६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्‍कर हिने रामनाथी आश्रमातील ‘प्रत्‍येक सजीव आणि निर्जीव वस्‍तू यांवर सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव लिहिलेे आहे’, असा भाव ठेवल्‍यावर तिला जाणवलेली सूत्रे !

कु. शर्वरी कानस्कर

१. भावसत्‍संगानंतर ‘प्रत्‍येक सजीव आणि निर्जीव वस्‍तू यांवर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव लिहिले आहे’, असा भाव मनात निर्माण होणे

‘एकदा मला रामनाथी आश्रमात जाण्‍याची संधी मिळाली. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे मला कु. योगिता पालन घेत असलेल्‍या भावसत्‍संगात उपस्‍थित राहून शिकण्‍याची संधी मिळाली आहे. एका भावसत्‍संगात योगिताताईंनी सांगितले, ‘‘आपल्‍या प्रत्‍येक पेशीवर गुरुदेवांचे नाव लिहिले आहे’, असा भाव दिवसभर अनुभवण्‍याचा प्रयत्न करा.’’ या भावसत्‍संगाच्‍या नंतर ‘केवळ माझ्‍याच शरिराच्‍या प्रत्‍येक पेशीवर नाही, तर रामनाथी आश्रमातील प्रत्‍येक सजीव आणि निर्जीव वस्‍तू यांवरही सूक्ष्मातून गुरुदेवांचे नाव लिहिले आहे’, असा भाव माझ्‍या मनात निर्माण झाला.

२. ‘सूक्ष्मातून वस्‍तूवर देवाचे नाव आहे’, असा भाव असणे !

२ अ. ‘आश्रम बांधतांना प्रत्‍येक विटेवर सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव लिहिले आहे’, असे वाटल्‍यावर ‘त्‍यावर पाय देणे’, हे पाप आहे’, असे वाटणे : रामनाथी आश्रमाच्‍या परिसरातील प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये चैतन्‍य असून ‘आश्रमाच्‍या प्रत्‍येक कणावर सूक्ष्मातून गुरुदेवांचे नाव लिहिले आहे आणि मला ते अनुभवायचे आहे’, असा विचार मनात आला. तेव्‍हा वाटले, ‘मार्गिकेतील लादीवरही सूक्ष्मातून गुरुदेवांचे नाव लिहिले आहे. त्‍यावर पाय ठेवून मी किती मोठे पाप करत आहे ?’ नंतर मी याविषयी चिंतन केले.

२ आ. रामसेतूचे निर्माण कार्य करतांना प्रत्‍येक विटेवर श्रीरामाचे नाव लिहिले असणे आणि ते श्रीरामाने निर्माण केलेले संरक्षककवच असणे : रामसेतू बांधण्‍याचे कार्य करतांना ‘सेतू बांधण्‍यासाठी प्रत्‍येक दगडावर श्रीरामाचे नाव लिहिले होते. तरीही हनुमंताने त्‍यावर पाय कसा दिला ? त्‍याला त्‍याचे पाप का लागले नाही ?’, असे प्रश्‍न मनात आल्‍यावर कृपाळू गुरुदेवांनी त्‍याचे उत्तर माझ्‍या लक्षात आणून दिले. ‘दगड पाण्‍यावर तरंगण्‍यासाठी त्‍यावर श्रीरामाचे नाव लिहिलेे होते. तेव्‍हा हनुमंताने ‘हे श्रीरामाने निर्माण केलेले संरक्षककवच असून ते सर्वांचे रक्षण करणार आहे’, असा भाव ठेवला होता; म्‍हणून त्‍याला पाप लागले नाही.

२ इ. रामनाथी आश्रमाचे बांधकाम करतांना ‘सूक्ष्म रूपात प्रत्‍येक विटेवर लिहिलेले परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव हे साधकांच्‍या रक्षणासाठी असलेले संरक्षककवच आहे’, असे वाटणे : रामनाथी आश्रम हा साक्षात् भूवैकुंठ आहे. अनिष्‍ट शक्‍ती रामनाथी आश्रमावर सतत आक्रमणे करतात, तरी आश्रम स्‍थिर आहे; कारण आश्रम बांधतांना सूक्ष्म रूपात प्रत्‍येक विटेवर गुरुदेवांचे नाव लिहिलेे होते. ते आपल्‍या संरक्षणासाठी प्रीतीस्‍वरूप गुरुदेवांनी निर्माण केलेले संरक्षककवच आहे. ‘यावरून गुरुदेव आपल्‍यावर किती कृपा आणि प्रीती करतात !’, हे माझ्‍या लक्षात आले.

‘गुरुदेवा, आपणच हे सूत्र मला सांगितले’, त्‍याबद्दल आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !  ‘मला तुमच्‍या चरणी स्‍थिर रहाता येऊ दे’, अशी मी तुमच्‍या चरणी प्रार्थना करते.’

– गुरुदेवांची,

कु. शर्वरी कानस्‍कर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १५ वर्षे), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (९.५.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक