त्रिपुरात १६ फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँड येथे २७ फेब्रुवारीला मतदान !

तिन्ही राज्यांचा निकाल २ मार्चला घोषित होणार !

नवी देहली – केंद्रीय निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे दिनांक घोषित केले. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँड या राज्यांमध्ये २७ फेब्रुवारी या दिवशी मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल २ मार्च या दिवशी घोषित होतील.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, या तिन्ही राज्यांमध्ये ९ सहस्र १२५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ग्रामीण भागांमध्ये वर्ष २०१८ च्या तुलनेत ८२ टक्के अधिक मतदानकेंद्रे उभारण्यात आली आहेत. तिन्ही राज्यांतील ३७६ मतदानकेंद्रांचे दायित्व महिला कर्मचार्‍यांकडे देण्यात आले आहे. या ३ राज्यांत ६२ लाख ८ह सहस्र मतदार आहेत. त्यांपैकी ३१ लाख ४७ सहस्र महिला मतदार, तर ९७ सहस्र मतदार ८० वर्षांवरील आहेत.

जानेवारी २०२४ पर्यंत ९ राज्यांत निवडणुका !

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांमधील निवडणुकांचे दिनांक घोषित झाले असतांना कर्नाटकात एप्रिल किंवा मे मासात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याखेरीज मिझोरम विधानसभेचा कार्यकाळही या वर्षी १७ डिसेंबर या दिवशी संपत आहे. यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ जानेवारी २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळे जानेवारी २०२४ पर्यंत देशात ९ राज्यांत निवडणुका होण्याची शक्यता आहे