कन्हैयालाल यांची हत्या ही आतंकवादी घटना !

  • उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येच्या आरोपींवर आरोपपत्र प्रविष्ट

  • हत्येमध्ये पाकच्या २ जणांचा सहभाग !

उदयपूर (राजस्थान) – येथील कन्हैयालाल यांची हत्या करणार्‍या रियाज आणि गौस महंमद यांच्यासह ११ जणांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) विशेष एन्.आय.ए. न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले. यात पाकिस्तानच्या २ जणांचा समावेश आहे; मात्र यात या दोघांची भूमिका काय आणि किती होती ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे दोन्ही आरोपी व्हॉट्सअ‍ॅप गटाचे ‘अ‍ॅडमिन’ (नियंत्रक) होते. ते या गटावर चिखावणीखोर संदेश पाठवत होते. २८ जून या दिवशी रियाज आणि गौस यांनी कन्हैयालाल साहू यांच्या दुकानात घुसून त्यांची हत्या केली होती.

या आरोपपत्रात म्हटले आहे की, आरोपींनी सूड घेण्यासाठी कट रचला होता. ही आतंकवादी घटना होती. आरोपी कट्टरतावादी होते. भारतासह जगभरातून येणार्‍या आक्षेपार्ह ऑडिओ आणि व्हिडिओ संदेशांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. रियाज आणि गौस या आरोपींनी देशभरात हे भीषण कृत्य करण्यासाठी चाकूची व्यवस्था केली होती. कन्हैयालाल यांच्या पैगंबर यांच्या संदर्भातील फेसबुक पोस्टविषयी आरोपींच्या मनात राग होता. कट्टरतावादी असल्याने संपूर्ण भारतात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आरोपींनी हत्येचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित केला. इस्लामच्या विरोधात लिहिणार्‍यांची हत्या केल्यामुळे भारतातील लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरवण्याच्या उद्देशाने त्यांनी आणखी एक धमकीचा व्हिडिओ प्रसारित केला होता.