॥ श्रीकृष्णाय नम: ॥
ग्रंथ वाचून किंवा गुरुंकडून शिकून धार्मिक कृतींचे ज्ञान झाले तरी त्यांचे कार्य शेष असते. जपाचे मंत्र, संख्या इत्यादी जाणले तरी पुढे प्रत्यक्ष जप करणे आणि त्याचे फळ मिळणे शेष असते, तसेच जप पुन्हा पुन्हा प्रतिदिन करावा लागतो. भजने, अभंग इत्यादी वाचून किंवा ऐकून माहित झाले तरी भजन करणे, अभंग गाणे शेष असते. यज्ञांचे साहित्य, मंत्र, विधी इत्यादींचे ज्ञान ग्रंथांतून किंवा गुरुंकडून झाले तरी प्रत्यक्ष यज्ञ करणे आणि त्याचे फळ मिळणे शेष असते.
आत्मज्ञानाचा (तत्त्वज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा) उद्देश आत्मानात्मविवेक करवणे आणि आत्मा, परमात्मा, ईश्वर, ब्रह्म ह्यांच्या स्वरूपाविषयी अज्ञान दूर करणे हा असतो. एकदा आत्मा-अनात्माचा, नित्य-अनित्याचा बोध झाला की आत्मा अनित्यात गुंतत नाही. ज्ञान्याला कोणतेही कर्तव्य उरत नाही. ज्ञानाचे कार्य पूर्ण होते. गीता, उपनिषदे इत्यादी ग्रंथात सांगितलेल्या आत्मज्ञानाचा एकदा बोध झाला की अज्ञान मिटून ज्ञानाचे कार्य संपते. अज्ञान नाहीसे होणे, हे आत्मज्ञानाचे फळ आहे. पुन्हा पुन्हा काही करावे लागत नाही.
– अनंत आठवले. २५.०९.२०२२