निराधार काश्मिरी हिंदू !

ख्रिस्ती नववर्षाच्या दिवशी पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांनी भारताला जम्मू-काश्मीरमध्ये ४ काश्मिरी हिंदूंची हत्या करून ‘तुम्ही आम्हाला संपवू शकत नाही, आम्हाला संपवण्याची तुमच्यात धमक नाही. आम्ही जरी मूठभर असलो, तरी महात्मा गांधी यांच्या देशासाठी अन् त्यांच्या हिंदूंसाठी, त्यांच्या सरकारसाठी आणि त्यांच्या संघटनांसाठी पुरून उरणारे आहोत’, हेच दाखवून दिले आहे. ते कसे खरे आहे ? हेही लक्षात घ्यायला पाहिजे. या हत्येनंतर काश्मीरच्या राज्यपालांनी या घटनेची निंदा केली आहे. अशी निंदा सर्वच सरकारांच्या काळापासून केली जात आहे. त्या पलीकडे काही केल्याचे पूर्वीही ऐकिवात नव्हते आणि आताही केले जात असल्याचे दिसत नाही. हिंदूंचा आक्रोश थंड करण्यासाठी मृत हिंदूंच्या नातेवाइकांना १० लाख रुपये देण्याचीही घोषणा राज्यपालांनी केली आहे. ‘हानीभरपाई मिळाली की, हिंदू गप्प बसतील आणि दुसरा हिंदु मरणासाठी सिद्ध राहील’, अशीच काहीशी मानसिकता प्रत्येक घटनेमध्ये शासनकर्त्यांकडून ठेवली जाते’, असे म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये. या हत्येनंतर आता सुरक्षादल संबंधित आतंकवाद्यांचा शोध घेईल आणि त्यांना ठारही करील; पण पुढे काय ? गेली ३३ वर्षे या पलीकडे काही घडत नाही. नुकतेच सरकारने ‘वर्ष २०२२ मध्ये किती आतंकवाद्यांना ठार करण्यात आले ? ’, याची आकडेवारी घोषित केली आहे. त्यानुसार १७२ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यापूर्वी २०० हून अधिक आतंकवाद्यांना एकेका वर्षात ठार करण्यात आले. इतके करूनही काश्मीरमधील हिंदू असुरक्षितच आहेत. केवळ काश्मीरच नव्हे, तर आताची घटना जम्मूपासून जवळ असणार्‍या राजौरी येथे घडली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ‘जम्मूमधील आतंकवादी घटना न्यून झाल्या’, असे सांगण्यात येत असतांना ‘ते कसे खोटे आहे ?’, हेच आतंकवाद्यांनी यातून दाखवून दिले आहे.

त्याचप्रमाणे काही मासांपूर्वी काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य करून ठार करण्यात आले. एका सरकारी कर्मचार्‍याची हत्या करण्यात आली. केंद्र सरकारने काश्मीरमध्ये नोकरीनिमित्त परत आणलेल्या काश्मिरी हिंदूंनी ‘आम्ही असुरक्षित असल्याने आमचे स्थानांतर जम्मू भागात करावे’, अशी मागणी केली. त्यासाठी ते अद्यापही आंदोलन करत आहेत; मात्र सरकार त्यांची मागणी मान्य करण्यास सिद्ध नाही. या काळात हिंदूंच्या हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे जम्मू-काश्मीरमधील हिंदू संतप्त आहेत. केवळ काश्मिरी हिंदूच नव्हे, तर अन्य राज्यांतून कामानिमित्त काश्मीरमध्ये गेलेल्या हिंदूंनाही लक्ष्य करण्यात आले आहे.

हिंदूंचा आक्रोश !

३३ वर्षांपूर्वीच काश्मीर हिंदुविहीन करण्याचा प्रारंभ झाला होता आणि त्याला ९९ टक्के यशही आलेले आहे. गेल्या ३३ वर्षांत ही स्थिती पालटण्यात भारतातील सर्वपक्षीय सरकारांना यश आलेले नाही. यामागे सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव, कठोर निर्णयाचा अभाव, हिंदूंचे रक्षण करण्याविषयीची उदासीनता, मुसलमानांचे लांगूलचालन, मतपेढीचे राजकारण हीच यामागील प्रमुख कारणे आहेत. ‘भाजपचे सरकार आल्यानंतर काश्मीरमधील जिहादी आतंकवाद आणि जिहादी मानसिकता नष्ट करण्यात येईल अन् पुन्हा तेथे हिंदूंचे पुनर्वसन केले जाईल’, अशी काश्मिरी हिंदूंसह संपूर्ण देशातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंची अपेक्षा होती; मात्र गेल्या ८ वर्षांत ती पूर्ण झालेली नाही, ही वस्तूस्थिती आताच्या आक्रमणातून स्पष्ट होते. सरकारने मधल्या काळात काश्मीरमधील कलम ३७० रहित केले, आतंकवादी कारवायांवर चाप लावला, शेकडो जिहादी आतंकवाद्यांना ठार केले, दगडफेकीच्या घटना संपूर्णपणे थांबवल्या, हे जरी सत्य असले, तरी ‘काश्मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्ट झालेला नाही आणि हिंदू अद्यापही तेथे राहू शकत नाहीत, ते असुरक्षितच आहेत’, हे विसरता येणार नाही. मध्यंतरी उरी आणि पठाणकोट येथे सैन्यतळावर आक्रमण झाल्यानंतर सरकारने ‘सर्जिकल’ आणि ‘एअर स्ट्राईक’ करून पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार केले होते; मात्र त्यामुळे आतंकवाद नष्ट झाला का ? नाही; कारण ही वरवरची आणि तात्कालिक कारवाई होती. अशी कारवाई करणे अपेक्षित आहेच; मात्र जेव्हा एखादी समस्या गंभीर असते, तेव्हा ती मुळासकट नष्ट करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक असते. मागील सरकारांनी विविध कारणांमुळे ज्या काही घोडचुका केल्या, त्या चुका टाळून ही समस्या सोडवण्यासाठी आताच्या सरकारने गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक होते. तसे झालेले काश्मिरी हिंदूंनाही दिसत नाही. त्यांच्या मनामध्ये हीच खदखद अधिक असल्याचे त्यांच्याकडून होत असलेले आंदोलन आणि आक्रोश यांमुळे दिसून येत आहे. याचा विचार होणे आवश्यक आहे.

जिहादी मानसिकता

काश्मीरमधील आतंकवाद हा जिहादी मानसिकतेमुळे निर्माण झालेला आहे. त्यामागे असणारी जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी कधीही प्रयत्न झाले नाहीत; कारण अशी काही मानसिकता आहे, हे आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने स्वीकारलेले नाही. ते न स्वीकारण्यामागे मतपेढीचेच राजकारण होते, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे हा आतंकवाद नष्ट करण्याचा, म्हणजे मुळापासून संपवण्याचा प्रयत्न झाला नाही. तो करणे आवश्यक आहे. त्यासाठी कठोर होण्याची आवश्यकता आहे. आतंकवाद्यांना आतापर्यंत सर्व प्रकारचे साहाय्य जिहादी मानसिकतेच्या स्थानिक नागरिकांकडून मिळालेले आहे. आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहस्रो काश्मिरी मुसलमान सहभागी होतात, हे त्याचेच दर्शक आहे. या मानसिकतेवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे जिहादी आतंकवादही नष्ट होऊ शकला नाही. ३३ वर्षांत सहस्रो काश्मिरी मुसलमान तरुण आधीचे आतंकवादी तरुण ठार होत असतांनाही आतंकवादी संघटनांमध्ये भरती होत राहिले आणि होत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. जोपर्यंत जिहादी मानसिकता आणि जिहादी देश पाकिस्तान यांना नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील हिंदूंचा वंशसंहार होतच रहाणार, हे स्वीकारावेच लागेल !

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट करण्याची इच्छाशक्ती शासनकर्त्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक !