६३३ भारतीय बंदीवानांना मुक्त करा !

भारताचे पाकिस्तानला आवाहन

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – भारताने पाकिस्तानला त्याच्या कारागृहातील शिक्षा पूर्ण झालेले भारतीय आणि ज्यांचे नागरिकत्व भारतीय असल्याची निश्‍चिती झाली आहे, अशांची मुक्तता करण्याचे आवाहन केले आहे. एकूण ६३१ भारतीय मासेमार आणि अन्य २ नागरिक यांची सूची भारताने पाकला दिली आहे. याव्यतिरिक्त पाकच्या कह्यातील भारतीय नागरिक असण्याची शक्यता असलेले ३० मासेमार आणि २२ नागरिक यांना तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्काची सुविधा प्रदान करण्याचेही आवाहन भारताने केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. वर्ष २००८ मध्ये केलेल्या करारानुसार प्रत्येक वर्षाच्या १ जानेवारी आणि १ जुलै या दिवशी मासेमार आणि नागरी बंदीवान यांची सूची एकमेकांना सोपवण्यासाठी दोन्ही देशांत सहमती झाली होती. त्यानुसार भारताने हे आवाहन केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात नमूद केले की, भारताने सध्या त्याच्या नियंत्रणात असलेल्या ३३९ पाकिस्तानी बंदीवान आणि ९५ मासेमार यांची सूची पाकिस्तानला दिली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानने त्याच्या कह्यात असलेल्या ५१ नागरी बंदीवान आणि ६५४ मासेमार यांची सूची भारतास दिली आहे. यांपैकी बहुसंख्य भारतीय आहेत आणि काही भारतीय असल्याचे मानले जाते.