‘श्रीमद़्भगवद़्गीता’ मराठीत काव्यमय आणि वाचकाभिमुख पद्धतीने लिहिण्याचे पू. किरण फाटक यांचे कार्य प्रशंसनीय !१. ‘श्रीमद़्भगवद़्गीता’ आधुनिक मराठी भाषेत काव्यबद्ध केल्याकरता पू. किरण फाटक यांचे अभिनंदन !‘जगातील अध्यात्माची ओढ असलेल्या असंख्य व्यक्ती श्रीकृष्ण आणि त्याने ‘श्रीमद़्भगवद़्गीते’मध्ये सांगितलेले तत्त्वज्ञान यांच्याकडे आकर्षित होतात. ‘महाभारता’तील अंतिम युद्धाच्या आधी ‘आप्तस्वकियांचे रक्त सांडून राज्य मिळवण्यात काय अर्थ आहे ?’, अशा संभ्रमात पडलेल्या शिष्य अर्जुनाला युद्धासाठी सिद्ध करण्याकरता जगद़्गुरु भगवान श्रीकृष्णाने केलेला उपदेश म्हणजे ‘भगवद़्गीता’ ! गीतेतील तत्त्वज्ञान आजही समस्त मनुष्यमात्रांसाठी मार्गदर्शक आहे. ‘मूळ संस्कृत भाषेत असलेली गीता सामान्यजनांना कळावी’, यासाठी तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर यांनी ती मराठी भाषेत आणली. त्यानंतर अनेकांनी भगवद़्गीता आणि ‘ज्ञानेश्वरी’ यांवर विपुल लेखन केले; परंतु सध्याच्या काळात आधुनिक मराठी भाषेत गीतेचा प्रत्येक अध्याय काव्यबद्ध करण्याचा मान पू. पं. किरण फाटक यांच्याकडे जातो. त्यांचा हा प्रयत्न आधुनिक मराठी वाङ्मयविश्वातील बहुधा पहिलाच प्रयत्न म्हणता येईल. त्याकरता प्रथम त्यांचे अभिनंदन ! २. पू. फाटक हे संत असल्यामुळे त्यांचे लेखन आणि गायन यांत चैतन्य असणेसहसा व्यक्तीची आध्यात्मिक पातळी जसजशी वाढत जाते, तसतशी तिची प्रतिभा जागृत होऊन तिचे विचार गद्य भाषेऐवजी पद्यातून, म्हणजे काव्यातून व्यक्त होऊ लागतात. महाराष्ट्राला तर ओव्या, अभंग, भारुडे इत्यादी प्रकारच्या काव्यांद्वारे स्वतःचे विचार मांडणार्या संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. पू. किरण फाटक हेही संतच आहेत. एवढेच नव्हे, तर स्वर आणि ताल यांच्याशी एकरूप झालेले अन् संगीताच्या माध्यमातून साधना करून संत झालेले व्यक्तीमत्त्व आहेत. साहजिकच त्यांचे लेखन त्यांच्या अंतःकरणातून स्वर-तालासहित काव्याच्या रूपात अभिव्यक्त झाले आहे. येथे वाचक-श्रोत्यांनी हे अवश्य लक्षात घ्यावे की, संतांच्या वाणीत चैतन्य असते. त्यामुळे या कवितांचे वाचन अथवा श्रवण भक्तीभावाने केल्यास त्यांतील चैतन्याचा वाचक-श्रोत्यांना अवश्य लाभ होईल. पू. किरण फाटक यांच्यातील, तसेच त्यांच्या गायनामधील चैतन्याची अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे. ३. वाचकांचा विचार करून कवितांसह त्यांवर निरूपणही लिहिणेपू. किरण फाटक यांच्या कवितांमधील आशयघन शब्दरचना, गेयता (गायनास योग्य असणे) आणि तालबद्धता ही त्यांच्या प्रतिभेची प्रचीती देतात. पू. फाटक केवळ कविता लिहून थांबले नाहीत, तर ‘वाचकांना कवितांमधील काही गोष्टी कठीण वाटू शकतील. त्यामुळे भगवद़्गीतेतील तत्त्वज्ञान कळण्यापासून ते वंचित राहू शकतील’, या विचाराने त्यांनी कवितांवर निरूपणही लिहिले. सर्वसामान्य वाचकांविषयी एवढे ममत्व केवळ संतांच्याच मनात असू शकते. अन्य अनेक कवी स्वतःचे पांडित्य दाखवण्यात धन्यता मानतात. पू. फाटक यांच्यासारखे संतरत्न सनातनशी जोडले गेले आणि सनातनच्या साधकांना त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत, याकरता मी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो ! ४. प्रार्थनाबहुतांश वेळा काव्य आणि संगीत पुन्हा पुन्हा वाचले अन् ऐकले जाते. तशी ‘ही काव्यमय आणि संगीतमय भगवद़्गीताही पुन्हा पुन्हा वाचली अन् ऐकली जावी. तिच्यातील विचार वाचक-श्रोत्यांच्या मनावर कोरले जावेत, तसेच वाचक-श्रोत्यांपैकी काहींच्या मनात तरी ‘यांतील एकतरी ओळ अनुभवावी’, अशी दृढ इच्छा निर्माण व्हावी, अशी मंगलकामना करतो. पू. किरण फाटक यांच्या अशा अभिनव सांगीतिक संकल्पना साकार व्हाव्यात आणि त्यांद्वारे त्यांची संगीतसाधना दृढ व्हावी’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (२६.१२.२०२२) |
फोंडा (गोवा) – १२.१.२०२३ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रामध्ये डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी लिहिलेल्या ‘काव्यात्मक भगवद़्गीता’ या ग्रंथाचे प्रकाशन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते करण्यात झाले. पू. किरण फाटक यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून गीतेचे १८ अध्याय प्रथमच काव्यरूपात आणि भावार्थासह जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ‘संस्कार प्रकाशना’ने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. या सोहळ्याला ग्रंथाचे प्रकाशक श्री. प्रसाद कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती. या ग्रंथाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा शुभसंदेशही लाभला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी केले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी या ग्रंथासाठी दिलेला शुभसंदेश सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी वाचून दाखवला.
पू. किरण फाटक यांनी व्यक्त केलेले मनोगत
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणे, हा माझ्या जीवनातील भाग्याचा क्षण !
मी लिहिलेल्या या कविता संग्रहाचे प्रकाशन अध्यात्मात अत्यंत उच्च पातळीवर असलेले प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते होणे, हा खरोखर माझ्या जीवनातील भाग्याचा क्षण आहे.
त्या वेळी वाटले ‘मला एवढ्या थोर माणसाकडे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे) जायला मिळत आहे, म्हणजे त्यांचे आशीर्वाद मिळाले. या ग्रंथाला तर स्वामी समर्थांची मोठी कृपा लाभली आहे. त्यांच्याच प्रेरणेने येथे येऊन हे प्रकाशन करता आले.
‘काव्यात्मक भगवद़्गीता’ या ग्रंथाचे प्रकाशक श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केलेले मनोगत
पू. किरण फाटक यांच्या संदर्भात जे काही मी अनुभवले आहे, ते सर्व दैवीच वाटते !
माझ्यासाठी आजचा दिवस हा मोठा दिवस आहे. शास्त्रीय संगीतविषयक प्रकाशन करणे, हे माझे मुख्य कार्य आहे आणि पू. पं. किरण फाटक यांची सर्वच पुस्तके मी प्रकाशित केली आहेत. जरी मी शास्त्रीय संगीतविषयक प्रकाशनचे कार्य करत असलो, तरी अध्यात्म आणि शास्त्रीय संगीत मी वेगळे मानतच नाही. पू. किरण फाटक यांच्या संदर्भात जे काही अनुभवले आहे, ते सर्व मला दैवीच वाटते. त्यांच्या सर्व कार्यासाठी त्यांच्यावर स्वामी समर्थांची कृपा अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे, हे मी अनुभवतो आहे. आठवलेगुरुजींच्या (सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. आठवले यांच्या) हस्ते हे प्रकाशन होणे, ही अर्थातच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.