नवी मुंबईत दारू पिऊन वाहन चालवणार्‍या २६६ जणांवर कारवाई !

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी मुंबई – नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात ३१ डिसेंबरच्या निमित्त विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणार्‍या २६६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ३१ डिसेंबरला दिवसभर आणि १ जानेवारीला पहाटेपर्यंत ही विशेष मोहीम घेण्यात आली. या बंदोबस्ताच्या वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाकडून २ सहस्र ३५७ वाहनचालकांवर मोटर वाहन कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली. यापुढेही वाहतुकीचे नियम न पाळता निष्काळजीपणे वाहन चालवणार्‍या वाहनचालकांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यात नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन काकडे यांनी केले आहे.

दारू पिऊन वाहन चालवणार्‍या ३२ जणांवर सर्वांत अधिक कारवाई तुर्भे विभागाच्या वाहतूक शाखेने केली. गव्हाण फाटा वाहतूक शाखेने सर्वांत अल्प म्हणजे केवळ ५ जणांवर कारवाई केली.