‘कार्यकर्ते आणि साधक यांची व्‍यष्‍टी साधना चांगली असणे’ हाच सर्व शिबिरांचा प्राथमिक निकष असल्‍याने व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करून शिबिरात सहभागी व्‍हा !

कार्यकर्ते आणि साधक यांच्‍यासाठी महत्त्वाची सूचना !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

उत्तरदायी साधकांनी व्‍यष्‍टी साधनेच्‍या निकषाच्‍या आधारे साधकांची शिबिरात सहभागी होण्‍यासाठी निवड करावी !

साधक आणि कार्यकर्ते व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न योग्‍य अन् नियमित करत असले, तरच त्‍यांची शिबिर आणि कार्यशाळा यांत सहभागी होण्‍यासाठी निवड करावी.

१. शिबिरार्थींच्‍या साधनेच्‍या प्रयत्नांवर शिबिराची फलनिष्‍पत्ती अवलंबून असणे

‘परिणामकारक धर्मप्रचार होणे आणि साधकांची साधनावृद्धी होणे, यांसाठी राष्‍ट्रीय स्‍तरावर, तसेच विविध जिल्‍ह्यांत ‘साधना शिबिर’, ‘वक्‍ता-प्रवक्‍ता कार्यशाळा’, ‘नेतृत्‍वगुणवृद्धी शिबिर’ आदी शिबिरांचे आयोजन करण्‍यात येते. अनेक कार्यकर्ते आणि साधक यांत सहभागी होत असतात. शिबिरांत सहभागी होणार्‍या शिबिरार्थींच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा पाया चांगला असेल, तरच ते शिबिराचा १०० टक्‍के लाभ करून घेऊ शकतात.

२. व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न सातत्‍याने करण्‍याचे महत्त्व !

इमारतीचा पाया भक्‍कम असेल, तरच त्‍यावर भक्‍कम इमारत उभी राहू शकते. त्‍याप्रमाणे व्‍यष्‍टी साधनेचा पाया भक्‍कम असेल, तरच परिणामकारक समष्‍टी साधनेची इमारत उभी राहू शकते. एखाद्या साधकामध्‍ये स्‍वभावदोष, अहं आणि आध्‍यात्मिक त्रास यांची तीव्रता असेल, तर त्‍याच्‍याकडून ईश्‍वरप्राप्‍तीसाठी करायचे साधनेचे प्रयत्न अन् सेवा योग्‍य प्रकारे होत नाही, तसेच त्‍याला कौशल्‍य विकासाच्‍या दृष्‍टीने कितीही नवीन गोष्‍टी शिकवल्‍या, तरीही त्‍याचा विशेष परिणाम होत नाही.

स्‍वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया, तसेच नामजपादी उपाय या माध्‍यमांतून जे साधक स्‍वतःच्‍या अडचणी सोडवू शकतात, तेच इतरांच्‍या अडचणी सोडवू शकतील आणि त्‍यांना कार्यात जोडून घेऊ शकतील.

३. शिबिरात सहभागी होण्‍यासाठीचे निकष

स्‍वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन यांची सारणी लिहिणे, स्‍वयंसूचना पद्धत समजून घेऊन त्‍या बनवणे, नियमित स्‍वयंसूचना सत्रे करणे, भावजागृतीचे प्रयत्न करणे, नामजपादी उपाय इत्‍यादी व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे करणारे साधक आणि कार्यकर्ते यांचीच निवड पुढील सर्व शिबिरांसाठी करण्‍यात येईल.

साधकांनो, नियमित व्‍यष्‍टी साधना केल्‍याने समष्‍टी कार्य करण्‍यासाठी ईश्‍वराचे पाठबळ मिळून गुरुकार्य परिपूर्ण होते !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२२)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.