(म्हणे) ‘वर्ष २०२९ पर्यंत अर्ध्या, तर वर्ष २०३५ पर्यंत संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवणार !’

जिहादी तालिबानचा दावा !

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानच्या एका आतंकवाद्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात तालिबानी आतंकवादी वर्ष २०२९ पर्यंत अर्ध्या, तर वर्ष २०३५ पर्यंत संपूर्ण भारतावर तालिबानचे नियंत्रण असेल, असा दावा करण्यात आला आहे. ‘हा व्हिडीओ पाकिस्तानी तालिबानचा आहे कि अफगाणिस्तानमधील तालिबानचा आहे’, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सौजन्य न्यूज नेशन 

गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनुसार हा व्हिडिओ एक मिनिटाचा आहे. त्यामध्ये  तालिबान सरकारचे सैनिक त्यांच्या शस्त्रांचे प्रदर्शन करत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये ‘जगातील कुठल्या देशावर कधी नियंत्रण मिळवले जाईल ?’, हे क्रमवार पद्धतीने सांगितले गेले आहे. तसेच एक मानचित्र (नकाशा) दाखवण्यात आले आहे. यात वेगवेगळ्या देशांची नावे लिहिण्यात आली आहेत. शेजारी वर्षे दिसत आहेत. त्यानुसार वर्ष २०२९ पर्यंत अर्ध्या भारतावर, वर्ष २०३२ पर्यंत अर्ध्या इराणवर, वर्ष २०३५ पर्यंत संपूर्ण भारतावर, वर्ष २०३७ पर्यंत तुर्कमेनिस्तानवर, वर्ष २०४० पर्यंत संपूर्ण इराणवर, तर वर्ष २०७० येईपर्यंत तालिबान रशियावर नियंत्रण मिळवेल, असा दावा करण्यात आला आहे. यात कुठेही पाकिस्तानचे नाव घेण्यात आलेले नाही.

संपादकीय भूमिका 

तालिबान्यांनी अफगाणिस्तान कह्यात घेतल्यानंतर त्यांना मोठमोठी दिवास्वप्ने  पडू लागली आहेत, हेच यातून लक्षात येते !