नागपूर खंडपिठाची फेसबुकला नोटीस !

  • नायलॉन मांजा विक्रीचे प्रकरण

  • ११ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्‍याचे निर्देश !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठ

नागपूर – बंदी असलेल्‍या नायलॉन मांजाची विक्री केल्‍याप्रकरणी ‘फेसबुक इंडिया ऑनलाईन सर्व्‍हिस प्रा. लि.’ला मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाने ६ जानेवारी या दिवशी नोटीस बजावली आहे, तसेच ११ जानेवारीपर्यंत उत्तर देण्‍याचा आदेशही दिला आहे. नायलॉन मांजामुळे होणारी जीवितहानी आणि घडणार्‍या घटना यांची उच्‍च न्‍यायालयाने गंभीर नोंद घेत जनहित याचिका प्रविष्‍ट करून घेतली आहे. या प्रकरणी न्‍यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्‍यायमूर्ती वृषाली जोशी यांच्‍या समक्ष सुनावणी झाली. ‘नायलॉन मांजाच्‍या संदर्भात जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍थापन केलेल्‍या समितीने ११ जानेवारीपूर्वी बैठक घेत कोणत्‍या उपाययोजना करता येतील, याची आखणी करावी’, असेही न्‍यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

सुनावणीच्‍या वेळी ‘काही ‘पोर्टल’वर ‘ऑनलाईन’ नायलॉन मांजाची विक्री चालू असून त्‍याचे विज्ञापनही केले जात आहे’, अशी माहिती न्‍यायालयीन मित्रांनी न्‍यायालयाला दिली. त्‍यानुसार फेसबुकच्‍या अखत्‍यारीत येणार्‍या ‘फेसबुक इंडिया ऑनलाईन सर्व्‍हिस प्रा. लि. मुंबई’ आणि ‘इंडिया मार्ट इंटर मेश लि. देहली’ या २ आस्‍थापनांना न्‍यायालयाने नोटीस बजावली, तसेच पोलीस आयुक्‍त आणि पोलीस उपायुक्‍त (ग्रामीण) यांनी जिल्‍ह्यातील नायलॉन मांजा विक्रीला आळा बसावा म्‍हणून कोणत्‍या उपाययोजना केल्‍या ? याविषयी उत्तर देण्‍याचा आदेश न्‍यायालयाने दिला आहे. ‘न्‍यायालय मित्र’ म्‍हणून देवेन चव्‍हाण आणि महापालिकेच्‍या वतीने अधिवक्‍ता जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.