‘४.१२.२०२१ या दिवशी माझे यजमान श्रीकांत भट (वय ६२ वर्षे) यांचे निधन झाले. गेल्या २ वर्षांपासून त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आजार होते. त्यानंतर त्यांना ‘डायलिसिस’चे (टीप) उपचार चालू झाले. त्यांना औषधे देणे, त्यांचा रक्तदाब पहाणे आणि त्यांना ‘डायलिसिस’ करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जाणे इत्यादी सर्व सेवा मला कराव्या लागत होत्या. त्या सेवा करतांना मी स्वतःला विसरून गेले. त्यांच्या निधनानंतर माझे काही सूत्रांवर चिंतन झाले. मी ते कृतज्ञतापूर्वक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
(टीप : डायलिसिस – मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया)
१. सत्संगाला जाण्यापूर्वी मनाची स्थिती
आमचा विवाह झाल्यानंतर आरंभी आम्हा दोघांचे स्वभाव भिन्न असल्यामुळे आम्ही वैवाहिक सौख्य अधिक अनुभवले नाही. तेव्हा ‘हिंदु धर्मात पतीला परमेश्वर मानले जाते’, असे कुणी म्हणाले, तर मला पुष्कळ राग येत असे.
२. सनातन संस्थेच्या सत्संगाला गेल्यामुळे नामस्मरण, सत्संग आणि सत्सेवा यांतून आनंद मिळणे
९.११.१९९७ या दिवशी मला अकोला शहरात सनातन संस्थेच्या वतीने चालू झालेला सत्संग ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्या सत्संगात ‘जीवनातील सुख आणि दुःख यांच्या कारणांचे प्रमाण, पती-पत्नीचे एकमेकांशी असलेले देवाण-घेवाण हिशोब, प्रारब्ध, तसेच जीवनात आनंदप्राप्तीसाठी कोणती साधना करावी ? साधनेमुळे दुःख निवारण होऊन आनंदी रहाता येते’, असे शिकवले जात होते. सत्संगात उपस्थित रहाणार्या जिज्ञासूंकडून नामस्मरण, सत्सेवा इत्यादी करून घेतले जात होते. आम्ही (मी आणि यजमान) आवडीने ते सर्व प्रयत्न करत होतो. त्यातून आम्हाला आनंद मिळत होता.
३. सत्संगात ‘कुटुंबातील रुग्णाईत व्यक्तीची सेवा करतांना गुरूंची सेवा करत आहोत’, असा भाव ठेवायला शिकवल्यामुळे त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करणे
त्यानंतर सत्संगात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया अन् भावजागृतीचे प्रयत्न या संदर्भात शिकवण्यास आरंभ झाला. आम्ही त्यासाठीचे प्रयत्न अल्प प्रमाणातच करत होतो. असे करता करता २० वर्षे सरली. त्यानंतर माझे यजमान रुग्णाईत झाले. सत्संगात ‘कुटुंबातील रुग्णाईत व्यक्तीची सेवा करतांना गुरूंची सेवा करत आहोत’, असा भाव ठेवून करायला हवी’, असे सांगितले होते. त्यानुसार मी यजमानांची सेवा करण्याचा प्रयत्न करू लागले. परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला यजमानांची सेवा करणे काही प्रमाणात शक्य होत होते.
४. भावाच्या स्तरावर यजमानांची सेवा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे साधिकेमध्ये झालेले पालट
अ. माझ्या मनात ‘मला सेवा करण्यासाठी पती आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे’, असा विचार येऊन माझ्यामध्ये परिवर्तन झाले.
आ. यजमानांची सेवा करत असतांना मला स्वतःचा विसर पडला.
इ. सत्संगाच्या प्रभावामुळे हिंदु धर्मात सांगितलेले ‘पती हा परमेश्वर असतो’, हे सूत्र माझ्या अंतर्मनाला पटले होते.
ई. घरातील आणि बाहेरची कामे करणे, यजमानांना ‘डायलिसिस’साठी नेणे अन् आणणे, तसेच अन्य सेवा करूनही मला थकवा जाणवत नव्हता किंवा कंटाळा येत नव्हता. मी सतत उत्साही असायचे. मला आनंदी रहाता येत होते.
५. यजमानांमध्ये जाणवलेला पालट
यजमानांना माझ्याविषयी प्रेम वाटू लागले होते. देवाने त्यांच्यातही आमूलाग्र पालट केला होता.
६. आम्ही दोघेही ‘भक्तीसत्संग’ भावाच्या स्तरावर ऐकत होतो.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीच्या दृढ श्रद्धेच्या बळावर यजमानांच्या निधनानंतर स्थिर रहाता येणे आणि अल्प कालावधीत पुन्हा सेवेला आरंभ करणे
यजमानांच्या शेवटच्या दिवसांत मी अखेरपर्यंत प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात होते. ‘प.पू. डॉक्टर यजमानांचा उद्धार करणार आहेत’, अशी माझ्या मनात दृढ श्रद्धा होती. मला या श्रद्धेच्या बळावरच पुष्कळ स्थिर रहाता येत होते. यजमानांच्या निधनानंतर मी एका मासाच्या आतच पुन्हा समष्टी सेवेला आरंभ केला. तेव्हा पती निधनामुळे जाणवणारे दुःख मी बहुतांशी विसरून गेले.
गुरुदेवांचीच ही कृपा आहे. सनातन संस्थेत जी साधना शिकवली जाते, तिची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. सनातनच्या सत्संगातील ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ हा केवळ आणि केवळ अनुभवण्याचा विषय आहे.’
– अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट, अकोला (१२.६.२०२२)