संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समिती आणि इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनास्‍थिसीओलॉजिस्‍टिक्‍स यांच्‍या वतीने ‘सी.पी.आर्.’चे प्रशिक्षण पार पडले !

(सी.पी.आर्. – ‘कार्डिओ पल्‍मोनरी रेसुसीटेशन’ म्‍हणजेच हृदय आणि फुफ्‍फुस यांचे कार्य चालू करणे)

‘डमी’वर प्रात्‍यक्षिक करून दाखवतांना डॉ. संगीता देशपांडे आणि मागे बसलेल्‍या डॉ. हर्षल बोरगावकर

संभाजीनगर – येथील बाळकृष्‍ण मंदिरात हिंदु जनजागृती समिती आणि ‘इंडियन सोसायटी ऑफ  अ‍ॅनास्‍थिसीओलॉजिस्‍टिक्‍स’ यांच्‍या वतीने ८ जानेवारी या दिवशी ‘सी.पी.आर्.’चे प्रशिक्षण पार पडले. ‘इंडियन रिससीटेशन कौन्‍सिल’च्‍या डॉ. संगीता देशपांडे, डॉ. वासंती केळकर, डॉ. हर्षल बोरगावकर यांनी कुठल्‍याही प्रकारच्‍या गंभीर रुग्‍णाला त्‍याचे हृदय बंद पडलेले असतांना वाचवण्‍यासाठी जीवन संजीवनी असणार्‍या ‘सी.पी.आर्.’चे उपस्‍थित जिज्ञासूंना प्रशिक्षण दिले.

या वेळी डॉ. वासंती केळकर, डॉ. संगीता देशपांडे आणि डॉ. हर्षल बोरगावकर यांनी उपस्‍थित प्रशिक्षणार्थींना ‘डमी’वर (बाहुल्‍याच्‍या स्‍वरूपातील निर्जीव मनुष्‍यावर) प्रात्‍यक्षिक करून दाखवले. यानंतर प्रत्‍येक प्रशिक्षणार्थींनी डॉक्‍टरांच्‍या देखरेखीखाली डमीवर याचा सराव केला. या वेळी लहान मूल आणि बालके यांनाही ‘सी.पी.आर्.’ कसे देण्‍यात यावे, याचीही पद्धत शिकवण्‍यात आली. या कार्यक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला.

‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षण सर्वांनी शिकणे आवश्‍यक ! – डॉ. संगीता देशपांडे

आजच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुठेही आणि केव्‍हाही अशा प्रकारचे रुग्‍ण आपल्‍यासमोर येऊ शकतात. आपण एक जागरूक नागरिक म्‍हणून अशा प्रकारच्‍या गंभीर रुग्‍णांना ओळखून त्‍यांच्‍यावर प्रथमोपचार केले पाहिजेत. यासाठी आवश्‍यक असे ‘सी.पी.आर्.’ प्रशिक्षण सर्वांनी शिकणे आवश्‍यक आहे.