भगवान दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती !

आज, २४ डिसेंबर २०२२ या दिवशी श्री नृसिंह सरस्वती यांची जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !

श्री नृसिंह सरस्वती

‘चौदाव्या शतकात पौष शु. १ या दिवशी दत्त संप्रदायातील श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला. शिव आणि विष्णु यांची उपासना एकरूपाने करणार्‍या दत्त संप्रदायाने महाराष्ट्रात संस्कृतीप्रसाराचे कार्य चांगलेच केले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नंतर नृसिंह सरस्वती यांचा अवतार झाला. श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपुरात ‘अंबिका’ नावाच्या स्त्रीस आशीर्वाद दिला होता, ‘‘पुढील जन्मी तुला अलौकिक पुत्र होईल.’’ ही अंबिकादेवी मरणोत्तर कारंजगाव येथे जन्मास आली. या जन्मी तिचे नाव ‘अंबाभवानी’ असे होते. माधव नावाच्या धर्मनिष्ठ ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला आणि त्यांच्या पोटी नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला. नृसिंह सरस्वती यांचे चरित्र पहिल्यापासूनच अलौकिक अशा चमत्कारांनी भरलेले आहे. असे म्हणतात, ‘जन्मताच तो बालक । ॐकार शब्द म्हणतसे ऐक’, अशी स्थिती होती. ज्योतिषांनी त्याचे भविष्य असे वर्तवले की, ते त्रिभुवनात पूज्य होतील. हे बालक ‘ॐ’ या अक्षराखेरीज दुसरा कोणताही उच्चार करत नसल्यामुळे सर्वांना चिंता लागून राहिली; परंतु मुंज झाल्यानंतर आईने पहिली भिक्षा घातली, तेव्हा त्यांनी ४ मंत्र म्हणून दाखवले. त्यानंतर त्यांनी आईच्या आग्रहासाठी घरच्या घरीच वेदपठण केले. काशी येथे नृसिंह सरस्वती यांनी खडतर असे तपोनुष्ठान केले. त्याच ठिकाणी कृष्णसरस्वती नावाचे एक तपोनिष्ठ आणि अतीवृद्ध संन्यासी होते. त्यांच्यापासून त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली. नृसिंह सरस्वती यांचे संपूर्ण चरित्र गुरुचरित्रामध्ये वर्णिले आहे. ते साक्षात् दत्तांचा अवतार असल्यामुळे त्यांच्या जीवन काळात अनेक अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टींचा संग्रह झाला आहे. असे हे श्री नृसिंह सरस्वती शके १३८० मध्ये समाधिस्थ झाले.
(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’, लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)