तमिळनाडूमध्ये रक्ताद्वारे चित्र काढण्यावर सरकारकडून बंदी

तमिळनाडूचे आरोग्यमंत्री एम्.ए. सुब्रह्मण्यम्

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) सरकारने रक्ताने बनवलेल्या चित्रांवर बंदी घातली आहे. यामागे राज्यात ‘ब्लड आर्ट’चा (रक्त कलेचा) प्रकार वाढल्याचे कारण सांगितले जात आहे.

२८ डिसेंबर २०२२ या दिवशी तमिळनाडूचे आरोग्यमंत्री एम्.ए. सुब्रह्मण्यम् चेन्नईतील एका फोटो स्टुडिओत पोचले. तेथे चित्रकलेसाठी ठेवलेल्या रक्ताच्या अनेक छोट्या बाटल्या आणि सुया पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले. त्याच वेळी त्यांनी रक्ताने चित्रे बनवणार्‍या स्टुडिओवर बंदी घालण्याची घोषणा केली. स्टुडिओमध्ये रक्त घेण्याची प्रक्रिया निर्धारित नियमानुसार होत नसल्याचे आढळून आले. येथे एकच सुई अनेक लोकांचे रक्त काढण्यासाठी वापरली जात असल्याचे आढळले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होतो. मंत्री सुब्रह्मण्यम् म्हणाले, ‘‘रक्ताने चित्र बनवणार्‍या व्यक्ती किंवा संस्था यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. ‘रक्त कला’ दंडनीय आहे. रक्तदान हे सामाजिक कार्य आहे. चित्र काढण्यासाठी रक्त काढणे स्वीकार्य नाही. प्रेम आणि आपुलकी दाखवण्याचे आणखी बरेच मार्ग आहेत. यामध्ये रक्त कला समाविष्ट करू नये.’’