नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजने’ला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !

नवी मुंबई, २९ जानेवारी (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकातील विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना’ घोषित करण्यात आली आहे. शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून देण्याची मुदत १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली.

या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून देण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले होते. यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत होती; मात्र अर्ज भरून देण्यात विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे विलंब होत असल्याचे लोकप्रतिनिधी, तसेच पालक यांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले. बँकेत खाते उघडण्यासाठी वेळेवर बोनाफाईड प्रमाणपत्र न मिळणे, बँकेत खाते उघडण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागणे, उत्पन्नाचा दाखला वेळेत उपलब्ध न होणे, ऑनलाईन अर्ज भरतांना विविध अडचणी येणे ही कारणे होती. त्यानंतर पालिकेने वरील निर्णय घेतला.