दाऊद इब्राहिमने केला दुसरा विवाह !  

भाचा अलीशाहाने दिली माहिती

नवी देहली – आंतरराष्ट्रीय आतंकवादी आणि मुंबईतील वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटांतील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम याने पाकिस्तानात दुसरे लग्न केले आहे. त्याची दुसरी पत्नी पाकच्या एका पठाण कुटुंबातील आहे. दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या अलीशाह या मुलाने गतवर्षी सप्टेंबर मासामध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (‘एन्.आय.ए.’ला) दिलेल्या जबाबात हे सांगितल्याचे आता समोर आले आहे.

१. एन्.आय.ए.ने मुंबईत काही मासांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. त्यात अनेकांना अटक केली  होती. त्या वेळी अलीशाह याचा जबाब नोंदवण्यात आला होता. एन्.आय.ए.ने यासंबंधी आरोपपत्र प्रविष्ट केले असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अलीशाहने सांगितले की, दाऊदने दुसरे लग्न केल्याचे त्याची पहिली पत्नी महजबीन यांनी स्वतः मला सांगितले. दाऊदने दुसरे लग्न करण्यापूर्वी पहिल्या पत्नीला तलाकही दिलेला नाही.

२. दाऊद इब्राहिमची दुसरी पत्नी कुठे रहाते ? तिचा दाऊदशी विवाह कधी झाला ? याची माहिती अलीशाहने दिली नाही, असेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. अलीशाहच्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम कराचीतील गाझी बाबा दर्ग्याच्या लगत असणार्‍या डिफेन्स विभागात वास्तव्यास आहे.

संपादकीय भूमिका 

दाऊदने किती विवाह केले, यापेक्षा त्याला भारतात कधी आणून फासावर कधी लटकवणार, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच भारतियांना वाटते !