प्राथमिक तपासणी अहवालातून माहिती झाली उघड
पणजी, १ जानेवारी (वार्ता.) – धारगळ येथे सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवात २८ डिसेंबर या दिवशी देहलीस्थित युवक करण कश्यप याचा मृत्यू झाला होता. करण कश्यप याचा मृत्यू मद्य आणि अमली पदार्थ यांचे अतीसेवन यांमुळे झाल्याचा निष्कर्ष बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना सुपुर्द केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालात नोंदवला आहे.
करण कश्यप याच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालया’तील ‘रेडॉक्स ॲनलाईझर’ या यंत्राद्वारे करण्यात आली. त्यामध्ये मद्य, तसेच ‘फेटंनील’ (वेदना कमी करणारे), ‘बेंझोडशयझोपाईन’ (उदासीनतेवरील औषध), ‘ॲम्फेटामाईन’ (उत्तेजक) आणि ‘मेथॅम्फेटामाईन’ (मनोरंजक किंवा कार्यक्षमता वाढवणारे) हे अमली पदार्थ आढळले आहेत. शवचिकित्सा ‘फॉरेन्सिक मेडिसीन’ विभागाचे प्रमुख डॉ. आंद्रे फर्नांडिस आणि डॉ. गिरीश कामत यांच्या गटाने केली. याविषयी अधिक माहिती देतांना डॉ. आंद्रे फर्नांडिस म्हणाले, ‘‘रक्तामध्ये ‘ॲम्फेटामाईन’ आणि ‘मेथॅम्फेटामाईन’ या अमली पदार्थांचे प्रमाण पुष्कळ अधिक होते. या अमली पदार्थांमध्ये अन्य अमली पदार्थांची भेसळ होती. मृत करण कश्यप याने अमली पदार्थ आणि मद्य याचे एकत्रितपणे सेवन केले. मद्याचे सेवन केल्याने या अमली पदार्थांचा शरिरावर होणारा परिणाम वाढतो.’’
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार करण कश्यप याच्या मूत्रपिंडाला गंभीर इजा झाली होती, तसेच फुप्फुसाला सूज आली आणि मेंदूला रक्तपुरवठा करण्यास अडचण आल्याने तो बेशुद्ध झाला. जठर, मेंदू आणि फुप्फूस यांच्यावर पुष्कळ वाईट परिणाम झाला होता. अमली पदार्थ आणि मद्य यांचे मिश्रण अन् त्यामध्ये ‘ट्रान्स म्युझिक’मुळे (मोठ्या आवाजातील पाश्चात्त्य संगीतामुळे) रक्तदाब वाढल्यावर अशा प्रकारचा झटका बसून मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालाच्या आधारे पोलिसांचे अन्वेषण चालू
डॉ. गिरीश कामत म्हणाले, ‘‘मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालात मृत्यूचे कारण गोपनीय ठेवण्यात आले आहे. ‘व्हिसेरा’चे (शरिरांतर्गत अवयवांचे) रासायनिक विश्लेषण आणि अन्य एक चाचणी यांचे अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. ‘व्हिसेरा’ राखून ठेवून त्याचे विश्लेषण करण्याची आवश्यकता असल्याने तो वेर्णा येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.’’ या प्रयोगशाळेने दिलेला अहवाल पोलीस अन्वेषणात ग्राह्य धरला जातो. हा अहवाल मिळण्यास किमान ३ महिने लागणार असले, तरी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी अन्वेषण चालू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सनबर्नविषयीचे प्रश्न उच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी होणार उपस्थित
पणजी – २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत झालेल्या सनबर्न महोत्सवात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिलेले निर्देश आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वे यांचे काटेकोरपणे पालन केले कि नाही ? हा प्रश्न ७ जानेवारी या दिवशी गोवा खंडपिठात सनबर्नविषयी होणार्या सुनावणीच्या वेळी उपस्थित होणार आहे. त्याचप्रमाणे देहलीस्थित युवक कश्यप याचा संशयास्पद मृत्यू, अमली पदार्थाचे सेवन केल्याबद्दल सनबर्नमध्ये ५ जणांना कह्यात घेणे, वाहतुकीची कोंडी, ध्वनीप्रदूषण आदी विषय न्यायालयासमोर मांडले जाणार आहेत.
सनबर्नला सर्व सरकारी आणि स्थानिक संस्था यांच्याकडून अनुज्ञप्ती मिळणे आवश्यक होते. आयोजन स्थळाच्या आसपास ध्वनीप्रदूषण होऊ नये, यासाठी आवाजाची मर्यादा ५५ डेसिबल्सच्या आत ठेवणे, ध्वनीक्षेपकाची दिशा खालच्या बाजूला करणे, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आयोजन स्थळाच्या बाहेरच्या बाजूस ध्वनीची ‘ऑनलाईन’ क्षमता मोजणे, प्रत्येक ‘स्टेज’वर ध्वनीचे मोजमाप करणे, राष्ट्रीय महामार्ग-६६च्या जवळ असल्याने महामार्गापासून आत-बाहेर जाण्यासाठी जोडरस्ते केले होते का? सनबर्नसाठी अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती का? आदी प्रश्न सुनावणीच्या वेळी उपस्थित केले जाणार आहेत.
११ अनुज्ञप्ती कधी मिळाल्या ?
गोवा पर्यटन खाते, धारगळ पंचायत, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण आणि हवामान पालट खाते, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, वाहतूक पोलीस अधीक्षक, बार्देश तालुक्याचे अबकारी निरीक्षक, अग्नीशमनदल, शिवोली केंद्राचे आरोग्य अधिकारी आणि अन्न अन् औषध प्रशासन या ११ सरकारी खात्यांची अनुज्ञप्ती घेतली कि नाही ? याची पडताळणी सुनावणीच्या वेळी होणार आहे.
सनबर्न महोत्सवात १२९ भ्रमणभाष संच चोरीस
सनबर्न महोत्सवात १२९ भ्रमणभाष संच चोरीस गेले आहेत. यासंबंधी तक्रारी पेडणे पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या आहेत. चोरीस गेलेले काही भ्रमणभाष संच पोलिसांना सापडले आहेत, तर अन्य सर्व भ्रमणभाष संच शोधून काढण्यासाठी पोलीस सक्रीय झाले आहेत.