‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ३ सैन्याधिकार्‍यांना लाचखोरीसाठी अटक केल्याचे वृत्त बनावट आणि दिशाभूल करणारे ! – सैन्यदल

नवी देहली –  ३१ डिसेंबर २०२२ या दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने एक लेख प्रकाशित केला. यामध्ये, ‘३० डिसेंबर २०२२ या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाचखोरीच्या आरोपाखाली ३ सैन्याधिकार्‍यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या अधिकार्‍यांमध्ये भारतीय सैन्याच्या दक्षिण-पश्‍चिम कमांडचे लेखाधिकारी, एक कनिष्ठ अनुवादक आणि एक आर्थिक सल्लागार यांचा समावेश आहे’, असे नमूद करण्यात आले होते. या वृत्त अहवालात पुढे दावा करण्यात आला होता की, जयपूरमध्ये ही अटक करण्यात आली आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने अनेक ठिकाणी छापे टाकून ४० लाख रुपयांची रोकड जप्त केली. याशिवाय ‘सीबीआय’ने मालमत्ता आणि गुन्ह्याची कागदपत्रे जप्त केल्याचे त्यात म्हटले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’चा हा दावा भारतीय सैन्याच्या अतिरिक्त महासंचालनालयाच्या सार्वजनिक माहिती (एडीजीपीआय) विभागाने फेटाळून लावला आहे.

१. एका ट्वीटमध्ये ‘एडीजीपीआय’ने म्हटले आहे की, ३१ डिसेंबर २०२२ च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या जयपूर आवृत्तीमध्ये प्रसिद्ध केलेला लेख दिशाभूल करणारा आहे. या लेखात नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही सैन्याधिकार्‍याला अटक करण्यात आलेली नाही, असे या ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे.

२. या ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे, ‘भविष्यात अशा गंभीर चुका टाळण्यासाठी योग्य संपादकीय परिश्रम घेण्याची ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला विनंती आहे.’ तथापि, इंग्रजी दैनिक बनावट वृत्त प्रसिद्ध करत असल्याचे आढळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही.

३. अलीकडेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने कुख्यात गुंड चार्ल्स शोभराज याच्या जागी त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटात शोभराजची भूमिका करणार्‍या रणदीप हुडा या चित्रपट कलाकाराचे छायाचित्र दाखवून गोंधळात टाकल्याविषयी वाद झाला होता.

संपादकीय भूमिका

  • अशी खोटी वृत्ते प्रसारित करून भारतीय सैन्याची प्रतिमा मलिन करणार्‍या वृत्तपत्रावर कारवाई करा !