(म्हणे) ‘मी हिंदु आहे; पण हिंदुत्वाच्या विरोधात आहे ! – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

बेंगळुरू – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी ६ जानेवारी २०२३ या दिवशी हिंदुत्वाविषयी वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘‘राममंदिराला मी कधीच विरोध केला नाही. मी हिंदु आहे; पण हिंदुत्वाच्या विरोधात आहे.’’ (‘ज्याप्रमाणे साखर आणि तिचा गोडवा आपण वेगळा करू शकत नाही, त्याचप्रमाणे हिंदु आणि हिंदुत्वाचे आहे’, हेही न कळणारे सिद्धरामय्या ! – संपादक)

१. राममंदिराला माध्यम बनवून राजकीय लाभ उठवणार्‍यांच्या मी विरोधात आहे. भाजप राममंदिराचा वापर राजकीय लाभ करून घेण्यासाठी करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेत सर्व धर्म समान आहेत. (असे आहे, तर एका विशिष्ट धर्मातील लोकांनाच काँग्रेसने एवढी वर्षे विशेष सवलती का दिल्या ? या माध्यमातून राजकीय लाभ उठवणार्‍या काँग्रेसला सिद्धरामय्या यांनी विरोध का केला नाही ? – संपादक)

२. भाजपचे सरचिटणीस सी.टी. रवि यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ‘सिद्धरामय्या खान’ असे संबोधले होते. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सिद्धरामय्या म्हणाले की, आपल्या देशात वेगळी धार्मिक संस्कृती आहे. प्रत्येक व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजे. काँग्रेस पक्षाने नेहमीच जातीयवादाला प्रोत्साहन देणार्‍यांचा विरोध केला आहे. (स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आरक्षण चालू ठेवून काँग्रेसने जातींच्या आधारावर समाजात फूट पाडली आणि राजकीय अपलाभ उठवण्यासाठी जातीयवादाला प्रोत्साहन दिले, हे सर्वश्रुत आहे ! – संपादक)