प्रसिद्ध जादूगार शिव कुमार यांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांना आव्हान !
नागपूर – ‘तुम्ही दिव्यत्व सिद्ध करा, सर्व जादूगार तुमच्या आश्रमात सेवा करतील’, असे आव्हान देशातील प्रसिद्ध जादूगार शिव कुमार यांनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांना दिले आहे. अलवर येथे जादूचा कार्यक्रम करत असतांना शिव कुमार यांनी बागेश्वर धामच्या महाराजांना हे आव्हान दिले आहे.
‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज भाविकांच्या मनातील प्रश्न आणि समस्या स्वतःच जाणतात. त्या आधीच कागदावर लिहून ठेवतात’, असे त्यांचे भाविक सांगतात. ‘श्री बालाजीच्या आशीर्वादाने आपण हे करत आहोत’, असे महाराजांचे म्हणणे आहे. जादूगार शिव कुमार यांनी म्हटले आहे की, जगात कुठेही दिव्यशक्ती नसून जादू हीच एक विद्या आहे. जादू ही अलौकिक शक्ती किंवा चमत्कार नसून ते विज्ञान कलेचे रूप आहे. आम्ही ज्या पद्धतीने ते दाखवून देतो, त्यातून ही जादू असल्याचा भास समोरच्या व्यक्तींना होतो. सनातन धर्मात देव असून देव असायला पाहिजे; मात्र देवाच्या नावाने चमत्कार ही अंधश्रद्धा आहे. मेडिटेशन, योगा आणि बहुरंगी कला यांचा समावेश जादूच्या कलेत आहे. ‘मिक्स आर्ट’ किंवा ‘जादू’ असेही या कलेला म्हटले जाते.