१६८ वर्षे जुनी परंपरा असलेले १ सहस्र ८०० हून अधिक गायींचा सांभाळ करणारे महाराष्ट्रातील प्राचीन ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ !

‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’च्या निमित्ताने

भोसरी (पुणे) – वर्ष १८५५ ला स्थापन झालेली १६८ वर्षांची दीर्घकालीन परंपरा असणारी, १ सहस्र ८०० हून गायींचा सांभाळ करणारी ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’ ही गोसंवर्धनासमवेत गोआधारित शेतीला प्रोत्साहन देणारी आणि अन्य गोशाळांनाही यथाशक्ती साहाय्य करणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे. १२ एकर परिसरात असलेल्या ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. श्रीधर पित्ती असून व्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाशजी रांका यांच्यासह १७ संचालक सध्या काम पहात आहेत. गोमातांच्या आरोग्यासाठी आवश्यक सर्व सुविधा इथे असून त्यांची निगा राखण्यासाठी सुसज्ज असे गोठे आणि आधुनिक साधने यांचा वापर इथे केले जाते.

भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी पांजरपोळ येथील विश्वस्तांची भेट घेऊन त्यांचे अधिक कार्य जाणून घेतले. गोरक्षणाचे कार्य ही संस्था अनेक वर्षे निष्ठेने करत असून आदर्श गोशाळा, गोव्यवस्थापन कसे करावे ? याचा एक आदर्शच या संस्थेने उभा केला आहे.

या संदर्भात अधिक माहिती देतांना विश्वस्त म्हणाले –

१. या संस्थेत सर्व प्रकारच्या गायी असून कत्तलीपासून रक्षण केलेल्या, आजारी असलेल्या, अपघातांमध्ये घायाळ झालेल्या गायी इथे आहेत. अगदी महापालिका पकडत असलेल्या गायीही या संस्थेत आणून सोडल्या जातात. यातून ‘पांजरपोळ’प्रती असलेली विश्वासार्हता दिसून येते. गोमातांसाठी लागणारा चारा इथेच पिकवला जातो आणि न्यूनतम ६ मासांचा चारा राहील इतके मोठे गोदाम बांधण्यात आले आहे. संस्थेकडे म्हशी आणि काही बैलही असून परिसरातील गरजू शेतकर्‍यांना शेतीसाठी हे बैल विनामोबदला शेतीसाठी दिले जातात.

२. गायीपासून जैविक खत, गांडूळ खत, तसेच घनजीवामृत बनवण्याचे काम या संस्थेत चालते, तसेच शुद्ध तूपही बनवले जाते. संस्थेमध्ये स्वतंत्र असा गांडूळ खत प्रकल्प आहे. संस्था परिसरातील गरीब-गरजू शेतकर्‍यांना हे खत विनामूल्य देते. इथे बनवण्यात येणार्‍या खतामध्ये ३८.३ % कार्बन प्रमाण आढळून आले असून ते सर्वाधिक आहे. सध्याच्या काळात शेतकर्‍यांचा रासायनिक खते वापरण्याकडे कल असून शेतकर्‍यांनी यापुढील काळात अधिकाधिक शेतकर्‍यांनी जैविक खतच वापरणे अत्यावश्यक आहे, तरच यापुढील काळात जमीनीचा कस टिकून राहील. त्यासाठी आम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये प्रबोधनाचेही काम करतो.

३. आजारी, अपघातग्रस्त अशा सर्व प्रकारच्या गायींवर इथे उपचार केले जातात. इथे गायींसाठी ‘अतीदक्षता विभाग’ही आहे. गायींची काळजी इथे अत्यंत प्रेमाने घेतली जाते. ज्या गायी दूध देण्यासाठी आणि वासरू देण्यासाठी सक्षम नाहीत, अशा गायींसाठी येथे स्वतंत्र गोठे आहेत. गायींप्रमाणे त्यांच्या वासरांचीही वेगळी व्यवस्था इथे केली आहे. वासरांना दिवसभर खेळण्यासाठी मोकळ्या मैदानात सोडले जाते.

विशेष

१. गोपालनासमवेत आध्यात्मिक वारसा जपण्याचे कार्य संस्था भक्तीभावाने करत आहे. त्यासाठी संस्थेच्या आवरात ध्यानमंदिराची उभारणी करण्यात आली असून, राधाकृष्ण आणि शंकर-पार्वतीचे मंदिर उभारण्यात आले आहे.

२. ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’च्या वतीने गोरक्षणाचे काम करणारे श्री. शिवशंकर स्वामी यांना यथाशक्ती साहाय्य करण्यात आले आहे. लहानसहान गोशाळा चालवणार्‍या संस्था आणि इतर छोट्या संस्था यांच्या गायी पांजरपोळ दत्तक घेते आणि त्यांचा सांभाळ करते. अशाप्रकारे संस्था नि:स्वार्थीपणे गायींचा सांभाळ करत आहे.

३. संस्थेच्या परिसरात धर्मार्थ आयुर्वेदिक चिकित्सालय असून तेथे आयुर्वेदिक उपचार केले जातात, तसेच पंचगव्यउपचार पद्धतीमुळे अनेक लोकांना लाभ झाला आहे.

संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट गोपालन आणि गोसंवर्धन असून भविष्यात १५ सहस्र गोमातांची सेवा करण्याची इच्छा करत आहे. पुण्याच्या १०० किलोमीटर परिसरात अशा संस्था चालवण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेस कोणतेही शासकीय अनुदान मिळत नसून समाजातील जाणत्या आणि दानशूर लोकांच्या देणग्यांवर संस्थेचा प्रवास चालू आहे. संस्थेला मिळणार्‍या देणग्या आयकर कायदा कलम ८० जी अन्वये करमुक्त आहेत, तरी अधिकाधिक दानशूर लोकांनी या कार्यात सहभागी घ्यावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे.


गोमातेची रक्षा, गोआधारित धर्मव्यवस्थेची पुन:र्स्थापना, तसेच अन्य विविध कारणांसाठी केला जाणारा कामधेनू अर्थात् सुरभी यज्ञ !

भोसरी (जिल्हा पुणे) – भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’त ५ दिवसीय कामधेनू यज्ञ अर्थात् सुरभी यज्ञ होत आहे. हा यज्ञ प्रामुख्याने गोमातेची रक्षा, गोआधारित धर्मव्यवस्थेची पुन:र्स्थापना, प्रत्येक घर गोमातेचे मंदिर बनण्यासाठी, प्रत्येक गाव कामधेनू तीर्थ बनावे, विश्वाचे कल्याण, सगळ्यांना सद्बुद्धी, सद्ज्ञान मिळावे अशा प्रमुख उद्देशांनी केला जात आहे.

जेव्हा ‘हिंसा’ हाच धर्म होतो, पाप कर्म हेच जीवनाचा आधार होते, व्यभिचार हाच विवेक मानला जातो, दुष्ट आचरण यालाच सेवा समजले जाते. अशा परिस्थितीत अहिंसा धर्मरक्षणासाठी कामधेनू यज्ञ करण्यात येतो. या यज्ञामुळे मानवात चेतना निर्माण होऊ सेवाभाव उत्पन्न होतो. वेदांमध्ये गायीलाच ब्रह्माचे विराट रूप म्हटले आहे. गायीमध्ये सगळ्या देवतांचा वास असतो. प्राचीन काळी सूर्यवंशाचा विस्तार ‘गोसेवे’मुळेच झाला. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या अनेक रूपांपैकी ‘गाय’ हेही एक रूप असल्याचे सांगितले. त्यामुळे गाय ही सगळ्यांचे कल्याण करणारी असल्याने कामधेनू यज्ञामुळे सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात.


वर्ष २००९ पासून ‘चलो गायके संग’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन !

वर्ष २००९ पासून ‘चलो गायके संग’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. यात गोमातेला सर्वाेच्च स्थान देणार्‍या श्रीकृष्णाचे पूजन, नंतर शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून होम-हवन, त्यानंतर मातेसमान गायींची पूजा, त्यानंतर गायींना स्नान घालणे, गूळपोळीचा गोग्रास देणे, असे कार्यक्रम असतात. वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन या वेळी आयोजित केले जाते.