नाशिक महापालिकेच्या माजी वैद्यकीय अधीक्षक दांपत्यासह ९ आधुनिक वैद्य आणि ११ जण यांवर खटला प्रविष्ट !

अवैध सोनोग्राफीच्या व्यवसायाचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – अवैध सोनोग्राफीचा व्यवसाय केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी आणि त्यांची पत्नी यांच्यासह ९ आधुनिक वैद्य आणि ११ जण यांच्यावर नाशिक महापालिकेने नाशिक रोड न्यायालयात खटला प्रविष्ट केला आहे. पीसीपीएन्डीटी कायद्याच्या अंतर्गत उल्लंघन करत गर्भलिंग निदान करण्यासाठी अवैध सोनोग्राफी यंत्राचा वापर बालाजी रुग्णालयात केला जात होता.

प्रत्यक्षात या कायद्यांतर्गत कोणतेही यंत्र रुग्णालयात चालू करण्याआधी किंवा बाळगण्यास आधी महापालिका वैद्यकीय विभागाची अनुमती घ्यावी लागते. या कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा आणि ५० सहस्र रुपयांच्या शिक्षेची तरतूद आहे.

या रुग्णालयाचे माजी संचालक आणि सध्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या आधुनिक वैद्य असणार्‍या संचालकांवरही कारवाई केली जाणार आहे. यापूर्वीही नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोगतज्ञ असलेल्या डॉ. वर्षा लहाडे यांनीही भ्रूणहत्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. भंडारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई प्रस्तावित केल्याचे सांगण्यात येत आहे. सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

आरोग्य क्षेत्रात अवैध कामे करणार्‍यांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !