तमिळनाडूच्या विधानसभेत राज्यपालांनी अभिभाषणात संदर्भ गाळल्याने गदारोळ

राज्यपालांकडून सभात्याग !

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू विधानसभेच्या अधिवेशनाच्या ९ जानेवारीला असलेल्या पहिल्या दिवशी राज्यपाल रवि यांनी त्यांच्या अभिभाषणातील काही संदर्भ गाळल्याने आणि काही नवीन सूत्रे मांडल्याने मोठा गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात केवळ मूळ भाषण नोंदवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मांडला. यानंतर राज्यपालांनी सभात्याग केला.

१. राज्यपाल रवि यांनी काही दिवसांपूर्वी तमिळनाडूचा उल्लेख ‘तमिळगम’ असा केला होता. या नावासाठी ते आग्रही आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या अभिभाषणाच्या वेळी द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) आणि त्याच्या सहकारी पक्षांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला; मात्र राज्यपालांनी अभिभाषण चालूच ठेवले. यासह त्यांनी भाषणात आयत्यावेळी स्वतःचे काही संदर्भ जोडले.

२. राज्यपालांच्या या कृतीवर मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी संताप व्यक्त केला आणि मूळ अभिभाषणच इतिवृत्तात समाविष्ट करण्याविषयीचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव संमत झाला. राज्यपालांच्या उपस्थितीतच या घडामोडी घडल्या. यानंतर राष्ट्रगीताद्वारे कामकाजाचा समारोप होण्यापूर्वीच राज्यपालांनी सभात्याग केला. राज्यपालांनी याप्रकारे सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.