पुणे, ८ जानेवारी (वार्ता.) – काश्मीरमध्ये झालेला हिंदूंचा वंशविच्छेद हा धार्मिकच असून त्याची कायद्यानुसारच चौकशी झाली पाहिजे. पंतप्रधान योजनेअंतर्गत काश्मीरमध्ये नोकरी करत असलेल्या काश्मिरी हिंदूंना गेले ४ मास वेतन दिलेले नाही. ते उपोषण करत आहेत. त्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली जात आहे. त्यामुळे त्यांच्यात भय निर्माण झाले आहे. सध्याचे सरकार त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. काश्मीरमधील आतंकवाद संपवायचा असेल, तर सर्व काश्मिरी हिंदूंना एकाच ठिकाणी पुनर्स्थापित केले पाहिजे. त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे, तसेच त्यांच्यासाठी ‘केंद्रशासित प्रदेश’(होमलँड) निर्माण केला पाहिजे, अशी मागणी काश्मिरी हिंदूंसाठी लढणार्या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे श्री. राहुल कौल यांनी केली. या वेळी ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे सचिव श्री. रोहित भट, पुणे समन्वयक श्री. सुनील रैना, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले उपस्थित होते. श्री. राहुल कौल पुढे म्हणाले, ‘‘काश्मीरमध्ये वर्ष १९९० पासून आतापर्यंत २३ वेळा हिंदूंना लक्ष्य करून मारण्यात (टार्गेट किलींग) आले आहे. जे नोकरीच्या निमित्ताने काश्मीरमध्ये गेले आहेत, त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अगदी आधार कार्ड पाहून हिंदूंना ठार मारले जात आहे. त्यातून आतंकवाद्यांना सरकारला ‘कलम ३७० रहित करूनही काही उपयोग नाही, काश्मीर हे आमचेच आहे’, हेच सांगायचे आहे. सध्याचे सरकार हे काश्मीर येथील हिंदूंच्या हत्यांकडे ‘धर्मनिरपेक्ष’ दृष्टीने पहात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. गेल्या ३ दशकांमध्ये काश्मीरमधून केवळ हिंदूंना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या वर्ष १९९० पेक्षाही परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. सध्याच्या सरकारकडे काश्मिरी हिंदूंची ‘घरवापसी’ (विस्थापित काश्मिरी हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवणे) करण्याचा असा कोणताही ठोस आणि कृतीशील कार्यक्रम नाही. केवळ नोकरी देऊन उपयोग होणार नाही. इतर काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये कसे आणणार ?
आजही काश्मिरी हिंदूंवर अत्याचार होतच आहेत ! – आनंद दवे
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. आनंद दवे म्हणाले, ‘‘हिंदूंना भाजप सरकारकडून अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होतांना दिसून येत नाहीत. आजही काश्मिरी हिंदूंवर अत्याचार होतच आहेत.’’
काश्मीरमधील ६ सहस्रांहून अधिक गावांना इस्लामी नावे ! – पराग गोखले
हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले म्हणाले, ‘‘आज काश्मीरमधील ६ सहस्रांहून अधिक गावांची नावे इस्लामी करण्यात आली आहेत. हिंदु जनजागृती समिती वर्ष २००८ पासून काश्मिरी हिंदूंच्या आंदोलनांमध्ये सहभागी होत आहे, तसेच समितीच्या वतीने अनेक सभा, छायाचित्रांची प्रदर्शने यांद्वारे काश्मिरी हिंदूंची समस्या समजासमोर मांडली आहे.’’