चीनसमवेत आमचे संबंध सामान्य नाहीत ! – जयशंकर, परराष्ट्रमंत्री

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

निकोसिया – चीनसोबत भारताचे संबंध सामान्य नाहीत. वास्तविक नियंत्रणरेषा एकतर्फी पालटण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आम्ही सहमती देणार नाही, असे वक्तव्य
भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी केले. दक्षिण युरोपमधील सायप्रस देशातील भारतियांशी संवाद साधतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

१. जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्याच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, ‘‘भारताला वाटाघाटी करण्यास सिद्ध करण्यासाठी आतंकवादाचा वापर शस्त्र म्हणून केला जाऊ शकत नाही. आम्हाला शेजार्‍यांशी चांगले संबंध हवे आहेत; परंतु चांगले संबंध असावेत, याचा अर्थ संबंधित देशाने केलेल्या आतंकवादी कारवायांकडे डोळेझाक करणे किंवा आतंकवादाचे समर्थन करणे, असा होत नाही. याविषयी आम्ही अगदी स्पष्ट आहोत.’’

२. आज जागतिक स्तरावर भारताकडे ‘समस्या सोडवणारा देश’ म्हणून पाहिले जात आहे. भारताकडे बळकट अर्थव्यवस्था आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून पाहिले जाते. भारत सायप्रससोबत ३ करारांवर बोलणी करत आहे, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

भारतावर सातत्याने कुरघोडी करणार्‍या चीनला शाब्दिक विरोध करण्यासह त्याच्या विरोधात आक्रमक पावले उचलणे आवश्यक !