पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांवर आरोपपत्र प्रविष्ट !

कर्नाटकातील भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येचे प्रकरण

उजवीकडे प्रवीण नेत्तारू

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेत्तारू यांची २६ जुलै २०२२ या दिवशी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या २० कार्यकर्त्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या २० पैकी ६ जण पसार आहेत. त्यांची माहिती देणार्‍यांना बक्षीसही घोषित करण्यात आले आहे. प्रवीण यांचे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेळ्ळारे भागात पोल्ट्रीचे दुकान होते. २६ जुलै २०२२ च्या रात्री प्रवीण हे दुकान बंद करून घरी परतत असतांना दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी प्रवीण यांचा रस्ता अडवला आणि त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार करून त्यांची हत्या केली.

आरोपपत्रात म्हटले आहे की, समाजात दहशत, जातीय द्वेष, अशांतता पसरवणे आणि वर्ष २०४७ पर्यंत भारतात इस्लामी राजवट प्रस्थापित करणे, हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा डाव आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी गुप्त पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे. त्यांना ‘सर्व्हिस टीम’ किंवा ‘किलर स्क्वाड्स’ असे नाव देण्यात आले आहे. या सदस्यांना विशिष्ट समुदायांशी संबंधित व्यक्ती आणि नेते ओळखण्यासाठी अन् त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शस्त्रे अन् पाळत ठेवण्याच्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले होते. संघटनेच्या बैठकीत जिल्हा सेवा संघाचे प्रमुख मुस्तफा पाचर यांना विशिष्ट समाजातील प्रमुख व्यक्तीची ओळख पटवून त्यांना लक्ष्य करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ४ जणांची ओळख निश्‍चित करण्यात आली. त्यांपैकी प्रवीण नेत्तारू हे एक होते.