‘इस्रो’ने जोशीमठाची भूमी खचत चालल्याची उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे संकेतस्थळावरून हटवली !

उत्तराखंडच्या मंत्र्यांच्या सूचनेनंतर कार्यवाही

मंत्री डॉ. धनसिंह रावत (उजवीकडे)

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड सरकारमधील मंत्री डॉ. धनसिंह रावत यांच्या सूचनेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने जोशीमठ गावाच्या भूस्खसलनाची उपग्रहाच्या माध्यमांतून घेतलेली छायाचित्रे हटवण्यास सांगितल्यानंतर तिच्या संकेतस्थळावरून ती हटवली आहेत. या छायाचित्रांद्वारे जोशीमठ गेल्या १२ दिवसांत ५.४ सेंटीमीटरने खचल्याचे समोर आल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मंत्री डॉ. धनसिंह रावत यांनी सांगितले की, इस्रोची छायाचित्रे वृत्तवाहिन्यांवरून दाखवण्यात आल्यानंतर जोशीमठामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याविषयी इस्रोच्या संचालकांशी दूरभाषवरून बोलतांना मी त्यांना ‘या संदर्भात इस्रोने अधिकृत निवेदन सादर करावे किंवा ही छायाचित्रे हटवावीत’, अशी विनंती केली. यानंतर इस्रोने तिच्या संकेतस्थळावरून ही छायाचित्रे हटवली आहेत.