वादग्रस्त पाक-चीन आर्थिक महामार्ग प्रकल्पाला पाकमध्ये हिंसक विरोध !

इस्लामाबाद – बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर येथील वादग्रस्त पाक-चीन आर्थिक महामार्ग प्रकल्पाच्या विरोधाला हिंसक वळण लागले आहे. या प्रकल्पाच्या विरोधात ग्वादर येथील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढत चालली असून तेथील परिस्थिती पाकच्या नियंत्रणाबाहेर चालली आहे.  त्यामुळे पाकने तेथे इंटरनेट बंद करून जमावबंदी लागू केली आहे. तथापि ही जमावबंदी झुगारून नागरिकांचे आंदोलन चालूच आहे. या विरोधामुळे चीन पाकवर अप्रसन्न आहे. ‘हक दो तहरीक’ ही संघटना या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे चीनने पुढाकार घेऊन ‘हक दो तहरीक’चे अध्यक्ष रहमान यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांशी बोलणी चालू केली आहे. तथापि आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे चर्चेची दारेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

५ दिवसांत १०० हून अधिक आंदोलनकर्त्यांना अटक !

या प्रकरणी पाकने गेल्या ५ दिवसांत ग्वादर, पासनी, तुरबत, मकरान यासह अन्य भागांतून १०० हून अधिक आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. यात महिलांचाही लक्षणीय सहभाग आहे.

हे आमच्या अधिकारांचे युद्ध असल्याने आमचा विरोध चालूच राहील ! – हक दो तहरीक

‘हक दो तहरीक’ संघटनेच्या वतीने करण्यात येणार्‍या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मौलाना रहमान यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, हा संघर्ष म्हणजे ग्वादरच्या लोकांच्या अधिकारांचे युद्ध आहे. त्यामुळे आमचा विरोध चालूच राहील. ‘पाक-चीन आर्थिक महामार्ग प्रकल्प हा चीनचा हिताचा आहे. चीनच्या हस्तक्षेपाचा आमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. हे आम्ही सहन करणार नाही.