साम्यवाद, भांडवलशाही, इस्लामी आदी राज्यव्यवस्थांचा फोलपणा स्पष्ट झाल्यानंतर आता तरी अध्यात्मावर आधारित राज्यव्यवस्थाच हवी !
१. विज्ञानामुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे पाहून जगण्यासाठी धडपडणारे पाश्चिमात्य जग !
‘सहस्रो वर्षांत पृथ्वीवर जे निर्माण झाले, ते मनुष्याने काही शतकांमध्ये संपवण्याचा आणि स्वत:ही संपण्याचा ध्यास घेतला आहे. पूर्वी लिहिलेल्या एका लेखात मी उल्लेख केला होता, तो पॅसिफिक महासागरातील महाकाय गर्तेचा, म्हणजे ‘मरियाना ट्रेंच’चा. असे म्हणतात की, ही गर्त इतकी खोल आहे की, त्यात संपूर्ण हिमालय ठेवला, तरी वरून एक मैलभर पाणी वाहील. संशोधक दीर्घकाळ या गर्तेच्या तळाशी पोचू शकत नव्हते; कारण जसे आपण खाली जातो, तसे पाण्याचा दाब, अंधार आणि प्राणवायूची कमतरता या गोष्टी वाढत जातात. संशोधनातून लक्षात आले की, ज्या खोलात मानवाला पोचता येत नव्हते, तेथे मानवनिर्मित कचरा पोचला होता. आपण एकदा वापरून टाकून देणार्या प्लास्टिकचा कचरा त्या गर्तेत पोचला होता.
यावर हळूहळू पाश्चिमात्य देशांमध्ये विचार चालू झाला आहे. अर्थात् हा विचारही प्रदूषणकारी कोक पीत आणि कचरा निर्माण करतच होत आहे. या धडपडी दोन्ही दिशांनी होत आहेत. एक म्हणजे सर्व काही नष्ट होईल, तर आपण कसे जगायचे ? आणि दुसरे सर्व नष्ट झाले, तर आपण कसे वाचायचे ? ही धडपड अर्थात्च अतीश्रीमंत किंवा महाश्रीमंत यांची आहे. पैसा असल्यावर जगण्याची इच्छा तरारतेच !
डग्लस रश्कॉफ नावाचा एक संगणकातील माहितगार आहे. त्याने विविध विषयांवरील काही पुस्तकेही लिहिली आहेत. त्याचे ‘सव्र्हायव्हल ऑफ द रिचेस्ट : एस्केप फॅन्टसीज ऑफ द टेक बिलीनेअर्स’ (श्रीमंतांचे तग धरुन रहाणे : तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधिशांच्या सुटकेच्या कल्पना) असे नवीन पुस्तक आले आहे.
हे डग्लस महाशय लिहितात की, भलीमोठी रक्कम देऊन त्यांना एका ठिकाणी भाषण देण्यासाठी बोलावण्यात आले. विमानप्रवास करून अपेक्षित स्थळी, म्हणजेच अज्ञात आणि निर्जन वाळवंटात ते पोचले. त्यांच्या लक्षात आले की, हे प्रकरण वाटले त्याहून श्रीमंत होते. ५० ते १०० जणांसमोर बोलण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात समोर आले केवळ ५ अतीश्रीमंत !
डग्लस पुढे लिहितात की, त्यांचे प्रश्न तंत्रज्ञानावर नव्हते, तर वेगळेच होते. पर्यावरणातील पालटांचे दुष्परिणाम सर्वांत अल्प कुठे होतील ? अलास्का कि न्यूझीलंड ? पृथ्वीचे पर्यावरण बिघडल्याने हानी होईल कि जैविक युद्धाने होईल ? असे झाले, तर जगण्यासाठी कुठे आसरा शोधावा ? तेथे सुरक्षा कोणती ठेवावी ? भूमीतील पाण्यावर परिणाम होईल का ? एकाने तर विचारले की, मी एक असा आपत्कालीन आसरा निर्माण करत आणला आहे; परंतु तेथे मीच ठेवलेल्या सुरक्षारक्षकांवर नियंत्रण कसे ठेवावे ? अन्नपुरवठा स्वत:च्याच नियंत्रणात ठेवण्यापासून निवृत्त नेव्ही सील (अमेरिकेतील अतीप्रशिक्षित सैनिक) यांना सुरक्षेसाठी भाड्याने घेण्यापर्यंत त्यांनी विचार केलेला होता. डग्लसने नंतर पुढे बरेच काही लिहिले आहे. अतिश्रीमंतांनी त्यांच्या स्वार्थातून केलेला आपत्काळाचा विचार महत्त्वाचा आहे.
२. पुनर्वापरावर भर देत वस्तूंना भंगारात काढण्यापेक्षा त्यातूनच पुनर्निर्मिती करणारी चक्राकार अर्थव्यवस्था जगासाठी आशेचा किरण !
गेल्या दशकभरात चिंतनातून एक नवीन संकल्पना आकार घ्यायला धडपडत आहे, ती आहे चक्राकार अर्थव्यवस्थेची (सक्र्युलर इकॉनॉमीची) ! एखादी गोष्ट वर जाते, मध्ये येते, पुन्हा खाली येते आणि पुन्हा वर जाते, अशी चक्राकार गतीने फिरत रहाते. या संकल्पनेवर आधारलेली अर्थव्यवस्था, म्हणजे चक्राकार अर्थव्यवस्था ! संयुक्त राष्ट्राच्या ‘व्यापार आणि विकास’ या विषयांवरील परिषदेतही या चक्राकार अर्थव्यवस्थेचा विषय आला होता. ‘चक्राकार, म्हणजेच वस्तूंच्या पुनर्वापराला प्राधान्य देणारी व्यवस्था’, असे काहीसे म्हणता येईल. पुनर्वापरावर भर देत वस्तूंना भंगारात काढण्याऐवजी त्यातूनच पुनर्निर्मिती करणारी अर्थव्यवस्था. ज्यामध्ये वापरून झालेले कपडे, धातू, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा पुन्हा वापरता येतील. नासाडी, प्रदूषण टाळणे, वस्तूंचा अधिकाधिक वापर करणे आणि पुनर्निर्मिती होऊ शकणे, यांवर चक्राकार अर्थव्यवस्थेत भर देण्यात येतो.
‘फॅशन’ उद्योगामध्ये प्रतिवर्षी लक्षावधी कपडे बनतात आणि वापरून फेकून दिले जातात. लोक कपडे फेकून देतील आणि नवे घेतील, तरच त्यांची विक्री होत राहील आणि नवनवीन ‘फॅशन’ येत राहील. ‘फॅशन’ उद्योग यावरच चालतो. यात परिर्वतन करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘नापापीजीरी’ हा एक ब्रँड आहे. ते अशी जॅकेट्स बनवत आहेत की, जरी ते खराब झाले, तरी त्यातून प्रदूषण होणार नाही आणि ते परत वापरता येईल. अमेरिकेमध्ये जुन्या कपड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी एक ‘प्लॅटफॉर्म’ बनवण्यात आला आहे. असाच व्यवसाय फ्रेंच आस्थापनाने चालू केला आहे. वर्ष २०२७ पर्यंत अशा वापरलेल्या कपड्यांचे स्थान एखाद्या व्यक्तीच्या एकूण कपड्यांच्या ११ टक्के असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीडमधील स्वीडनच्या ‘एच् अँड एम्’ या आस्थापनानेही त्यांचे कपडे अधिक काळ टिकतील आणि चांगले रहातील, यांवर भर द्यायचा विचार केला आहे. ते हे काहीतरी दाखवण्यासाठी करत आहेत कि खरेच करत आहेत, हे काळ ठरवेल; पण ज्या वेगाने विकासाचा बुडबुडा दिसत आहे, तो टिकणारा नाही, याची कल्पना या सर्वांना आली आहे, एवढे नक्की !
३. भारतातील अध्यात्मावर आधारित राज्यव्यवस्था पडताळून पहायला काय हरकत आहे ?
चक्राकार अर्थव्यवस्था निर्माण करणे किंवा समाजापासून पळून जाऊन स्वतःचे संरक्षित बेट बनवणे यांवर लक्ष केंद्रित करायचे कि स्वतःच्या गरजांवर ? यावर पाश्चिमात्य देशांमध्ये विचार चालू झाला आहे; म्हणून आपणही करणार ? कि उद्या वर्तुळाकार, चक्राकार अर्थव्यवस्था किंवा अजून काही पर्याय शोधून थकल्यावर जेव्हा पाश्चिमात्य देश भारतातील अध्यात्माकडे वळतील, तेव्हा आपण वळणार ? गरजा अमर्याद असतील, तर हे चक्र चालूच राहील. व्यक्तीच्या, पर्यायाने समाजाच्या गरजा न्यून करण्यावर हिंदु संस्कृती भर देते. पाश्चिमात्य म्हणतात, ‘आधी मी – जग नंतर’, तर हिंदु संस्कृती, म्हणते ‘मी शेवटी, आधी विश्व, राष्ट्र, आणि समाज.’ हे तत्त्व आम्ही इतरांना शिकवायला नको का ? कि चक्राकार अर्थव्यवस्था आणि स्वत:पुरते बेट बनवण्याने समस्या सुटणार नाहीत, हे लक्षात आल्यावर पाश्चिमात्य जेव्हा ‘मी शेवटी’ला डोक्यावर घेऊन नाचू लागतील, तेव्हा आपल्याला त्याचे मोठेपण कळणार ? दुसरे असे की, जगभरात साम्यवाद, भांडवलशाही अर्थात् भोगवाद, इस्लामी राज्यव्यवस्था अशा अनेक राज्यव्यवस्थांचे पर्याय पडताळून झाले. त्यांच्या फोलपणानेच तर आपण या विनाशाच्या कडेवर आलो आहोत. हिंदु अध्यात्मावर आधारित राज्यव्यवस्थेला आपण आता तरी संधी देणार का ? आणि त्यासाठी आपण काय करायला हवे ?’
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद