गुरुकृपायोगानुसार साधना करतांना साधकाच्या चित्तावर गुरुतत्त्वाची स्थाने निर्माण होऊन त्याचा साधकाला साधनेसाठी पुष्कळ लाभ होणे !

वर्ष २०१० मध्ये मला ‘गुरुकृपायोगानुसार साधनेद्वारे होणारी चित्तशुद्धी’ या विषयावरचे ज्ञान मिळाले होते; परंतु त्या ज्ञानात असणार्‍या त्रासदायक शक्तीमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या ज्ञानाची धारिका इतकी वर्षे वाचली नव्हती. काही दिवसांपूर्वी (२५.१२.२०२१) ती धारिका वाचल्यानंतर त्यांनी मला ‘ही धारिका वाचतांना आता काय जाणवते ?’, ते लिहून पाठवण्यास सांगितले होते. ती धारिका वाचतांना मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ज्ञानाची धारिका वाचतांना परात्पर गुरु डॉ. आठवले विष्णुस्वरूपात दिसून ‘धारिकेच्या माध्यमातून साधकांकडे विष्णुतत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे

ज्ञानाची धारिका वाचायला आरंभ केल्यावर मला परात्पर गुरु डॉ. आठवले विष्णुस्वरूपात उभे असलेले दिसले. त्या वेळी ‘त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा असून धारिकेतून साधकांकडे आशीर्वादस्वरूप प्रकट विष्णुतत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

सौ. कोमल जोशी

२. ‘ॐ’ च्या स्वरूपात निर्गुण चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवून भावजागृती होऊन आनंद मिळणे

धारिकेतील काही अक्षरांतून मला ‘ॐ’च्या स्वरूपात निर्गुण चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवले. धारिकेतून येणार्‍या ‘ॐ’मधून माझ्याभोवती चैतन्याचे गोल संरक्षककवच निर्माण झाले. ते पहातांना माझी ईश्वरप्राप्ती आणि स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करण्याची तळमळ वाढली, तसेच माझा भाव जागृत होऊन मला आनंदही अनुभवता आला.

३. साधिकेला तिच्या चित्तावर काळ्या रंगाचे असंख्य बिंदू दिसणे, ‘ते बिंदू म्हणजे तिच्यातील स्वभावदोष असल्याचे आणि बाकी सर्व बिंदू प्रारब्धाचे निर्देशक आहेत’, असे वाटणे

धारिका पुढे वाचत गेल्यावर माझे मन निर्विचार होऊ लागले आणि माझा ‘महाशून्य’ हा नामजप आपोआप अन् श्वासासमवेत चालू झाला. मनाची निर्विचार अवस्था अनुभवतांना मला माझे चित्त दिसू लागले. माझ्या चित्ताचा रंग फिकट पिवळसर होता. त्याच्याभोवती फिकट आकाशी रंगाच्या कडा असून त्यांच्याभोवती मला जाडसर लाल रंगाचे क्षात्रतेजाचे वलय दिसले. माझ्या चित्तावर काळ्या रंगाचे असंख्य लहान-मोठे बिंदू दिसले. ‘या बिंदूंतील काही बिंदू म्हणजे माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे होते, तर उर्वरित बिंदू माझ्या प्रारब्धाचे द्योतक आहेत’, असे मला जाणवले.

४. चित्तावर निर्माण झालेल्या गुरुतत्त्वाच्या स्थानांमुळे होणारे अनमोल लाभ !

अ. साधक गुरुकृपायोगानुसार करत असलेल्या साधनेमुळे साधकाच्या चित्तावर गुरुतत्त्वाची स्थाने निर्माण होतात. मला माझ्या चित्तावर पांढरट रंगाची गुरुतत्त्वाची स्थाने दिसली. ही गुरुतत्त्वाची स्थाने मला ‘साधना आणि गुरुसेवा यांपासून कधीच दूर नेणार नाहीत’, याची निश्चिती देत होती.

आ. त्यानंतर ‘माझ्या चित्तावर असलेली गुरुतत्त्वाची स्थाने मला त्रास देणार्‍या वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढत आहेत’, असे मला जाणवले.

इ. ‘माझ्या चित्ताभोवती वाईट शक्तींनी त्रासदायक शक्तीचे आवरण आणले असूनही माझ्या चित्तावर निर्माण झालेल्या गुरुतत्त्वाच्या स्थानांमुळे वाईट शक्तींना माझे चित्त कह्यात घेता आले नाही’, असे मला जाणवले.

ई. ‘गुरुतत्त्वाच्या स्थानातून चैतन्यरूपी ऊर्जा मिळून साधकांचे मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढायला साहाय्य होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

उ. ‘अष्टांग साधने’ने (टीप) चित्तावर निर्माण झालेल्या गुरुतत्त्वाच्या स्थानांमधूनच आपत्काळामध्ये गुरुतत्त्व साधकांना सूक्ष्मातून मार्गदर्शन करील. त्यामुळे साधक कोणत्याही परिस्थितीत साधनारत राहून आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेतील.

टीप – स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, सत्साठी त्याग आणि (निरपेक्ष) प्रीती ही गुरुकृपायोगानुसार साधनेची ८ अंगे असून त्याला ‘अष्टांग साधना’ म्हणतात.

ऊ. वाईट शक्तींनी चित्तावर वाढवलेली स्वभावदोष आणि अहं यांची स्थाने याच गुरुतत्त्वरूपी चैतन्यामुळे मला विरघळतांना जाणवली.

ए. ‘साधकांच्या चित्ताकडे येणारा गुरुतत्त्व आणि कृष्णतत्त्व यांचा ओघ साधकांना स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी तळमळ वाढवून त्यांना कृतीशील ठेवत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

५. आश्रमातील चैतन्य आणि गुरुकृपा यांचा साधकांना होणारा लाभ !

५ अ. केवळ गुरुकृपा आणि आश्रमातील चैतन्य यांमुळे वाईट शक्ती साधिकेच्या चित्तावर अयोग्य संस्कार करू न शकणे : मला ‘वेळोवेळी मिळालेले सत्संग, आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि सेवा’ यांमुळेही वाईट शक्तींना मला पुष्कळ त्रास देता आला नाही. आश्रमातील चैतन्यमय वातावरण आणि साधक अन् संत यांच्या सहवासात, म्हणजेच चैतन्यमय वातावरणात राहिल्याने मोठ्या वाईट शक्तींनी वेळोवेळी असंख्य आक्रमणे करूनही माझ्या चित्तावर अयोग्य किंवा नवीन संस्कार झाले नाहीत. हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले.

५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांसाठी केलेला संकल्प, इतर संतांचे सत्संग आणि साधकांची साधनेची तळमळ यांमुळे साधक सकारात्मक रहाणे : स्वभावदोष आणि अहं यांमुळे चित्तावर निर्माण झालेली स्थाने अन् वाईट शक्तींची असंख्य आक्रमणे होऊनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांसाठी केलेला संकल्प, इतर संत आणि उन्नत साधक यांचे मार्गदर्शन यांमुळे साधकांच्या चित्तावर साधना करण्याचा योग्य संस्कार होतो. व्यष्टी आढावे आणि सत्संग यांमुळे साधकांची तळमळ वाढत जाऊन अयोग्य अन् नकारात्मक संस्कार नष्ट होऊन साधकांच्या मनाची सकारात्मकता वाढत जाते.

या लेखाच्या माध्यमातून साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची संकल्पशक्ती कार्यरत झाली असून गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या सर्व साधकांना याचा साधनेसाठी लाभ होईल. साधना करण्याची आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ असलेल्या, तसेच स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करणार्‍या साधकांना त्यांच्यातील भाव आणि तळमळ यांनुसार त्याचा लाभ होईल.

मला ही प्रक्रिया अनुभवता आली, त्यासाठी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. कोमल (स्मिता) जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१२.२०२१)


 या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.