कर्नाटकातील पंचलिगेश्‍वर मंदिराच्या जत्रोत्सवात मुसलमानांकडून थाटण्यात आलेली दुकाने हटवली !

दुकानांच्या विरोधात विश्‍व हिंदु परिषदेने लावली होती भित्तीपत्रके !

दक्षिण कन्नड (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पंचलिंगेश्‍वर मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवाच्या काळात मुसलमानांकडून थाटण्यात आलेली दुकाने हटवण्यात आली. हा जत्रोत्सव चालू होण्याच्या आधी विश्‍व हिंदु परिषदेने मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याची मोहीम हाती घेऊन त्या अनुषंगाने जागोजागी भित्तीपत्रके लावली होती. अनके वॉट्सअ‍ॅप गटांवरून ‘अहिंदु व्यापार्‍यांना दुकाने थाटण्यावर निर्बंध घाला’, अशा आशयाचे संदेश प्रसारित झाले होते. या पार्श्‍वभूमीवर एका मुसलमानाने जत्रेमध्ये दुकान थाटले होते, ते हटवण्यात आले आहे, तर दोघा मुसलमानांना दुकाने थाटण्याची अनुमती रहित करण्यात आली.

१. १४ ते २२ जानेवारी या कालावधीत या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. विहिंपने लावलेल्या भित्तीपत्रकांवर नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या कुकर स्फोटाचा उल्लेख करत ‘या स्फोटाचे लक्ष्य काद्री मंजुनाथ मंदिर होते’, असे म्हटले होते. मूर्तीपूजेला विरोध करणारे लोक मंदिरांच्या जत्रेमध्ये व्यवसाय करू शकत नाहीत. केवळ हिंदु धर्माचे पालन करणारेच येथे व्यवसाय करू शकतात. पोलिसांनी ही भित्तीपत्रके काढून टाकली होती आणि मंदिर प्रशासनानेही या भित्तीपत्रकांवर लिहिलेल्या मजकुरापासून फारकत घेतली होती.

२. या मंदिराच्या जत्रेमध्ये १ किलोमीटरच्या परिघात दुकाने लावली जातात. त्यात मुसलमानांचीही दुकाने असतात. गेल्या काही मासांपासून राज्यात मंदिरांच्या जत्रेमध्ये मुसलमानांची दुकाने थाटण्यावर बहिष्कार घालण्याची चळवळ हिंदु संघटनांकडून चालवली जात आहे. गेल्या काही मासांत या संदर्भात मंदिरांच्या ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली होती. त्यात मुसलमानांना दुकाने थाटण्यास विरोध करण्यात आला होता. ‘जे लोक देशाच्या कायद्याचे पालन करत नाहीत, त्यांना व्यापार करण्याची अनमुती मिळणार नाही’, अशीही भूमिका घेण्यात आली होती.