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. यावर लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. या वेळी फटाक्यांच्या ठिणग्या बाजूच्या डोंगराळ भागात जाऊन पडल्याने मोठी आग लागली. यामध्ये सुमारे ३ सहस्र झाडे जळून राख झाली आहेत.

मांद्रे येथील किनारी भागात असणार्‍या डोंगरावर पर्यावरणप्रेमींनी लावलेल्या ५ सहस्रांपैकी ३ सहस्र झाडे जळाल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. आगीच्या घटनांची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन दलाचे सैनिक घटनास्थळी आले; मात्र तत्पूर्वी स्थानिक युवकांनी मिळेल तेथून पाणी आणून माळरानावर धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये स्थानिक युवक रविराज पेडणेकर, प्रवीण म्हामल, सुरेन म्हामल, देवता म्हामल, प्राची म्हामल, उद्देश पेडणेकर, आकार दाभाळे आदींचा समावेश होता.