शारीरिक त्रासांतही तळमळीने सेवा करणारे ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. अमित हडकोणकर !

शारीरिक त्रासांतही तळमळीने सेवा करणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असणारे ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. अमित हडकोणकर !

‘२६.१.२०२३ (माघ शुक्‍ल पंचमी (वसंतपंचमी)) या दिवशी आमच्‍या विवाहाला २ वर्षे पूर्ण झाली. त्‍यानिमित्त यजमान श्री. अमित हडकोणकर यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये दिली आहेत.

श्री. अमित हडकोणकर

१. वक्‍तशीरपणा

‘आम्‍हाला प्रतिदिन आश्रमात जाऊन-येऊन सेवा करण्‍यासाठी २ घंटे प्रवास करावा लागतो. श्री. अमित सकाळी ९.३० वाजता आश्रमात पोचतात आणि सायंकाळी ६.३० वाजता घरी येण्‍यासाठी निघतात. ते नेहमी नियोजित वेळेतच सर्वकाही करतात. एका सत्‍संगामध्‍ये श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी यजमानांच्‍या वक्‍तशीरपणाचे कौतुक केले.

२. नम्रता

अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर

आमच्‍या विवाहाला २ वर्षे पूर्ण झाली; परंतु आजपर्यंत ते माझ्‍याशी कधीही अधिकारवाणीने किंवा रागावून बोलले नाहीत. ते मला ‘कोणत्‍याही प्रसंगात योग्‍य दृष्‍टीकोन काय असायला हवा ?’, याविषयी सांगतात.

३. देवीच्‍या मंदिरात जाऊन सेवा करणे

श्री. अमित नियमितपणे आमच्‍या घराजवळ असलेल्‍या श्री नागवंती केळबायदेवीच्‍या मंदिरात जाऊन सेवा करतात. ‘अमित यांचा सेवाभाव आणि भक्‍तीभाव यांमुळेच त्‍यांच्‍यावर देवीमातेची पुष्‍कळ कृपा आहे’, असे मला वाटते.

४. मंदिरात आणि घरी रांगोळी काढणे, फुलांची सजावट करणे आणि इतर सेवा उत्‍साहाने करणे

ते फुलांची रचना अतिशय सुंदर करतात. त्‍यांनी घरी नियमितच्‍या देवपूजेसाठी किंवा मंदिरातील एखाद्या कार्यक्रमासाठी केलेली फुलांची रचना पाहिल्‍यावर भावजागृती होते. ते रांगोळीही तेवढीच सुंदर काढतात. मंदिरात कार्यक्रमाच्‍या वेळी किंवा पालखी येणार असेल, तेव्‍हा ते स्‍वतःहून रांगोळी काढतात. ते देवीची पालखी येणार असेल किंवा तुळशी विवाहाची सिद्धता असेल, तेव्‍हा त्‍यासाठी मंडप सिद्ध (तयार) करणे, पताके लावणे, रांगोळी काढणे इत्‍यादी सेवा उत्‍साहाने आणि भावपूर्ण करतात. ते ‘देवीच्‍या सेवेत काही त्रुटी रहायला नको’, यासाठी त्‍याकडे बारकाईने लक्ष देतात. हे सर्व करतांना साहाय्‍याला कुणी असो किंवा नसो, ते न कंटाळता आणि न थकता सेवा करत रहातात. एवढेच नाही, तर अन्‍य कुणाच्‍या घरी साहाय्‍य हवे असेल, तर सिद्धतेसाठी तेथेही जातात. हे सर्व ते आश्रमातील सेवा लवकर पूर्ण करून त्‍यानंतर करतात.

५. मंदिरातून साधिकांसाठी फुलांच्‍या वेण्‍या आणि फळे आणणे

आश्रमातील साधिकांना केसांत फुलांच्‍या वेण्‍या (गजरे) माळता येण्‍यासाठी ते श्री नागवंती केळबायदेवीच्‍या मंदिरातील फुलांच्‍या वेण्‍या आश्रमात नेतात. त्‍यातही साधिकांचा वेळ जायला नको; म्‍हणून मंदिरातूनच त्‍याचे लहान लहान तुकडे करून आणतात. तसेच साधकांसाठी पंचखाद्याचा नैवेद्य आणि फळे आणतात.

६. प्रतिदिन सकाळी व्‍यायाम, नामजप आणि स्‍वभावदोष अन् अहं निर्मूलनासाठीचे सारणी लिखाण करणे

श्री. अमित प्रतिदिन सकाळी ५.३० ते ५.४५ पर्यंत उठून व्‍यायाम करतात, तसेच सकाळी नामजप आणि स्‍वभावदोष अन् अहं निर्मूलनासाठीचे सारणी लिखाण करतात. त्‍यानंतर वैयक्‍तिक आवरून देवपूजा करून आश्रमात जातात.

७. सेवेची तळमळ

७ अ. विदेशात नोकरी करण्‍यापेक्षा सनातनच्‍या आश्रमात येऊन सेवा करणे : अमित यांना विदेशात नोकरीची संधी मिळाली होती; परंतु पैशांच्‍या मोहाला बळी न पडता ते मागील २२ वर्षे नियमित पणजी (शिरदोन) ते फोंडा असा प्रवास करून आश्रमात सेवेसाठी जात आहेत. पूर्वी त्‍यांना आश्रमात जाण्‍यासाठी दुचाकी नव्‍हती. तेव्‍हा ते बसने आश्रमात जात असत. आश्रमात जाण्‍यासाठी त्‍यांना घरापासून बसस्‍थानकापर्यंत २० मि. चालत जावे लागायचे. त्‍यानंतर दोन बस बदलून आणि नंतर फेरी बोट असा प्रवास करावा लागायचा. सेवेच्‍या तळमळीमुळेच त्‍यांना या कोणत्‍याच गोष्‍टी अडथळा वाटल्‍या नाहीत. ते तेव्‍हाही वेळेत आणि नियमित आश्रमात जात होते.

७ आ. शारीरिक त्रासांतही घरी विश्रांती न घेता प्रतिदिनच्‍या नियोजनानुसार आश्रमात सेवेला जाणे : श्री. अमित यांंचा प्रतिदिनचा प्रवास पुष्‍कळ होत असतो. त्‍यामध्‍येच काही मासांंपूर्वी त्‍यांना तीव्र कंबरदुखीचा त्रास होत होता. आधुनिक वैद्यांनी त्‍यांच्‍या कमरेला औषध लावून पट्टी बांधली होती आणि त्‍यांना प्रवास अधिक करू नये, असे सांगितले होते, तरीही ते सेवेसाठी साधक अल्‍प आहेत आणि सेवा प्रलंबित रहातील, या विचारामुळे त्‍यांच्‍या शारीरिक व्‍याधींना न जुमानता नियोजनाप्रमाणे सेवेला जात होते. ते ‘केवळ विश्रांती हवी; म्‍हणून घरी राहिले’, असे मी कधीच पाहिले नाही. बर्‍याचदा घरी रहाण्‍याची आवश्‍यकता असतांनाही सेवा करूनच ते घरी येतात.

८. प्रेमभाव

अमित यांचे बरेच मित्र विदेशात रहातात. त्‍या मित्रांचे कोणतेही काम असेल, तर अमित त्‍यांना निःसंकोच साहाय्‍य करतात. त्‍यांच्‍या अनेक मित्रांनी त्‍यांचे घर आणि वाहन यांच्‍या चाव्‍या अमित यांच्‍याकडे विश्‍वासाने दिलेल्‍या आहेत. त्‍यांना त्‍यांच्‍या मित्रांनी त्‍यांचे घर आणि गाडी वापरण्‍यास काहीही हरकत नसल्‍याचे सांगितले आहे. असे असले, तरी त्‍यांनी त्‍याचा कधीच अपलाभ करून घेतलेला नाही. ‘त्‍यांच्‍यातील प्रेमभावामुळेच ते अनेक लोकांशी जोडले गेले आहेत’, असे मला वाटते.

९. कोरोना महामारीच्‍या प्रतिकूल परिस्‍थितीत गुरूंवर श्रद्धा ठेवून विवाहाची सिद्धता करणे

त्‍यांच्‍याकडे महत्त्वाच्‍या सेवा असतात; परंतु गुरूंवरील श्रद्धेमुळे त्‍यांच्‍या चेहर्‍यावर कधीच ताण आणि काळजी दिसत नाही. आमच्‍या विवाहाच्‍या कालावधीत कोरोना महामारी असल्‍यामुळे विवाहाची सिद्धता करण्‍यासाठी बर्‍याच मर्यादा होत्‍या. ‘बाहेरील स्‍थिती एवढी प्रतिकूल असूनही गुरुदेव कसे साहाय्‍य करत आहेत ? गुरुदेवांची आपल्‍यावर कशी गुरुकृपा आहे ?’, हेच ते सांगत होते. यांतून त्‍यांची गुरूंवरील श्रद्धा आणि भाव लक्षात येतो.

‘हे गुरुमाऊली (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्री. अमित यांच्‍याप्रमाणे माझ्‍यात सेवाभाव, तळमळ आणि श्रद्धा तुम्‍हीच निर्माण करा. साधनेच्‍या वाटेवर श्री. अमित यांच्‍या माध्‍यमातून आध्‍यात्मिक मित्र मिळाल्‍याबद्दल गुरुमाऊलीच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– अधिवक्‍त्‍या (सौ.) अदिती अमित हडकोणकर, पाळे, शिरदोन, गोवा. (५.१२.२०२२)