काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !

पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटास केला आहे विरोध !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी

नवी देहली – माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी काँग्रेस पक्षाचे त्यागपत्र दिले आहे. अनिल अँटनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगल यांवरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटाला विरोध केला होता. त्यांनी ट्वीट करून सांगितले होते की, भाजपशी आमचे वैचारिक मतभेद आहेत; मात्र तरीही मला वाटते की, या माहितीपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो. जे लोक बीबीसी आणि ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांचे समर्थन करत आहेत, ते लोक चुकीचा पायंडा पाडत आहेत.

याविषयी अनिल अँटनी यांनी सांगितले की, माझ्यावर माहितीपटाचा विरोध करणारे ट्वीट पुसण्यासाठी (डिलीट करण्यासाठी) दबाव आणला गेला. भारतीय संस्थांच्या तुलनेत ब्रिटीश प्रसारमाध्यमाच्या विचारास महत्त्व दिले, तर देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होईल.