|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे एका हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळून आले. यांत ४ बहिणी आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अर्शद नावाच्या मृत महिलेच्या २४ वर्षीय मुलाला अटक केली आहे. आधी कौटुंबिक वादातून या हत्या झाल्याचे बोलले जात होते; परंतु अर्शदचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात त्याने दावा केला की, आम्ही मूळचे बदायू येथील असून आमच्या परिसरातील मुसलमान लोक मुलींचे अपहरण करून त्यांना हैद्राबादला (भाग्यनगरला) येथे नेऊन विकत होते. त्यांच्यापासून माझ्या बहिणींचे शीलरक्षण होण्यासाठी मी त्यांचा गळा दाबून त्यांची हत्या केली.
४९ वर्षीय अस्मान, तर अलिशिया (वय १९ वर्षे), रहमीन (वय १८ वर्षे), अक्ष (वय १६ वर्षे) आणि आलिया (वय ९ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हत्या करणारा अर्शद याचे वडील पसार आहेत. पुढील चौकशी चालू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण त्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
अर्शदने व्हिडिओत पुढे म्हटले की, आम्ही आमच्या घरात मंदिराची स्थापना केली होती. आमच्या परिसरातील मुसलमान हे मुलींना विकत असून स्थानिक पोलीस ठाण्याला पैसे देऊन त्यांनी पोलिसांना स्वत:च्या नियंत्रणात ठेवले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी आम्ही लक्ष्मणपुरी येथे गेले १०-१२ दिवसांपासून आलो होतो; परंतु मुख्यमंत्र्यांची भेट आम्हाला मिळू शकली नाही. मुख्यमंत्री पुष्कळ चांगले कार्य करत असून मी त्यांना विनंती करतो की, मला कोणतीही शिक्षा करा, परंतु आम्हाला मृत्यूनंतर तरी न्याय द्या !