गोव्यातील ६८७ प्राथमिक शाळांपैकी ११८ शाळांमध्ये १० हून अल्प विद्यार्थी

पणजी – शिक्षण खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षी घटतच चालल्याचे समोर आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात चालू असलेल्या ६८७ सरकारी प्राथमिक शाळांपैकी ११८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० हून अल्प आहे. यांपैकी पेडणे तालुक्यात १५, बार्देश तालुक्यात ८, डिचोली तालुक्यात ४, सत्तरी तालुक्यात १६, तिसवाडी तालुक्यात २, फोंडा तालुक्यात १३, सांगे तालुक्यात १५, धारबांदोडा तालुक्यात १५, केपे तालुक्यात ८, काणकोण तालुक्यात १६, सासष्टी तालुक्यात ५ आणि मुरगाव तालुक्यात
१ याप्रमाणे तालुक्यातील शाळांची संख्या आहे. राज्यातील खासगी अनुदानित शाळांची वाढती संख्या, त्यांच्याकडून विद्यार्थी आणि पालक यांना आकर्षित करण्यासाठी राबवल्या जाणार्‍या अनेक क्लुप्त्या, तसेच खासगी अनुदानित शाळांना पुरवलेले बालरथ या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या अल्प होत असल्याचे दिसून आले आहे. याउलट खासगी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थांची संख्या सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थांच्या संख्येच्या जवळजवळ चौपट आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण ४२१ प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या ७२ सहस्र ९५० आहे, तर सरकारी प्राथमिक शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या १८ सहस्र ४६५ आहे. बहुतांश विद्यार्थी खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांकडे वळत असल्याने सरकारी प्राथमिक शाळांपुढे समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी सरकारी प्राथमिक शाळांकडे वळावे, यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. खासगी अनुदानित शाळांना देण्यात येणार्‍या बालरथांमुळे सरकारी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी खासगी शाळांकडे वळत असल्याचे दिसून आल्यामुळे सरकारने यापुढे अनुदानित शाळांना नवे बालरथ न देण्याचा निर्णय घेतला आहे.