पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर प्रश्‍न उपस्थित करणारे हिंदू सनातन धर्माच्या विरोधात !

द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समर्थन !

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री (डावीकडे) द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती (उजवीकडे)

कटनी (मध्यप्रदेश) – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर नाव न घेता टीका करतांना ‘आमच्या मठामध्ये पडलेल्या भेगा, जोशीमठ गावामध्ये पडलेल्या भेगा दूर करण्याचा चमत्कार करावा. आम्ही त्यांचा जयजयकार करू’, असे म्हटले होते. आता द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांनी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ विधान केले आहे. ते म्हणाले, ‘‘बागेश्‍वर सरकार’वर (धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर) प्रश्‍न उपस्थित करणारे हिंदू हे सनातन धर्माच्या विरोधात आहेत. हिंदूच हिंदु धर्माची निंदा करत आहेत. जे लोक असे करत आहेत, ते नास्तिक हिंदू आहेत.’’

शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती पुढे म्हणाले की, जे लोक धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याविषयी प्रश्‍न उपस्थित करत आहेत ते कधी बागेश्‍वर धामला गेले आहेत का ? धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी कधी लोकांचे भले केले म्हणून पैसे घेतले आहेत का ? अशी कोणतीही व्यक्ती जिला बरे करण्याचे आश्‍वासन दिले आहे आणि तो बरा झाला नाही ? त्यामुळे आधी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील अंतर समजून घेतले पाहिजे. जर कुणी देवतांना शरण गेल्याने बरा होत आहे, तर त्याच चुकीचे काय आहे ? ही आपली परंपरा आहे. ही श्रद्धा आहे. ते जे काही करत आहेत, ते सहस्रो लोकांच्या समोर सिद्ध झाले आहे, मग ही अंधश्रद्धा कशी ? सहस्रो लोक बागेश्‍वर धामचा लाभ घेत आहेत. तेथे जाणारे लोक समाधानी होऊन परत जात आहेत. तुमच्यात जिज्ञासा आहे, तर तुम्ही तेथे जा. आरोप करणे सोपे आहे; मात्र ते सिद्ध करणे कठीण आहे.

धीरेंद्र यांच्या विरोधात अयोग्य बोलणार्‍यांवर मी मानहानीचा दावा प्रविष्ट करणार ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे गुरु पीठाधीश्‍वर रामभद्राचार्य महाराज

पीठाधीश्‍वर रामभद्राचार्य महाराज

पंडित धीरेंद्रकृष्णा शास्त्री यांचे गुरु पीठाधीश्‍वर रामभद्राचार्य महाराज यांनी सांगितले, ‘माझे शिष्य पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केलेल्या गोष्टी मर्यादा आणि धर्म यांच्या अनुसार आहेत. त्यांच्या विधानांना चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे. धीरेंद्र यांच्या विरोधात अयोग्य बोलणार्‍यांवर मी मानहानीचा दावा प्रविष्ट करणार आहे. त्यांची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र चालू आहे; मात्र यामुळे तो घाबरणार नाही. धीरेंद्र याने जे काम केले आहे त्यामुळे धर्मांतर करणारे घाबरले आहेत. मी केंद्र सरकारला धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी पत्र लिहिले आहे.’

संपूर्ण देशाने पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना साथ द्यावी ! – भाजपचे खासदार हरीश द्विवेदी

भाजपचे खासदार हरीश द्विवेदी

उत्तरप्रदेशातील बस्ती येथील भाजपचे खासदार हरीश द्विवेदी यांनीही पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, संपूर्ण देशाने पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना साथ दिली पाहिजे.

ते सनातनचा प्रसार करत आहेत. ज्यांना धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे चमत्कार आवडत नाहीत, त्यांनी त्यांच्याकडे जाऊ नये.