परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने त्‍यांचे गुरु प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍यासारख्‍या अत्‍युच्‍च पातळीच्‍या संतांचा लाभलेला सहवास !

आज वसंतपंचमी (२६.१.२०२३) या दिवशी प.पू. भक्‍तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्‍या निमित्ताने…

डोंबिवली, जिल्‍हा ठाणे येथील साधक श्री. प्रकाश शिंदे वर्ष १९८९ पासून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या संपर्कात आहेत. त्‍यांनी साधनेला आरंभ केला आणि ते मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवा करायला जाऊ लागले. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने त्‍यांना प.पू. भक्‍तराज महाराज यांचा अनमोल सत्‍संग लाभला. या सत्‍संगातील आठवणी आणि ‘या सत्‍संगाचा लाभ कसा करून घ्‍यायचा ?’, याची परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी दिलेली शिकवण यांविषयी श्री. प्रकाश शिंदे यांनी दिलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

प.पू. भक्‍तराज महाराज
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या भंडार्‍यांना नेणे

१ अ. भंडार्‍याला गेल्‍यावर प.पू. भक्‍तराज महाराज यांचे दर्शन होऊन त्‍यांच्‍या सत्‍संगात अनुभूती येणे : ‘वर्ष १९९० ते १९९५ या काळात परात्‍पर गुरु डॉक्‍टर आम्‍हाला प.पू. भक्‍तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्‍या भंडार्‍याला त्‍यांच्‍या आश्रमात घेऊन जायचे. आश्रमात गेल्‍यावर सर्वप्रथम प.पू. बाबांचे दर्शन घेतल्‍यावर आम्‍ही सर्व साधक सेवा करायला जायचो. प.पू. बाबांच्‍या समोर अनेक भक्‍त बसलेले असायचे. आमची सेवा झाल्‍यावर आम्‍हालाही तेथे १० ते १५ मिनिटे बसायची संधी मिळायची. प.पू. बाबांचे बोलणे आम्‍हाला कळायचे नाही; परंतु ते ऐकत रहावेसे वाटायचे. त्‍यातून आनंद मिळायचा. त्‍यांच्‍या चरणांतून चंदनाचा सुगंध यायचा. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आम्‍हाला अत्‍युच्‍च पातळीच्‍या संतांच्‍या सहवासाची अनुभूती घेण्‍यास शिकवले.

१ आ. पहिल्‍यांदा भंडार्‍याला गेल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांत श्रद्धा निर्माण व्‍हावी, यासाठी प.पू. बाबांच्‍या जुन्‍या भक्‍तांशी त्‍यांना बोलायला सांगणे : पहिल्‍यांदा जेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टर आम्‍हा सर्व साधकांना प.पू. बाबांच्‍या आश्रमातील भंडार्‍याला घेऊन गेलेे, तेव्‍हा त्‍यांनी प.पू. बाबांची सेवा केलेल्‍या अनेक जुन्‍या भक्‍तांशी आमची भेट करून दिली. ते भक्‍तांना म्‍हणालेे, ‘‘हे सर्व जण नवीन आहेत. तुम्‍ही प.पू. बाबांची सेवा कशी केली ? तुम्‍हाला प.पू. बाबांच्‍या संदर्भात काय अनुभूती आल्‍या ?’, ते सांगा, म्‍हणजे या सर्वांना तुमच्‍याकडून शिकायला मिळेल.’’ परात्‍पर गुरु डॉक्‍टर प.पू. बाबांच्‍या भक्‍तांशी आम्‍हाला बोलायला सांगून ‘आमच्‍यात श्रद्धा निर्माण व्‍हावी’, यासाठी प्रयत्न करत होते.

१ इ. दुसर्‍यांदा भंडार्‍याला गेल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना वेळ वाया घालवू न देता सेवा करायला सांगणे : परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी दुसर्‍यांदा आम्‍हाला भंडार्‍याला नेले. तेव्‍हा आम्‍ही सर्व भक्‍तांशी बोलायला लागलो. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टर म्‍हणाले, ‘‘आता कुठे गप्‍पा मारत बसला आहात ? तुम्‍ही सेवा करायला हवी. मागच्‍या वेळी ‘तुमच्‍यात श्रद्धा निर्माण व्‍हावी’, यासाठी तुम्‍हाला भक्‍तांशी बोलायला सांगितले होते. आता तुमच्‍यात श्रद्धा निर्माण झाली आहे. आता पुढच्‍या टप्‍प्‍यात तुम्‍ही सेवा करायला पाहिजे.’’ ते आम्‍हाला स्‍वतःहून सेवेला घेऊन जायचे आणि ‘आम्‍ही कुठे वेळ वाया घालवत नाही ना ?’, ते पहायचे.

१ ई. तिसर्‍यांदा भंडार्‍याला जातांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांमध्‍ये ‘भंडारा आपलाच आहे’, हा भाव निर्माण होण्‍यासाठी पूर्वसिद्धता आणि नंतरची आवराआवर करणे, यांसाठी साधकांचे ४ – ५ दिवस रहाण्‍याचे नियोजन करणे : परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तिसर्‍या वेळी आम्‍हाला भंडार्‍यासाठी नेले. तेव्‍हा ‘भंडारा आपलाच आहे’, हा भाव आमच्‍यात निर्माण व्‍हावा’, यासाठी त्‍यांनी भंडार्‍याची सिद्धता करण्‍यासाठी २ दिवस आधी आणि नंतरची आवराआवर करण्‍यासाठी २ दिवस नंतर रहाण्‍याचे आमचे नियोजन केले. त्‍यांनी आम्‍हाला ‘भंडार्‍याचे नियोजन कसे करायचे ? भंडारा झाल्‍यावर सर्व आवरण्‍याचे नियोजन कसे करायचे ?’, या गोष्‍टी शिकून घ्‍यायला सांगितल्‍या. त्‍यांनी आमच्‍यात ‘भंडारा आपलाच आहे आणि त्‍यासाठी लागणार्‍या सर्व गोष्‍टी आपणच करायला पाहिजेत’, हा भाव निर्माण केला.

श्री. प्रकाश शिंदे

१ उ. भंडार्‍याच्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टर नसतांनाही साधकांनी सर्व सेवा परिपूर्ण रितीने करणे : नंतर नंतर भंडार्‍याच्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टर भंडार्‍याच्‍या दिवशी यायचे आणि लगेच मुंबईला निघून जायचे. ते नसतांनाही आम्‍ही सर्व सेवा परिपूर्ण रितीने करत असू. त्‍या वेळी भंडार्‍याच्‍या काही दिवस आधी प.पू. बाबा भक्‍तांना सांगायचे, ‘‘डॉक्‍टरांची मुले (साधक) आल्‍यावर सर्व करतील. तुम्‍ही काळजी करण्‍याची आवश्‍यकता नाही.’’

१ ऊ. भंडार्‍यानिमित्त प.पू. भक्‍तराज महाराज यांची प्रीती अनुभवायला मिळणे : परात्‍पर गुरु डॉक्‍टर मुंबईला गेल्‍यानंतर प.पू. बाबांचे आमच्‍यावर लक्ष असे. ते आम्‍हाला ‘आम्‍ही वेळेवर जेवतो ना ? रात्री झोप लागते ना ?’, असे विचारून आमची काळजी घ्‍यायचे. ‘प.पू. बाबा आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर एकच आहेत’, अशी आम्‍हाला अनुभूती यायची. आम्‍ही सर्व साधक मुंबईला परततांना प.पू. बाबांना नमस्‍कार करायला जायचो. तेव्‍हा ते आम्‍हाला ‘प्रसाद घेतला ना ? सर्व साहित्‍य घेतले ना ? गाडीचे तिकीट घेतले ना ?’, असे विचारत आणि ‘पोचल्‍यावर दूरभाष करा. पुढच्‍या भंडार्‍याच्‍या वेळी भेटू’, असे सांगून आमचा आनंद द्विगुणित करत असत. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेमुळे आम्‍हा साधकांना प.पू. भक्‍तराज महाराज यांचा सत्‍संग लाभला.

‘प.पू. बाबांच्‍या भंडार्‍याच्‍या निमित्ताने परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने आमच्‍यात अनेक गुण निर्माण करून आम्‍हाला सर्व शिकवले’, याबद्दल भगवत्‌रूपी  परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कोमल चरणी अनन्‍यभावाने कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.

२. प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या अनमोल सत्‍संगातील आठवणी

२ अ. भंडार्‍यासाठी मोरटक्‍का येथील आश्रमात गेल्‍यावर प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या सर्वज्ञतेची प्रचीती येणे : वर्ष १९९१ मध्‍ये आम्‍ही सर्व साधक प.पू. बाबांच्‍या मोरटक्‍का येथील आश्रमात भंडार्‍याला जाण्‍यासाठी मुंबईहून निघालो. तेव्‍हा माझ्‍या मनात विचार आला, ‘एवढ्या लांबून मी प.पू. बाबांच्‍या आश्रमात भंडार्‍यासाठी जातो आणि ते माझी साधी विचारपूसही करत नाहीत.’ नंतर प्रवासात मी हा विचार विसरूनही गेलो. आम्‍ही सर्व साधक आश्रमात आल्‍यावर प.पू. बाबांच्‍या दर्शनासाठी रांगेत उभे होतो. माझ्‍या पुढे रांगेत मुंबईच्‍या एक साधिका होत्‍या. त्‍यांनी प.पू. बाबांसाठी गुळाची पोळी बनवून आणली होती. प.पू. बाबांना याविषयी ठाऊक नव्‍हते. त्‍या प.पू. बाबांना नमस्‍कार करणार, त्‍याच वेळी प.पू. बाबा म्‍हणाले, ‘‘ती गुळाची पोळी माझ्‍यासाठी आणलीस ना ? ती मला दे.’’ प.पू. बाबांचे बोलणे ऐकून त्‍या साधिकेला आश्‍चर्याचा धक्‍काच बसला. ती म्‍हणाली, ‘‘बाबा, ‘मी गुळाची पोळी आणली आहे’, ते तुम्‍हाला कसे समजले ?’’ प.पू. बाबा तिच्‍याकडे पाहून नुसते हसले. तो प्रसंग माझ्‍या समोरच घडत होता. त्‍या वेळी ‘माझ्‍या मनात आलेला विचार प.पू. बाबांना समजला असेल’, असे वाटून मी मनातून चपापलो. त्‍यानंतर मी त्‍यांना नमस्‍कार केला. एरव्‍ही मी त्‍यांना नमस्‍कार केल्‍यावर ते हात वर करून आशीर्वाद द्यायचे. या वेळी त्‍यांची प्रकृती ठीक नसतांनाही त्‍यांनी माझी विचारपूस केली.

या प्रसंगातून ‘संत आणि गुरु यांंना आपल्‍या मनातील सर्व विचार कळतात’, याची जाणीव होऊन ‘माझ्‍या मनात आलेला विचार किती अयोग्‍य होता’, हे माझ्‍या लक्षात आले.

२ आ. प.पू. भक्‍तराज महाराज यांनी साधकांना ‘मोरचुंडी येथे भंडार्‍याला आल्‍यावर ‘गुरुमंत्र देईन’, असे सांगणे, भंडार्‍यात सेवा करतांना साधकांना त्‍यांच्‍या बोलण्‍याचे विस्‍मरण होणे आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘तुम्‍ही नामजप आणि सेवा करत असल्‍याने तुम्‍हाला वेगळ्‍या गुरुमंत्राची आवश्‍यकता नाही’, असे सांगणे : जव्‍हार येथे मोरचुंडी गावात प.पू. बाबांचा एक भक्‍त रहात होता. तेथे महाशिवरात्रीच्‍या दिवशी प.पू. बाबा नेहमी भंडारा करायचे. वर्ष १९९२ मध्‍ये प.पू. बाबा जव्‍हारला जातांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या घरी आले होते. आम्‍ही सर्व साधक दर्शन घेत असतांना ते आम्‍हा सर्वांना म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही मोरचुंडी येथे भंडार्‍याला या. तेव्‍हा मी तुम्‍हाला गुरुमंत्र देईन.’’ आम्‍ही सर्व साधक लगबगीने भंडार्‍याला जायला निघालो. तेथे गेल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आम्‍हाला भंडार्‍यात नेहमीप्रमाणे सेवा करायला सांगितली. सेवा करतांना ‘प.पू. बाबा आपल्‍याला गुरुमंत्र देणार आहेत’, हे आम्‍ही विसरून गेलो. नंतर भंडारा झाल्‍यावर आम्‍ही मुंबई येथील सेवाकेंद्रात आलो. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टर म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही सर्व जण कुलदेवतेचा नामजप करतच आहात आणि सेवेतही आहात. तेव्‍हा वेगळ्‍या गुरुमंत्राची आवश्‍यकता नाही; म्‍हणून प.पू. बाबांनी तुम्‍हाला गुरुमंत्र दिला नाही.’’

३. प.पू. भक्‍तराज महाराज यांचा मुंबई येथील सेवाकेंद्रात मिळालेला सत्‍संग

३ अ. प.पू. बाबा मुंबई येथील सेवाकेंद्रात आल्‍यावर साधकांना चंदनाचा सुगंध येणे : प.पू. भक्‍तराज महाराज मुंबई येथील सेवाकेंद्रात (परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या घरी) आल्‍यावर साधकांसाठी ती दिवाळीच असायची. प.पू. बाबा आले की, सर्वांची सेवेची धावपळ चालू व्‍हायची. काही साधकांना ‘प.पू. बाबा आले आहेत’, हे ठाऊक नसायचे; परंतु प.पू. बाबा सेवाकेंद्राच्‍या खाली आल्‍यावर साधकांना चंदनाचा सुगंध यायचा. तेव्‍हा ‘प.पू. बाबा आले आहेत’, हे साधकांना समजायचे.

३ आ. आम्‍ही सेवा करतांना कधी कधी गप्‍पागोष्‍टी करत असू. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टर आम्‍हाला ‘प.पू. बाबा बघत आहेत. नामजप करत सेवा करा’, अशी जाणीव करून द्यायचे.

३ इ. प.पू. भक्‍तराज महाराज सेवाकेंद्रात ५ दिवस रहायला येण्‍याचे ठरल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना ‘ही तुम्‍हा सर्वांची परीक्षा आहे’, असे सांगून सेवेसाठी त्‍यांची सिद्धता करून घेणे, परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी स्‍वतः सर्व सेवांकडे लक्ष देऊन नियोजन करणे आणि अनेक सेवा असूनही सेवा करतांना थकवा न जाणवता आनंद अनुभवणे : प.पू. भक्‍तराज महाराज परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या घरी १ किंवा २ दिवसांसाठी यायचे. तेव्‍हा ‘संतांची सेवा सातत्‍याने करणे पुष्‍कळ कठीण असते’, हे मी अनुभवले होते. प.पू. बाबा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या घरी १ किंवा २ दिवसांच्‍या वर कधी थांबत नसत. ते आल्‍यावर २४ घंटे भक्‍तांची ये-जा असायची. ‘अन्‍य सर्व सेवांवर परिणाम होऊ नये’, यासाठी प.पू. बाबा तेथे अधिक दिवस रहात नसत. वर्ष १९९३ मध्‍ये एकदा परात्‍पर गुरु डॉक्‍टर म्‍हणाले, ‘‘प.पू. बाबा आपल्‍याकडे ५ दिवसांसाठी रहायला येणार आहेत. ही तुम्‍हा सर्वांची परीक्षा आहे. ‘जो टिकेल, तो जिंकेल !’’ त्‍यांनी असे सांगितल्‍यावर आम्‍हाला हुरूप आला. प.पू. बाबा आल्‍यानंतर ५ दिवस अहोरात्र ‘भक्‍तांचे येणे-जाणे, त्‍यांच्‍यासाठी प्रसाद अन् महाप्रसाद बनवणे, त्‍यांची झोपण्‍याची व्‍यवस्‍था करणे आदी सेवा चालू होत्‍या.

प.पू. बाबांचे भजनांचे कार्यक्रम चालू असायचे, ते व्‍यवस्‍थित व्‍हावेत, यासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टर स्‍वतः सर्वत्र लक्ष ठेवत. ते आम्‍हाला सेवा वाटून द्यायचे. भांडी घासणे, प.पू. बाबांचे कपडे धुऊन इस्‍त्री करणे, अशा एक ना अनेक सेवा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या देखरेखीखाली चालू असायच्‍या. परात्‍पर गुरु डॉक्‍टर आमच्‍या जवळ असल्‍यामुळे आम्‍ही निर्धास्‍त होऊन सेवा करत होतो आणि त्‍यातील आनंद अनुभवत होतो.

५ दिवस झाल्‍यानंतर प.पू. बाबा परत गेले. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टर आम्‍हा सर्व साधकांना म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही सर्व जण जिंकलात !’’ खरेतर त्‍यांनीच आमच्‍याकडून सर्व सेवा करवून घेतली होती आणि ते कौतुक मात्र आमचे करत होते. एरव्‍ही प.पू. बाबा आल्‍यानंतर १ – २ दिवस सतत सेवा करून आम्‍ही थकून जायचो; मात्र प.पू. बाबा ५ दिवस राहूनही परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने त्‍यांची सेवा करतांना आम्‍हाला थकवा आला नाही. आम्‍हाला पुष्‍कळ आनंद मिळाला. त्‍याबद्दल मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. प्रकाश शिंदे (वय ६० वर्षे), डोंबिवली, जिल्‍हा ठाणे, महाराष्‍ट्र. (६.९.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक