‘बे’शिस्तीचे शतक पार !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून देशभर मार्गक्रमण करत आहेत. अतीमहनीय व्यक्ती म्हटल्यावर त्यांच्यासाठी तितक्या दर्जाची सुरक्षाव्यवस्था ही असणारच ! अर्थात् त्या सुरक्षायंत्रणेचा आदर राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते; पण राहुल गांधी यांना ‘कर्तव्य’ शब्दाचा अर्थ तरी ठाऊक असेल कि नाही ?’, याची शंकाच आहे. ‘त्यांनी वर्ष २०२० पासून ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या काळातही उल्लंघनाचे अनेक प्रकार घडले आहेत’, अशी माहिती ‘केंद्रीय राखीव पोलीस दला’ने (‘सी.आर्.पी.एफ्.’ने) दिली आहे. याला ‘राहुल गांधी यांचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यंत्रणेने त्यांना या उल्लंघनाविषयी त्या त्या वेळी जाणीवही करून दिली होती. काँग्रेस पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात ‘राहुल यांना योग्य ती सुरक्षाव्यवस्था पुरवली जावी’, अशी मागणी केली होती. त्या पत्राला पोलीसदलाने वरील प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सुरक्षा कडे तोडून लोक त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाहीत; पण राहुल गांधी हे स्वतःच जर नियम तोडत असतील आणि त्यातच काही अनर्थ घडला, तर त्याला उत्तरदायी कोण ? आतापर्यंत ११३ वेळा नियम मोडले, तर त्यांच्यावर खरेतर कारवाईही व्हायला हवी होती. ‘ती का झाली नाही ?’, याचाही शोध घ्यायला हवा.

लोका सांगे…!

काँग्रेसने भारतात ६० वर्षे राज्य उपभोगले; पण ना जनतेला शिस्त लावली, ना स्वतः शिस्तपालन केले. याचे अनेक दुष्परिणाम देश आज भोगत आहे. थोडक्यात काय, तर शिस्त आणि काँगेस यांचा दुरान्वयेही संबंध नाही. जे स्वतःतच नाही, ते इतरांमध्ये काय निर्माण करणार ? त्यामुळेच तर राहुल गांधी यांनी सुरक्षायंत्रणेच्या नियमांच्या उल्लंघनाचे शतक (?) पार केले ! त्याविषयी तर त्यांना कसलेच देणेघेणे नसावे. आतापर्यंत घराणेशाहीचा वारसा उपभोगणार्‍या गांधी घराण्याला शिस्त, प्रेम, नेतृत्व, कार्यकुशलता, कार्यतत्परता यांचे मूल्य काय असणार ? भारताला जोडू पहाणारेच जर नियम धुडकावत असतील, तर अशाने भारत कधीतरी जोडला जाईल का ? देश जोडण्यासाठी इच्छाशक्ती, राष्ट्रनिष्ठा, नागरिकांप्रती आदर असावा लागतो. अशा एकेक धाग्यानेच देशाची नाळ जोडली जाऊ शकते. हे सर्व राहुल गांधी यांना कधी कळणार ? मुंबईत नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात याच गांधी महाशयांनी स्वतःच्या कार्यकत्र्यांना उद्देशून म्हटले, ‘‘तुम्हा सर्वांमध्ये प्रेम वाढवणे, शिस्त आणणे हे माझे काम आहे.’’ ११३ वेळा नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती कार्यकत्र्यांमध्ये शिस्त कशी आणणार ? आडात नाही, तर पोहर्‍यात कुठून येणार ? काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेच्या निवडणुकांच्या काळात शहर काँग्रेसने ‘कामात कामचुकारपणा करणार्‍या किंवा वरिष्ठांकडे हुजरेगिरी करणार्‍या कार्यकत्र्यांवर कारवाई करू’, असा शिस्तीचा बडगा उगारला होता. वर्ष २०१८ मध्ये काँग्रेसचे नेते दीपक बाबरिया यांनी कार्यकत्र्यांना ‘शिस्त म्हणजे काय असते ?’, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिका’, असा मोलाचा सल्ला दिला होता; कारण त्या वेळी एका कार्यक्रमात कार्यकत्र्यांनी आसंद्यांवरून गोंधळ निर्माण केला होता. राहुल गांधी यांना बहुदा या घटना ठाऊक नसाव्यात. त्यांनी त्यांच्याच कार्यकत्र्यांकडून त्या जाणून घ्याव्यात, अन्यथा ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’ अशी स्वतःची गत होईल. भारतीय संघाचे माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी पटांगणात विलंबाने येणार्‍या खेळाडूंना १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर कोणताही खेळाडू विलंबाने आला नाही. याला म्हणतात ‘नेतृत्व’ ! हे राहुल गांधी यांनी लक्षात घेऊन आत्मचिंतन करावे. त्यांनी सुरक्षेच्या नियमांचे इतक्या वेळा उल्लंघन केल्याचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाल्याने त्यांचे खरे रूप जनतेसमोर आले आहे. सोज्वळपणाचा आव आणत ज्या जनतेसमोर आपण प्रतिदिन जातो, तीच जनता त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेकडे कधीतरी आशेने पाहील का ?

आदर्श कोण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेल्या ५० वर्षांतील त्यांच्या उदरनिर्वाहाच्या हिशोबाविषयी जरी कुणी विचारणा केली, तरी ते तो हिशोब देऊ शकतील; कारण त्यांचे चारित्र्य निष्कलंक आहे. म्हणूनच हे अत्यंत विश्वसनीय, कर्तृत्ववान आणि द्रष्टे पंतप्रधान आहेत. भारतातील नागरिकांनाही त्यांच्याविषयी आदर आहे. आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणात ‘नरेंद्र मोदी’ यांना ‘फॉलो’ करते आणि राहुल गांधी यांची खिल्ली उडवते, असे सर्वसाधारण चित्र आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसला शैथिल्य आले होते. काही काळाने राहुल गांधी यांनी सक्रीय होत ‘होतकरू नेता’ अशा स्वरूपात नवीन चेहरा म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माध्यमातून काँग्रेसींनाही ‘आशेचा किरण’ दिसला होता; पण त्यांच्यातील बालीशपणामुळे तो लवकरच लुप्त पावला. ‘भारत जोडो’च्या माध्यमातून पुन्हा एकदा राहुल गांधी त्यांची मलिन झालेली प्रतिमा पुन्हा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु भारतद्वेष्टे आणि हिंदुद्वेष्टे यांना समवेत घेऊन निघालेली यात्रा काय साध्य करणार ? ‘हे भारतातील सूज्ञ हिंदू जाणून आहेत’, हे राहुल यांनी लक्षात घ्यावे. आतापर्यंत काँग्रेसने असंख्य दुष्कृत्ये केली. जनता ती कधीच विसरणार नाही. आतापर्यंतच्या काँग्रेसींच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणार्‍या राहुल गांधींनी या सर्वांतून बोध घ्यावा. माणूस २ किंवा ४ वेळा चुकू शकतो; पण नंतर तरी तो शहाणा होण्याचा प्रयत्न करतो. इथे ११३ वेळा नियम तोडण्यापर्यंत मजल जातेच कशी ? ‘भारत जोडो’च्या नेतृत्वाच्या दृष्टीने हे अशोभनीय आहे. ३ जानेवारीपासून पुन्हा चालू होणार्‍या यात्रेच्या काळात तरी राहुल गांधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतील, अशी आशा बाळगूया !

स्वतः बेशिस्त असतांना इतरांना शिस्त लावण्याच्या फुकाच्या गोष्टी करणारे देशहित काय साधणार ?